ठाण्याची करुणा वाघमारे ‘मिस महाराष्ट्र’
डोंबिवली :जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत ठाणे जिल्हय़ाने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले असून या स्पर्धेत जिल्हय़ाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या डोंबिवलीच्या अक्षय मोगरकर याने ‘महाराष्ट्र श्री’, तर ठाण्याच्या करुणा वाघमारे हिने ‘मिस महाराष्ट्र’चा किताब पटकाविला. या स्पर्धेतील विजेते खेळाडू आता ‘भारत श्री’ स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व करणार आहेत.
महाराष्ट्र आणि ठाणे जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेच्या वतीने कल्याण शहरामध्ये शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कल्याण येथील स्पोर्ट्स क्लबच्या मैदानामध्ये या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या २३ जिल्हय़ांतून तब्बल २३० खेळाडू सहभागी झाले होते. या लढतीमध्ये डोंबिवलीच्या अक्षयने अन्य स्पर्धकांवर मात करत ‘महाराष्ट्र श्री’ किताबावर आपले नाव कोरले, तर ठाण्याच्या करुणा हिने सलग चौथ्यांदा ‘मिस महाराष्ट्र’चा किताब पटकाविण्याची किमया केली आहे. या स्पर्धेचे सांघिक विजेतेपदाचे मानकरी होण्याचा मानही ठाणे जिल्हय़ाला मिळाला आहे. विविध प्रकारच्या आठ वजनी गटांत ही स्पर्धा घेण्यात आली. प्रत्येक गटातील विजयी स्पर्धक उत्तर प्रदेश येथे होणाऱ्या ‘भारत श्री’ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करणार आहेत. या संघात ५५ किलो वजनी गटात संदीप पाटील, ऋषिकांत घुडे, ६० किलो वजनी गटात अमिश पांडे, कैलास तेलंगे, ६५ किलो वजनी गटात संतोष शुक्ल, जगेश बाईत, ७० किलो वजनी गटात राजेंद्र रावळ, जितेंद्र ढोणे, ८० किलो वजनी गटात प्रेम राठोड, ८५ पेक्षा अधिक गटात अक्षय मोगरकर आणि सागर माळी आदी विजेत्यांचा समावेश असणार आहे.

संगीत चौहानचे शतक
प्रतिनिधी, ठाणे</strong>
कै. अरविंद धाक्रस स्मृती चषक २०-२० स्पर्धेत १२ वर्षांखालील वयोगटात संतोष स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीने डोंबिवली बॉय या संघावर ५४ धावांनी मात करत विजय मिळविला. या स्पर्धेत संतोष स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी संगीत चौहान याने १३९ धावा काढून विक्रम केला आहे.
कै. अरविंद धाक्रस यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ २०-२० स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत संगीत चौहान याने शतक करत नाबाद खेळी केली. संगीत चौहान याने ७८ चेंडूंमध्ये नाबाद १३९ धावा केल्या असून यामध्ये २३ चौकार आणि दोन षटकारांचा समावेश आहे. या सर्व कामगिरीमध्ये त्याला राज पाटील आणि यश जाधव यांनी मोलाची साथ दिली. यामुळेच संतोष स्पोर्ट्स क्रिकेट अ‍ॅकॅडमीने डोंबिवली बॉय या प्रतिस्पर्धी संघापुढे विजयासाठी २२७ धावांचे आव्हान उभे करत विजय संपादन केला. संतोष स्पोर्ट्स क्रिकेट अ‍ॅकॅडमीचे प्रशिक्षक विवेक मोकाशी आणि संतोष पाठक यांनी खेळाडूंचे कौतुक केले आहे.

आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत के. सी. गांधी हायस्कूलची बाजी
प्रतिनिधी, ठाणे
कल्याण येथील के.सी. गांधी हायस्कूलच्या क्रिकेट संघाने ठाण्याच्या वसंत विहार हायस्कूल संघाचा सात धावांनी पराभव करून विजय मिळविला. के.सी. गांधी हायस्कूलच्या आकाश सिंग याने फलंदाजीत चार चौकारांसह २७ धावा तसेच १५ धावांत तीन बळी घेऊन अष्टपैलू चमक दाखविली. त्यामुळे संघाच्या विजयासाठी त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. या स्पर्धेमध्ये गोविंद पाटील स्मृती चषक देऊन आकाशला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.
मुरबाड येथील साळगावकर ग्रीन स्पोर्ट्सच्या मैदानावर साळगावकर स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सर्वोत्तम गोलंदाज हा किताब वसंत विहार हायस्कूलच्या अथर्व अचरेकर, सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून के.सी. हायस्कूलच्या जयकूल गिरासे, तर स्पर्धावीर म्हणून वसंत विहार हायस्कूलच्या ऋषी भोसले यांना देण्यात आला. ही स्पर्धा १३ वर्षांखालील शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली होती. या वेळी रत्नाकर उपासनी व गिरीश तांबे यांनी पंच म्हणून काम पाहिले. अ‍ॅड. शंतनू फणसे, ज्येष्ठ क्रिकेटपटू सदानंद बुंदे, ज्येष्ठ क्रिकेट प्रशिक्षक किरण साळगावकर यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली.