जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत बटरफ्लाय, फ्री स्टाईल, बॅक स्ट्रोक, ब्रेस्ट स्ट्रोक या प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत वाशीतील फादर अ‍ॅग्नेल क्लबने ३८५ गुणांची कमाई करत प्रथम क्रमांक पटकाविला, तर ठाणे क्लबने २७५ गुणांची कमाई करत द्वितीय क्रमांक पटकाविला.
डोंबिवली जिमखाना यांच्या वतीने रविवारी २०व्या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन, डोंबिवली जिमखाना, फादर अ‍ॅग्नेल क्लब वाशी, ठाणे क्लब, हिरानंदानी स्कूल क्लब, नायट्रो क्लब, यश जिमखाना, कल्याण डोंबिवली महानगरपालिका जिमखाना, शैलेश टॉवर ठाणे, वसंत विहार, सिद्धांचल, स्टार फिश, एन.एम.एस.ए. कळवा, एम.एस.एस.पी. क्लब यांसह नवी मुंबईतील काही क्लब सहभागी झाले होते. ५ ते १६ वयोगटातील सुमारे ३५० स्पर्धकांनी यात सहभाग घेतला होता.
बटर फ्लाय, फ्री स्टाईल, बॅक स्ट्रोक, ब्रेस्ट स्ट्रोक आदी प्रकारात त्यांची जलतरण स्पर्धा पार पडली. यात वाशीच्या क्लबने जास्त गुणांची कमाई करत प्रथम क्रमांक पटकाविला, तर ठाणे क्लबने द्वितीय क्रमांक पटकाविला. विजेत्यांना चषक व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
यावेळी अरविंद प्रधान, डॉ. प्रमोद बाहेकर, दिलीप भोईर, दीपक मेजारी आदी मान्यवर उपस्थित होते.

वैयक्तिक उत्कृष्ट संघ
मुलांचा पहिला गट – सिद्धांत खोपडे – १६ गुण – ठाणे क्लब
मुलींचा पहिला गट – सागरिका जैन – १९ गुण – एम.एस.एस.पी क्लब
मुलांचा दुसरा गट – ध्रुव पटेल – २१ गुण – ठाणे क्लब
मुलींचा दुसरा गट – अनया त्यागी – १९ गुण – ठाणे क्लब
मुलांचा तिसरा गट – निधीश म्हापसेकर – १६ गुण – डी.जी.क्लब
मुलींचा तिसरा गट – आर्या क्रिपलानी – २३ गुण – फादर अ‍ॅगनेल क्लब
मुलांचा चौथा गट – अर्थव जारंगे – १७ गुण – एन.एम.एस.ए क्लब
मुलींचा चौथा गट – आभा मिराशी – १६ गुण – ठाणे क्लब
मुलांचा पाचवा गट – अ‍ॅन्ड्रय़ु डाईस – १५ गुण – एन.एम.एस.ए. क्लब
मुलींचा पाचवा गट – राघवी रामानुजन – १८ गुण – ठाणे क्लब
मुलांचा सहावा गट – आदित्य घाग – २० गुण – स्टारफिश क्लब
मुलींचा सहावा गट – विभागून- फादर अ‍ॅगनेल क्लबच्या सौम्या गवाणकर
व तनिष्का साळुंखे – १६ गुण

 

