स्पोर्टिग क्लब कमिटीच्या विद्यमाने ठाणे येथील सेंट्रल मैदानावर सुरू असलेल्या साठाव्या शामराव ठोसर स्मृती ढाल क्रि केट स्पर्धेच्या अंतिम लढतीत कल्याणची युनियन क्रि केट अ‍ॅकॅडमी अव्वल ठरली आहे. यावेळी युनियन क्रिकेट संघाने कल्याणच्याच डेक्कन क्रिकेट क्लबचा ४८ धावांनी पराभव केला. ठोसर ढाल स्पर्धेच्या इतिहासामध्ये प्रथमच कल्याणचे दोन्ही संघ अंतिम फेरीत लढले. यावेळी युनियन क्रि केट अ‍ॅकॅडमीमध्ये कल्याण येथील ४५ षटकांत ९ बाद २४६ धावा केल्या तर डेक्कन क्रि केट क्लबने ३८.३ षटकांत १९८ धावा केल्या.

धावणे, ससा उडी, पदन्यास पार
प्रतिनिधी,ठाणे
डोंबिवली पूर्व येथील छत्रपती शिक्षण मंडळाच्या पी. आर. म्हैसकर या शाळेच्या मैदानात विद्यार्थ्यांच्या धावणे, ससा उडी, लंगडी, पदन्यास या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत १ ते ६ आणि ६ ते १० अशी वयानुसार वर्गवारी करण्यात आली होती. यावेळी ३ ते ६ वयोगटात धावण्याच्या स्पर्धेत विघ्नेश जंगम याने प्रथम क्रमांक पटकविला तर ससा उडीमध्ये साक्षी मोंड हिने प्रथम येण्याचा मान मिळविला. त्यानंतर ६ ते १० वयोगटतील विद्यार्थ्यांमध्ये लंगडी व पदन्यास स्पर्धा घेण्यात आली. लंगडी स्पर्धेत मानस लोखंडे तर पदन्यासमध्ये सानिका चौघुले हिने प्रथम क्रमांक पटकविला. सुट्टीच्या दिवसांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य निर्माण व्हावे तसेच त्यांना संधी मिळावी यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे मुख्याध्यापिका संध्या खंडागळे यांनी सांगितले.

क्रिकेट प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन
प्रतिनिधी,ठाणे
डोंबिवली क्रिकेट क्लबतर्फे ४० दिवसांची क्रि केट प्रशिक्षण कार्यशाळा भरविण्यात येणार आहे. डी. एन. सी महाविद्यालय येथे १४ एप्रिल ते ३१ मेपर्यंत आयोजित या कार्यशाळेत १७ र्वष वयोगटातील मुले सहभागी होऊ शकतील. एन. सी. ए लेव्हल १ चे खेळाडू विनायक जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असून या कार्यशाळेत दिनेश लाड यांचे प्रशिक्षणही शिबिरार्थीना लाभणार आहे.

वैभव माळीची अष्टपैलू कामगिरी
प्रतिनिधी,ठाणे
डॉ. श्रीधर देशपांडे स्मृती समर लिग या ३० व्या स्पर्धेच्या ड गटातील पहिल्या साखळी फेरीत क्वॉलिटी स्पोर्ट्स क्लबचा कर्णधार वैभव माळी याने ६५ चेंडूंत १७४ धावा व ३ धावांत ५ बळी अशी चमकदार खेळी केली. वैभवच्या या कामगिरीमुळे सुर्वे स्पोर्ट्स क्लबचा २५८ धावांनी दणदणीत पराभव केला. क्वॉलिटी स्पोर्ट्स क्लबने प्रथम फलंदाजी करताना ४५ षटकांत ६ बाद ३८९ असा धावांचा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करताना सुर्वे स्पोर्ट्स संघ १३१ धावांत गडगडला. वैभवच्या अष्टपैलू कामगिरीबाबत क्वॉलिटी स्पोर्ट्सचे प्रशिक्षक चंद्रशेखर करमळकर यांनी कौतुक केले.

मुलींसाठी क्रिकेट प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
प्रतिनिधी ,ठाणे
संतोष स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीच्या वतीने मुलींसाठी क्रिकेट प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ६ ते १६ वयोगटातील मुलींसाठी या उन्हाळी क्रिकेट प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. विशेष म्हणजे मुलींसाठी प्रथमच या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून तीन गटांत हे शिबीर घेतले जाईल. सकाळी ७ ते १० व सायंकाळी ४ ते ७ अशी या शिबिराची वेळ असून हे शिबीर आधारवाडी जेल रोड श्री कॉम्लेक्स कल्याण येथे होणार आहे.

संकलन : भाग्यश्री प्रधान