News Flash

खेळ मैदान : अंबरनाथवर ‘फुटबॉल ज्वर’

स्पर्धेत एकूण २४ सामने रंगणार असून अंतिम सामना २४ जानेवारी २०१६ ला पार पडणार आहे.

अंबरनाथ फुटबॉल युनायटेडतर्फे येथील ऑर्डनन्स फॅक्टरीच्या ओएफओ मैदानावर यंदाही फुटबॉल लिगचे आयोजन करण्यात आले आहे.

अंबरनाथ : अंबरनाथ फुटबॉल युनायटेडतर्फे येथील ऑर्डनन्स फॅक्टरीच्या ओएफओ मैदानावर यंदाही फुटबॉल लिगचे आयोजन करण्यात आले आहे. १ नोव्हेंबरपासून ही स्पर्धा सुरू झाली असून या स्पर्धेत दर रविवारी फुटबॉलचे सामने रंगत असून पुढील तीन महिने ही स्पर्धा सुरू राहणार आहे. स्पर्धेत एकूण २४ सामने रंगणार असून अंतिम सामना २४ जानेवारी २०१६ ला पार पडणार आहे. लिगमध्ये एकूण १० संघांचा समावेश करण्यात आला आहे. प्रत्येक संघात २० खेळाडूंचा सहभाग करण्यात आला आहे. एका सामन्यात एका वेळी एका संघाकडून ११ खेळाडू मैदानात उतरू शकतात. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्यात येणाऱ्या १०० बाय ६० मीटर आकाराच्या मैदानावर हे सामने होत आहेत. गेल्या रविवारी एनएफएस क्लब आणि युनायटेड क्लब यांच्यात रंगलेल्या फुटबॉल स्पर्धेत एनएफएसने सामन्यावर एकतर्फी वर्चस्व ठेवत ४-१ ने बाजी मारली. ‘लव्ह गॉड’ या अनाथ आश्रमातील मुलांना हा सामना पाहण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते.

अंबरनाथमधील मुलांना हॉकीचे प्रशिक्षण द्यायचेय!
अर्जुन पुरस्कारप्राप्त मेर्विन फर्नाडीस यांची इच्छा
अंबरनाथ : मोठे होण्यासाठी मोठय़ा शहरात जन्म घेण्याची अजिबात आवश्यकता नाही लहान शहरात जन्म घेऊनही आपले आणि आपल्या शहराचे आपल्या देशाचे नाव मोठे करता येते हा माझा अनुभव आहे, असे सांगून अंबरनाथ शहरात लहान मुलांना हॉकीचे प्रशिक्षण देण्यासाठी कोणी पुढाकार घेत असेल तर त्यासाठी शक्य ते सर्व सहकार्य करण्याची माझी इच्छा आहे. असे प्रतिपादन अर्जुन पुरस्कारप्राप्त जागतिक दर्जाचे हॉकीपटू मेर्वीन फर्नाडीस यांनी सांगितले. रोटरी कॉलेज ऑफ क्लब लीडर्सचे अध्यक्ष सुनील चौधरी यांच्या उपस्थितीत मेर्विन फर्नाडीस यांचा सत्कार शनिवारी करण्यात आला. ‘अंबरनाथसारख्या अगदी लहान शहरात शिकताना या शहराने हॉकीसाठी प्रोत्साहन दिले आणि मी जागतिक पातळीवर खेळू शकलो. तीन वेळा ऑलिम्पिक आणि अन्य अांतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये भारताचे यशस्वी नेतृत्व केले. त्यामुळे आपण लहान किंवा मोठय़ा शहरात जन्मलो किंवा शिकलो याला फारसे महत्त्व नसून आपण किती आणि कशी मेहनत करतो, यावर सारे अवलंबून आहे,’ असे मेर्विन यांनी सांगितले.
‘मी पाच वर्षांचा असताना फातिमा हायस्कूलच्या रस्त्यावर काठीने चेंडू टोलावीत होतो ते माझ्या वडिलांनी पहिले आणि त्यांना जाणवले की मी हॉकीपटू होऊ शकतो. त्यांनी लगेच आपणास हॉकीची स्टिक आणून दिली. माझे नाव मुंबईच्या हॉकी प्रशिक्षण केंद्रात घालण्यात आले. तेव्हा मी एकटा हॉकीचे किट घेऊन अंबरनाथ ते मुंबई असा प्रवास करायचो,’ अशी आठवणही मेर्विन यांनी या वेळी सांगितली.

