कल्याण-शिळफाटा रस्त्यावर कामांना प्रारंभ

कल्याण : गेल्या महिनाभरापासून प्रवाशांच्या त्रासाचे कारण ठरलेल्या कल्याण-शिळफाटा मार्गावरील खड्डे बुजविण्याच्या कामासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाने अखेर तीन पथके कायमस्वरूपी तैनात ठेवली आहेत. या ठिकाणी पावसाचा अंदाज घेऊन खड्डे भरण्याची कामे सुरू करण्यात आली आहेत. याशिवाय या रस्त्याच्या काही भागांत डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे, अशी माहिती ‘महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा’चे मुख्य अभियंता शशिकांत सोनटक्के यांनी दिली.

गेल्या दोन दिवसांपासून कल्याण-शिळफाटा रस्त्यांवरील खड्डय़ांमुळे खासदार डॉ. श्रीकांत िशदे आणि मनसे आमदार राजू पाटील यांच्यात ‘ट्विटर’युद्ध सुरू आहे. सत्ताधारी शिवसेनेसाठी हा मुद्दा प्रतिष्ठेचा ठरू लागला असून थेट खासदारांवर यासंबंधी टीका होऊ लागल्याने खडबडून जागे झालेल्या रस्ते विकास महामंडळाने उशिरा का होईना येथील खड्डे बुजविण्यासाठी कायमस्वरूपी पथक तैनात केले आहे. भिवंडी बाह्य़वळण रस्ता-दुर्गाडी ते शिळफाटा अशा ठिकाणी ठरावीक टप्प्यावर खड्डे भरण्यासाठी ही तीन पथके तैनात करण्यात आली आहेत. या पथकांवर नियंत्रक म्हणून वरिष्ठ अभियंत्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या पथकांकडे कामगारांना घेऊन जाण्यासाठी वाहन, खडी, ग्रीटचा डम्पर, रोलर, खड्डे भरण्यासाठीचे अत्यावश्यक साधने, तीन जेसीबी देण्यात आली आहेत.

मुसळधार पाऊस सुरू असेल तर रिक्षा, दुचाकी खड्डय़ात आपटू नये, अपघात टाळण्यासाठी खड्डे खडी, ग्रीटच्या साहाय्याने भरले जातात. पाऊस थांबला असेल तर कोल्ड मिक्स (सिमेंटचे रासायनिक मिश्रण) वापरून खड्डे भरले जात आहेत. मोठे खड्डे असतील तर अवजड वाहनांच्या सततच्या वर्दळीने ते मोठे होत जातात. ते टाळण्यासाठी पेव्हर ब्लॉकचा वापर केला जातो, असे मुख्य अभियंता सोनटक्के यांनी सांगितले. काही ठिकाणी आजूबाजूचे पाणी रस्त्यावर येण्याची शक्यता असते. त्या पाण्याचा प्रवाह बदलणे किंवा मोठय़ा खड्डय़ात साचलेले पाणी बाजूला काढणे ही कामे तीन जेसीबींच्या माध्यमातून सुरू आहेत, असे ते म्हणाले.

नोकरदार, भाजी-दूधविक्रेत्यांची कोंडी

कल्याण-शिळफाटा रस्त्यावरून कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी या रस्त्याच्या बाजूला असलेला निळजे, घेसर, घारिवली, काटई, देसलेपाडा, खिडकाळी भागातील रहिवासी आपली दुचाकी, चारचाकी वाहने घेऊन शिळफाटा रस्त्याकडे गावातील रस्त्यावरून येतात. पण शिळफाटा रस्ता वाहन कोंडीने भरलेला असल्याने गावातून कामाच्या ठिकाणी निघालेले नोकरदार, दूध विक्रेते, भाजीपाला विक्रेते गावाच्या वेशीवरील रस्त्यावर एक ते दीड तास अडकून पडतात. अनेक नोकरदारांना कामाच्या ठिकाणी वेळेत पोहचणे मुश्कील होऊन जाते, असे निळजेतील एक नोकरदार सुनील पाटील यांनी सांगितले.

पावसाचा अंदाज घेऊन कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील खड्डे भरणे, डांबरीकरण ही कामे सुरू केली आहेत. या रस्त्यावरील वाहनांचे प्रमाण अधिक असल्याने काम करताना अडचणी येतात.

-शशिकांत सोनटक्के, मुख्य अभियंता, ‘एमएसआरडीसी’