‘स्वच्छ आणि आरोग्यमय कल्याण’साठी मॅरेथॉन
प्रतिनिधी,कल्याण
कल्याण शहरातील ऋतु ग्रुप या गृहसंकुलाच्या वतीने ‘रन फॉर अ क्लीन अ‍ॅंन्ड हेल्दी कल्याण’ या स्पर्धेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत कल्याण-डोंबिवली येथील विविध शाळेचे विद्यार्थी, शहरातील नागरीक असे एकुण २८०० जणांनी सहभाग दर्शवला होता. ३ किमी धावणाऱ्या १४ वर्षांखालील मुलांमध्ये राकेश यादव यांने प्रथम क्रमांक पटकवला तर मुलींमध्ये निशा राई हिने प्रथम क्रमांक पटकवला.त्यानंतर ६ किमी धावणाऱ्या १४ वर्षांखालील मुलांमध्ये विवेक विश्वकर्मा याने तर मुलींमध्ये शितल बोरसे याने प्रथम क्रमांक पटकवला आहे. १० किमी धावणाऱ्या १८ वर्षांवरील मुलांमध्ये शैलेश गनगोडा आणि मुलींमध्ये पुजा वनमोरे हिने प्रथमयेण्याचा मान मिळवला आहे. तर २१ किमी धावणाऱ्या १८ वर्षांवरील मुलांमध्ये सतेंदर सिंग आणि मुलींमध्ये निलम राजपुत हे प्रथम आले.

ठाण्यात महापौर चषक बॅटमिंटन,निमंत्रित मल्लखांब स्पर्धेची सुरुवात
2ठाणे: ठाणे कला क्रीडा महोत्सवांतर्गत महापौर चषक बॅटमिंटन स्पर्धा आणि निमंत्रित राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेचे २ फेब्रुवारी रोजी उद्घाटन झाले. महापौर संजय मोरे आणि विरोधी पक्षनेते संजय भोईर यांच्या हस्ते या स्पर्धाची सुरुवात झाली. बॅटमिंटन स्पर्धा शरदचंद्र पवार क्रीडा संकुल ढोकाळी येथे सुरू आहे. तर मल्लखांब स्पर्धा घंटाळी मैदान येथे होत आहे. या वेळी क्रीडा समिती सभापती संभाजी पंडीत, नौपाडा प्रभाग समिती अध्यक्ष हिराकांत फर्डे, आरोग्य समिती सभापती डॉ. जीतेंद्र वाघ, उपआयुक्त संदीप माळवी ठाणे जिल्हा मल्लखांब संघटनेचे अध्यक्ष चैतन्य सामंत आदी मान्यवर उपस्थित होते.

भोईर जिमखान्यातर्फे जिल्हा क्रीडा पुरस्कार
ठाणे: डोंबिवलीच्या भोईर जिमखान्याचा अभिजीत शिंदे आणि श्रावणी राऊत यांना यंदाचा ठाणे जिल्हा क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात आला. जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांच्या हस्ते साकेत पोलीस मैदानावर झालेल्या कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. अभिजीतने चीन व बेल्जियम येथे झालेल्या वर्ल्ड चॅम्पिअनशिप, राष्ट्रकुल स्पर्धा, आशियाई क्रीडास्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे, तर श्रावणीने पूर्व राष्ट्रकुल स्पर्धा, ज्युनिअर एशियन चॅम्पियनशिप स्पध्रेत भारताचे प्रतिनिधित्व केले.

कशेळी गावात क्रीडानगरीचे लोकार्पण
ठाणे: भिवंडी तालुक्यातील कशेळी गावात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुसज्ज आणि भव्य क्रीडा नगरी उभारण्यात आली असून त्यांचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला. योगा, ओपन जीम, ज्येष्ठ नागरिकांसाठी कट्टा, लहान मुलांसाठी उद्याने तसेच कायमस्वरूपी व्यासपीठ येथे देवानंद थळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपलब्ध झाले आहे. हा उद्घाटन सोहळा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला. आवश्यक सुविधा पुरवण्याचा प्रयत्न येथील ग्रामपंचायत करत असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

श्री शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन
प्रतिनिधी, ठाणे
ठाणे महानगरपालिका व ठाणे जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटनेच्या वतीने ‘ठाणे कला क्रीडा महोत्सव २०१६’ अंतर्गत शनिवार ६ फेब्रुवारी रोजी अठराव्या ठाणे महापौर श्री शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सचिन तेंडुलकर क्रीडा संकुल, महात्मा फुले नगर ठाणे येथे सायंकाळी ६ वाजता ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेच्या प्रवेशिका सचिन तेंडुलकर क्रीडा संकुल येथे सायंकाळी ४ ते ५ च्या दरम्यान मोफत देण्यात येणार असून या स्पर्धेत मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन, ठाण्याचे महापौर संजय मोरे यांनी केले आहे.