रग्बी स्पर्धेत बदलापूर व शहाड येथील शाळांचे वर्चस्व
कल्याण : मुंबई जिल्हा रग्बी असोसिएशन यांच्यातर्फे शहाड येथे घेण्यात आलेल्या मुंबई विभाग स्तरीय रग्बी स्पर्धा पार पडली. १७ व १९ वर्षांखालील मुला-मुलींसाठी झालेल्या या स्पर्धेत मुंबई परिक्षेत्रातील शाळा व महाविद्यालये आदींनी सहभाग घेतला होता. या वेळी सेंच्युरी रेयॉन शाळेच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धामध्ये १७ वर्षांखालील मुलांच्या गटात सेंच्युरी रेयॉन शाळेने प्रथम क्रमांक पटकावला तर, १७ वर्षांखालील मुलींच्या गटात योगी श्री अरविंद गुरुकुल शाळेने प्रथम क्रमांक मिळवला आहे. १९ वर्षांखालील मुलांच्या व मुलींच्या दोन्ही गटांत मुंबईच्या सिद्धार्थ महाविद्यालयाने बाजी मारली आहे. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंना २१ व २२ नोव्हेंबरला नागपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय रग्बी स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.

हिमानी, जनक, प्रीतेश यांना सुवर्ण
ठाणे : नांदेड येथे महाराष्ट्र ज्युडो असोसिएशनतर्फे महाराष्ट्र राज्य कॅडेट व ज्युनियर ज्युदो अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या वेळी २८ जिल्ह्यातील सुमारे ४५० खेळाडू हे १५ ते १७ (कॅडेट) आणि १७ ते २१ (ज्युनियर) या वयोगटातील एकूण ३४ वजनी गटात सहभागी झाले होते. या वेळी सुमारे ५० पंचांनी स्पर्धा व्यवस्थापनाचे काम पाहिले. सदर स्पर्धेत डोंबिवलीच्या व्हिक्टरी ज्युदो क्लबच्या खेळाडूंनी ठाणे जिल्ह्य़ाचे प्रतिनिधित्व करत सुयश संपादन केले. हिमानी गांवकर व जनक ढोकरट यांनी कॅडेट गटात तर प्रीतेश गांवकर यानी ज्युनियर गटात सुवर्ण पदक पटकाविले आणि राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात आपले स्थान निश्चित केले आहे. या राज्यस्तरीय स्पर्धेत कॅडेट गटातील मानस भोळेला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले तर कॅडेट गटातच प्रियांका गुप्ता हिला कांस्य पदकापर्यंत मजल मारता आली. ही राष्ट्रीय स्पर्धा १९ ते २२ नोव्हेंबरदरम्यान वडोदरा, गुजरात येथे ज्युदो फेडरेशनच्या आधिपत्याखाली होणार आहे, अशी माहिती प्रशिक्षक लीना ओक मॅथ्यू यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2015 2:00 am

Web Title: sports events in thane
Next Stories
1 ऐतिहासिक वारसा धोक्यात! नालासोपाऱ्यातील अडीच हजार वर्षे जुन्या बौद्धस्तुपाची दुरवस्था
2 ‘डी मार्ट’च्या लिफ्टमध्ये बालकासह नऊ जण अडकले
3 बंद लॅपटॉप.. मोबाइल कचरापेटीत टाका!
Just Now!
X