News Flash

राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंगमध्ये बदलापूरच्या नितीन कुडाळकर यांना सुवर्ण

सांगली येथे २० डिसेंबरला पार पडलेल्या राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत बदलापूरच्या नितीन कुडाळकर यांनी वरिष्ठ गटात सुवर्ण पदक पटकावले.

सांगली येथे महाराष्ट्र राज्य पॉवर लिफ्टिंग असोसिएशन व सांगली जिल्हा पॉवरलिफ्टिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या पॉवर लिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत बदलापुरातील पॉवर लिफ्टिंगपटूंनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

सांगली येथे २० डिसेंबरला पार पडलेल्या राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत बदलापूरच्या नितीन कुडाळकर यांनी वरिष्ठ गटात सुवर्ण पदक पटकावले. तर, बदलापुरातील सिद्धांत कुडाळकर ७४ किलो ४७७.५ किलो, अक्षय राठोड ५३ किलो ४८५ किलो, राकेश मौर्या ९३ किलो ५६७.५, वरिष्ठ ८३ किलो ५०० किलो आदींनीही आपापल्या वजनी गटात पदके मिळवली आहेत.
सांगली येथे महाराष्ट्र राज्य पॉवर लिफ्टिंग असोसिएशन व सांगली जिल्हा पॉवरलिफ्टिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या पॉवर लिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत बदलापुरातील पॉवर लिफ्टिंगपटूंनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. यात वरिष्ठ गटात नितीन कुडाळकर यांनी ८३ किलो वजनी गटात ५०० किलो वजन उचलत सुवर्ण पदक मिळवले आहे. तर कनिष्ठ गटात अक्षय राठोड याने ५३ किलो वजनी गटात ४८५ किलो वजन उचलत सुवर्ण मिळवले तर सिद्धांत कुडाळकर याने ७४ किलो वजनी गटात ४७७.५ किलो वजन उचलत सुवर्ण पदक पटकावले, तर राकेश मौर्या याने ९३ किलो वजनी गटात ५६७.५ किलो वजन उचलत रौप्य पदक मिळवले आहे.

खुल्या स्केटिंग स्पर्धेत कल्याणच्या पवन क्लबला जेतेपद
प्रतिनिधी, कल्याण
कल्याणमध्ये स्केटिंग असोसिएशन ऑफ कल्याण तालुका यांच्या वतीने खुली राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत कल्याणच्या पवन क्लबने जेतेपद पटकावले.
कल्याणमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत पुणे, मुंबई, नाशिक, ठाणे आदी शहरांमधील १९ क्लबच्या १३५ खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. मुला-मुलींच्या व तीन स्केटिंग प्रकारात खेळवण्यात आलेल्या या स्पर्धेत कल्याणच्या पवन क्लबच्या खेळाडूंनी १६ सुवर्ण, ७ रौप्य, ४ कांस्य पदके पटकावत स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. सागर स्केटिंग क्लबने ७ सुवर्ण, ५ रौप्य व ६ कांस्य पदकासह स्पर्धेचे उपविजेतेपद संपादित केले. या वेळी ठाण्याच्या फ्युचक स्केटिंग क्लबला तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले. विजेत्यांना स्मृतिचिन्ह, पदक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेच्या आयोजिका नगरसेविका शालिनी वायले यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आल्याचे सचिव अविनाश ओंबासे यांनी सांगितले.

आंतरविद्यापीठीय खो-खो स्पर्धेला गोवेली महाविद्यालयात सुरुवात
प्रतिनिधी, कल्याण
राष्ट्रीय स्तरावरील पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठीय महिलांच्या खो-खो स्पर्धेला गोवेली महाविद्यालयात मंगळवारी सुरूवात झाली. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले. मुंबई विद्यापीठ क्रीडा विभाग आणि गोवेली महाविद्यलय यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ठाणे जिल्ह्य़ात प्रथमच होणाऱ्या या स्पर्धेला देशभरातून मुलींच्या तब्बल ४० संघांनी हजेरी लावली आहे. त्यात महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेश या राज्यांतील विविध विद्यापीठांचे संघ सहभागी झाले आहेत. पुढील चार दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत ४२ सामने होणार आहेत. तर सांगता समारंभ २५ डिसेंबरला पुरस्कार सोहळ्याने होणार असल्याची माहिती गोवेली महाविद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक सुरेश चेडे यांनी दिली.

