औद्योगिक वसाहतींत रात्री गस्तीसाठी पथके

अंबरनाथ आणि बदलापूर शहरांतील औद्योगिक वसाहतींतील कारखान्यांतून रात्रीच्या वेळेस रासायनिक सांडपाणी नाले तसेच नदीत टाकले जात असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. हे प्रदूषण रोखण्यात अपयशी ठरत असल्याबद्दल टीका होऊ लागल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आता रात्रीच्या वेळी औद्योगिक वसाहतींच्या परिसरातून गस्त घालण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पथके स्थापन करण्यात येत असून रासायनिक सांडपाणी विसर्गाच्या तक्रारी येताच घटनास्थळी धाव घेऊन हे पथक कारवाई करणार आहे.

गेल्या काही वर्षांत अंबरनाथ आणि बदलापूर शहरांतील औद्योगिकवसाहती त्यांच्या प्रदूषणकारी उपद्व्यापांमुळे चर्चेत आल्या. सांडपाण्यावर प्रक्रिया न करता ते कंपनीच्या आवारात मुरवणे, नाल्यात सोडणे असे प्रकार समोर आल्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने अशा कंपन्यांवर बंदीची कारवाई करण्यात आली. मात्र धरणक्षेत्रात रासायनिक कचरा टाकणे, वालधुनी नदीपात्रात रसायने सोडणे, उल्हास नदीत रसायने सोडणे, विविध नाल्यांत रासायनिक सांडपाणी सोडणे, कंपन्यांतून वायू सोडणे असे प्रकार सुरूच आहेत. याबाबत जागरूक नागरिक वा सामाजिक संस्थांनी तक्रारी केल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचेपर्यंत प्रदूषणाची तीव्रता कमी झालेली असते. त्यामुळे अशा घटनांवर तात्काळ कारवाई करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने आता कंबर कसली आहे. त्यासाठी रात्रीच्या वेळी गस्त घालणाऱ्या पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यात दोन उपविभागीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. रात्री नऊनंतर हे पथक अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर शहरातील नाले, नद्यांमध्ये पाणी विसर्ग करण्याची ठिकाणे आणि औद्योगिक वसाहतीत गस्त घालत असतात.

सध्या प्रायोगिक तत्त्वावर हे पथक नेमण्यात आले असून भविष्यात गरज पडल्यास हे पथक कायमस्वरूपी नेमण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे मंचक जाधव यांनी दिली आहे. गेल्या पाच दिवसांत रात्रीच्या वेळी कानसई भागात नाल्यात दुर्गंधी पसरल्याची बाब समोर आली होती. त्यामुळे गस्त पथकाचे काम योग्यरीत्या सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.