बदलापूर : बदलापूरात झालेल्या ठाणे जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत योगी श्री अरविंद गुरुकुल शाळेने सांघिकमध्ये विजेतेपद मिळवले आहे. तसेच, अन्य प्रकारात त्यांच्या विद्यार्थ्यांनी यशस्वी कामगिरी केली आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, ठाणे व योगी श्री अरविंद गुरुकुल यांच्या संयुक्त विद्यमाने ७ व ८ सप्टेंबरला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर क्रीडा संकुल, शिरगांव, बदलापूर येथे पार पडल्या या स्पर्धेत जिल्ह्य़ातून आलेल्या २४५ जलतरणपटूंनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत प्रथम व द्वितीय स्थानावर आलेल्या खेळाडूंची निवड ही विभागीय स्पर्धासाठी करण्यात आली आहे. या स्पर्धेच्यावेळी प्रशांत चव्हाण हा प्रो-कबड्डी लीगमधील जयपूर पँथर्सचा खेळाडू व तालुका क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ उपस्थित होते, अशी माहिती आयोजक याज्ञेश्वर बागराव यांनी दिली.

अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत ठाण्याच्या खेळाडूंना सुयश
ठाणे : विशाखापट्टण्णम येथे पार पडलेल्या राष्ट्रीय ज्युनिअर अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत ठाण्याच्या तीन खेळाडूंनी पदके पटकावली. अभिजित नायर याने १६ वर्षांखालील मुलांच्या गटातील गोळाफेक स्पर्धेत रौप्य कमावले, तर अग्रता मेलकुंदे हिने १४ वर्षांखालील मुलींच्या गोळाफेक स्पर्धेत सुवर्णपदकावर नाव कोरले. १४ वर्षांखालील गटातच चार्वी पुजारी हिने १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्ण जिंकले. या संपूर्ण स्पर्धेत देशातील २९२ जिल्ह्यातील ३५०० खेळाडूंनी सहभाग घेतला होता.

मेरिडियन शाळेची लंडनमध्ये चमक
कल्याण  :  लंडनमधील सिटी क्रिकेट अ‍ॅकडमीच्या १४ वर्षांखालील मुलांसाठी कलर क्लोंथिन क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. १० ते २० ऑगस्टदरम्यान झालेल्या या स्पर्धेत कल्याणच्या मेरिडियन शाळेतील १२ जणांचा संघ सहभागी झाला होता. लीग पद्धतीने खेळवण्यात आलेल्या या स्पर्धेत मेरिडियन शाळेच्या संघाने उपांत्य फेरीत धडक मारली. या फेरीत झालेल्या अटीतटीच्या सामन्यात त्यांना लिव्हरपूलच्या संघाकडून निसटता पराभव स्वीकारावा लागला. मात्र, संघातील खेळाडूंच्या कामगिरीची सर्वानी प्रशंसा केली. मेरिडियन संघाच्या वतीने गोलंदाजीत करण जाधव, कुणाल पगारे, कोमल गायकर यांनी तर फलंदाजीत कृष बजाज, प्रफुल्ल गांगणानी, भावेश पारवानी यांनी उत्कृष्ट कामगिरी पार पाडली. या दौऱ्याचे प्रमुख संयोजक मेरिडियन शाळेचे जी. एम. विनोद लुम्धे हे होते.

कल्याणच्या खेळाडूचे टेबल टेनिस स्पर्धेत यश
कल्याण  : कल्याणमधील मोहने येथील खेळाडू आत्माराम गांगर्डे यांना सोलापूर येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत विजेतेपद मिळाले आहे. सोलापूर येथे दिवंगत प्रल्हाद जोशी स्मृती राज्यस्तरीय मानांकन स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत गांगर्डे यांनी सुनील बाब्रस या स्पर्धकाचा अंतिम फेरीत पराभव केला. खेळाचे उत्तम नमुने सादर करून गांगर्डे यांनी प्रेक्षकांची दाद मिळवली. या यशाबद्दल कल्याणमधील नागरिकांकडून त्यांचे कौतुक केले जात आहे.

अंबरनाथमध्ये तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा
अंबरनाथ : अंबरनाथमध्ये १०, ११ व १२ सप्टेंबरदरम्यान तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. तालुका क्रीडा संकुल, अंबरनाथ येथे १० तारखेला सकाळी ९ वाजल्यापासून या स्पर्धाना प्रारंभ होणार असून या स्पर्धेत १५ मुलांचे व १२ मुलींचे संघ तालुक्यातून सहभागी होणार आहेत. १० तारखेला १४ वर्षांखालील मुले व मुली, ११ तारखेला १७ वर्षांखालील मुले व मुली, १२ तारखेला १९ वर्षांखालील मुले व मुली आदींचे सामने होणार आहेत, अशी माहिती अंबरनाथ तालुका क्रीडा संकुलाचे केंद्र प्रमुख विलास गायकर यांनी दिली.