सरस्वतीच्या राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार
प्रतिनिधी,ठाणे
1ठाण्यातील सरस्वती क्रीडा संकुलात प्रशिक्षण घेऊन २०१५ च्या राष्ट्रीय स्पर्धामध्ये यशस्वी कामगिरी करणाऱ्या १२ खेळाडूंचा गौरव करण्यात आला. क्रीडा-विज्ञान-सांस्कृतिक केंद्रातर्फे सरस्वती क्रीडा संकुल, ठाणे येथे हा सत्कार करण्यात आला. चेन्नई येथे जानेवारी २०१५ रोजी झालेल्या सबज्युनियर राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक व सप्टेंबर २०१५ विजयवाडा, आंध्र प्रदेश येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकवायचा पराक्रम केलेल्या अपूर्वा पाटील, जैनम धरड, निहार गायकर, प्रथम भोईर, प्रेरणा रिसबूड, साहिल मेंडन यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये गुजरात येथे झालेल्या ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेल्या शिवानी पाटील हिला गौरवण्यात आले. मार्च २०१५ नवी दिल्ली येथे झालेल्या ६३ व्या ऑल इंडिया पोलीस कुस्ती गेमसमध्ये कांस्य पदक व नोव्हेंबर हरयाणा येथे झालेल्या ६४ व्या ऑल इंडिया पोलीस गेम्समध्ये सहभागी झालेला भुपेंद्र राजपूत, देवकी राजपूत, संदेश निमगिरे, दीपश्री कर्वे, जयेश सणस आदी विद्यार्थ्यांचाही या वेळी सत्कार करण्यात आला.

वसंतविहार हायस्कूलची श्री माँ विद्यालयावर मात
ठाणे: एम.सी.ए. ठाणे बदलापूर-भिवंडी विभागीय १६ वर्षांखालील एच. टी. भंडारी आंतरशालेय स्पर्धेच्या उपान्त्य फेरीत ठाण्याच्या वसंत विहार हायस्कूलने ठाण्याच्या श्री माँ विद्यालयाचा सहा गडी राखून पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या स्पर्धेत श्री माँ विद्यालयाने पहिल्या डावात १५८ धावा केल्या व दुसऱ्या डावात ११०धावा काढल्या तर वसंत विहार हायस्कूलने पहिल्या डावात १५९ धावा तर दुसऱ्या डावात १११ धावा काढून उपान्त्यफेरीत जाण्याचा मान पटकविला आहे.

चोईक्वान्ग्दो स्पर्धेत समीरा कुलकर्णीला कांस्य
ठाणे : पंजाब येथे जानेवारीच्या शेवटच्या आठवडय़ात आयोजित राष्ट्रीय चोईक्वान्ग्दो स्पर्धेत मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स या महाविद्यालयाच्या समीरा कुलकर्णी हिने कांस्य पदक मिळवले. समीरा ही अकरावीत शिकत आहे. ती राज्यस्तरीय स्पर्धेत १९ वर्षांखालील गटात सुवर्णपदकाची मानकरी ठरली होती. त्यानंतर तीचा राष्ट्रीय पातळीवर पंजाब येथे होणाऱ्या चोईक्वान्ग्दो स्पर्धेत प्रवेश झाला. जालन्याला झालेल्या राज्यस्तरीय चोईक्वान्ग्दो स्पर्धेत समीराबरोबरच धनेश माने यानेही सुवर्णपदक मिळवले होते. तसेच १७ वर्षांखालील गटात अक्षय राजपुरे, स्नेहल पडते, कुंजल महाजन हे सुवर्णपदकाचे मानकरी ठरले होते. ठाण्यातील ट्रेडिशनल स्पोर्ट्स अकादमीच्या सुनील काशिद यांनी प्रशिक्षण दिले.