शिवाई आंतरशालेय कबड्डी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रतिनिधी, डोंबिवली
शिवाई बालक मंदिर ट्रस्टच्या क्रीडा मंडळाच्या वतीने तालुकास्तरीय आतंरशालेय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत कल्याण डोंबिवलीतील तसेच जवळच्या शहरातील सुमारे ३५ शाळांमधील ८० संघांनी सहभाग घेतला होता. १४ ते १९ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांच्या एकूण ५ गटांत ही स्पर्धा खेळवली गेली.
यात डोंबिवली व कल्याणमधील शाळांनी एकमेकांशी जोरदार लढत दिली. यात १४ वर्षांखालील मुलांच्या पहिल्या गटात शिवाई बालक मंदिर या डोंबिवलीच्या शाळेने विजेतेपद पटकाविले तर उपविजेता कल्याणच्या मोहिंदर सिंग काबल सिंग शाळेला घोषित करण्यात आले. १६ वर्षांखालील मुलांच्या गटात घोटसईच्या सरस्वती विद्या मंदिरने प्रथम क्रमांक पटकाविला, तर वेणूबाई अंबो पावसे विद्यालय उपविजयी राहिले. मुलींच्या तिसऱ्या गटात डोंबिवलीच्या स्वामी विवेकानंद अरुणोदय शाळेने विजेतेपद पटकाविले. तर डोंबिवलीतीलच निळजे येथील सवरेदय विद्यालयास उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. १९ वर्षांखालील मुलांच्या चौथ्या गटात डोंबिवलीच्या ई. बी. मढवी शाळा विजयी तर प्रगती महाविद्यालय उपविजेते राहिले. पाचव्या गटात १९ वर्षांखालील मुलींच्या संघात प्रगती महाविद्यालयाने बाजी मारीत विजेतेपद पटकाविले तर ई. बी. मढवी शाळेला येथे उपविजेते पदावर समाधान मानावे लागले.

पोलीस हवालदार जावेद जमीर यांना वुशू खेळात रौप्य
प्रतिनिधी, ठाणे
हरियाणा येथे नुकत्याच पार पडलेल्या ६४ व्या अखिल भारतीय रेसलिंग क्लस्टर २०१५ या स्पर्धेत ठाणे ग्रामीण पोलीस दलातील पोलीस हवालदार जावेद जमीर यांनी रौप्य पदक पटकावले आहे.
हरियाणातील व्हेचर स्टेडिअम, मधुबन येथे पार पडलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्र पोलीस दलाच्या वतीने गेलेल्या २४ वर्षीय जमीर यांनी ९० किलो वजनी गटात पुरुषांच्या झालेल्या वुशू या खेळात ही कामगिरी केली आहे. वुशू हा पंच, किक्स, थ्रोइंग या तीन प्रकारांतील खेळ असून यात रौप्य पदक मिळवल्याने जमीर यांचा ठाणे जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राजेश प्रधान यांच्या हस्ते रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

ठाणे जिल्हा खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन
प्रतिनिधी, ठाणे
ठाणे रोटरी क्लब, ठाणे शहर आणि जिल्हा बॅडमिन्टन संघटना यांच्या वतीने ठाणे जिल्हा खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा २४ ते २६ डिसेंबरदरम्यान ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडिअमच्या खंडू रांगणेकर बॅडमिंटन सभागृहामध्ये होणार आहे. स्पर्धा तीन वयोगटांमध्ये होणार असून पहिला गट दहा वर्षांखालील मुला-मुलींचा, दुसरा गट तेरा वर्षांखालील मुला-मुलींचा आणि तिसरा गट पंधरा वर्षांखालील मुला-मुलींचा असणार आहे. ठाणे रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रवीण नागरे यांनी ठाण्यातील १५ वर्षांखालील मुलांना स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

ठाण्यात राज्यस्तरीय ब्रिज स्पर्धेचे आयोजन
प्रतिनिधी, ठाणे
आर्य क्रीडा मंडळ आणि ठाणे जिल्हा ब्रिज असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय ब्रिज स्पर्धेचे (वैद्य-कर्णिक ट्रॉफी) आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा २६ आणि २७ डिसेंबर रोजी आर्य क्रीडा मंडळ हॉल, ठाणे (प.) येथे होणार आहे. २६ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता आर्य क्रीडा मंडळाचे सचिव प्रकाश पाटणकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होईल. विजेत्या स्पर्धकाला वैद्य-कर्णिक चषक आणि दहा हजार रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. संपर्क – ९८१९२६७४०७.

संजय दाभोळकर यांना राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत कांस्यपदक
राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग संघटना आणि मध्यप्रदेश पॉवर लिफ्टिंग संघटनेच्या संयुक्त विद्यमाने इंदूर येथील राष्ट्रीय स्तरावरील अजिंक्यपद स्पर्धेत बदलापूरच्या संजय दाभोळकर याने वरिष्ठ गटात महाराष्ट्राला कास्यपदक मिळवून दिले. देशभरातील ४०० स्पर्धक सहभागी झाले होते. दिल्लीच्या सुरेंद्र गोगी यांनी सुवर्ण तर आसामच्या दितेन सोनवाल यांना रौप्यपदक मिळाले. ठाण्यातील सुपरमॅक्स कंपनीत नोकरी करणारे संजय दाभोळकर उल्हासनगर येथील दत्तात्रय व्यायामशाळेत नियमित सराव करतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 24, 2015 12:10 am

Web Title: sport events in thane
Next Stories
1 ‘थर्टी फर्स्ट’च्या करमणूक कार्यक्रमांनाही परवाना सक्ती
2 मनमोहक ठाणे खाडी!
3 सेवा रस्त्यांवरील वाहनांवर कारवाई सुरू
Just Now!
X