मुंबई विभागीय तायक्वांडो स्पर्धेत ठाणे संघाला दहा पदके मिळाली असून या स्पर्धेतील विजेते खेळाडू औरंगाबाद येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत खेळणार आहेत. पालघर जिल्हा असोसिएशन ऑफ तायक्वांडो व बहुजन विकास आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा विरार येथे झाली आहे. या स्पर्धेत पालघर, मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड आदी पाच जिल्ह्य़ांतील खेळाडू सहभागी झाले होते. स्पर्धेत ठाण्याच्या खेळाडूंनी एक सुवर्ण, सात रौप्य व दोन कांस्य अशी दहा पदके मिळवीत संपूर्ण स्पर्धेत तिसऱ्या स्थानावर येण्याचा मान पटकावला आहे. पदकविजेते खेळाडू २५ सप्टेंबरला औरंगाबाद येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत मुंबई विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
विजेते खेळाडू
सुवर्णपदक विजेते अरुंधती देशपांडे, रौप्यपदक विजेते मंगेश औटी, मिलिंद कुरले, विशाल राजभर, पूनम यादव, तनुजा पाल, रेवंती हसवंडकर, प्रतिभा तिवारी, कांस्यपदक विजेते रविना के., ओंकार कुंभार.

ठाण्याच्या खेळाडूंची राष्ट्रीय रोलबॉल स्पर्धेत निवड
ठाणे :महाराष्ट्र राज्य रोलबॉल संघटना व पुणे जिल्हा रोलबॉल संघटनेच्या वतीने पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय रोलबॉल ज्युनिअर स्पर्धेत ठाण्याच्या संघातील खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे ठाण्याच्या सात खेळाडूंची सुरत येथे होणाऱ्या राष्ट्रीय रोलबॉल स्पर्धेसाठी राज्याच्या संघात निवड करण्यात आली आहे. जश मिस्त्री, हर्षे जेशवाणी, दिरेन सबलानी, निखिल पंजाबी, संकेत विरुद्ध, हर्षे संघवी, श्रुती शेट्टी अशी या खेळाडूंची नावे आहेत. या पुण्यातील स्पर्धेत ३१ जिल्ह्य़ातील ६२० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. ठाणे विभागातून मुलांचे व मुलींचे असे प्रत्येकी दोन संघ सहभागी झाले होते. या संघांचे व्यवस्थापक म्हणून रवींद्र देसाई व सागर कुलदीप यांनी काम पाहिले, अशी माहिती अविनाश ओंबासे यांनी दिली.

लांब उडीत ठाण्याची श्रद्धा घुले आघाडीवर
ठाणे : लांब उडी या क्रीडा प्रकारात ठाण्याच्या श्रद्धा घुलेने दर्जेदार कामगिरी करत देशाची आघाडीची खेळाडू होण्याच्या दृष्टीने प्रवास सुरू केला आहे. अनेक राष्ट्रीय स्पर्धामध्ये तिने लांब अंतरावर उडी मारत आपला विक्रम प्रस्थापित केले आहेत. १६ ते १९ सप्टेंबर दरम्यान झालेल्या ५५व्या राष्ट्रीय खुल्या अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत ओएनजीसीचे प्रतिनिधित्व करत श्रद्धा घुलेने ६.३८ मीटरवर लांब उडी मारत सुवर्णपदक प्राप्त केले. ६.३८ मीटरवर उडी मारत स्वत:चाच जुना विक्रम तिने मागे टाकला आहे. या वेळी तिच्या तीनही उडय़ा या ६.३४ मीटरच्या पुढेच गेल्या आहेत. यातील मुख्य बाब म्हणजे तिने मायूका जॉनी, एम. ए. प्रजुषा, नीना वी या अन्य स्पर्धकांच्या वैयक्तिक विक्रमांनादेखील मागे टाकले आहे.
२०१४ मध्ये झालेल्या दुखापतीनंतर तिने यशस्वी पुनरागमन केले असून यावर्षी मंगलोर येथे झालेल्या सीनिअर अ‍ॅथलेटिक स्पर्धेत रौप्यपदक मिळवले आहे. तर चेन्नई येथे झालेल्या आंतरराज्य स्पर्धेत तिने सुवर्ण पटकावले आहे. त्यामुळे सातत्यपूर्ण सुवर्ण कामगिरीमुळे देशांतर्गत स्पर्धकांमध्ये या वर्षीची उत्कृष्ट लांब उडी मारणारी स्पर्धक म्हणून श्रद्धाचे नाव पुढे येत आहे, अशी माहिती नीलेश पातकर यांनी दिली.
उर्मिका, निशिकाची जबरदस्त ‘किक’
ठाणे : कोलकाता येथे झालेल्या राष्ट्रीय कॅडेट अ‍ॅण्ड सीनिअर किकबॉक्िंसग स्पर्धेत ठाणे जिल्हा किक बॉक्िंसंग संघटनेच्या निशिका खाडे हिला सुवर्णपदक मिळाले असून तिच्या बरोबरीनेच उर्मिका खाडे हिने चमकदार कामगिरी केली आहे. या स्पर्धेत देशातील २८ राज्ये व ४ केंद्रशासित प्रदेशातील तब्बल १७०० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. एवढय़ा स्पर्धकांत सुवर्णपदक मिळवल्याने निशिकावर अभिनंदनाचा वर्षांव होत आहे. तर मुंबईतील वडाळा येथे पार पडलेल्या ७वी मुंबई शहर जिल्हा वुशू अंजिक्यपद स्पर्धेत उर्मिका खाडे हिला सुवर्ण तर निशिका खाडे हिला कांस्यपदक मिळाले आहे. सलगच्या दोन स्पर्धेत पदक मिळवून चांगली कामगिरी केल्याबद्दल भिवंडीच्या ऑल सेंट्स हायस्कूलच्या उर्मिका खाडे व निशिका खाडे या विद्यार्थिनींचे कौतुक होत असून त्यांना मार्गदर्शन करण्यात संघटनेचे प्रशिक्षक मोहन सिंग यांचा मोलाचा वाटा आहे.
संकलन : संकेत सबनीस