नालासोपारा येथे प्रवाशांच्या अडचणींत भर

नालासोपारा पश्चिमेला असलेल्या एसटी आगारात बेकायदा वाहनतळ तयार करण्यात आले आहे.  त्यामुळे एसटी बसचालकांना वाहन चालविण्यासाठी जिकीरीचे ठरत आहे. त्याचा धोका प्रवाशांना निर्माण झाला आहे. आगारानजीक रेल्वे स्थानक असल्याने या भागातून मोठय़ा संख्येने प्रवासी ये-जा करीत असतात, परंतु आगार परिसरात खासगी वाहने उभी केली जात आहेत. त्यामुळे बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अडचणी निर्माण होत आहेत.

एसटी आगारात खासगी वाहने उभी करण्यास बंदी घातली असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. काही दिवसांपूर्वी एसटी महामंडळाच्या वतीने बेकायदा पद्धतीने वाहने उभी करताना रोखण्यासाठी सुरक्षा रक्षक नेमण्यात आला होता. त्यावर वाहतूक पोलिसांनीही यावर कारवाई करण्यास सुरुवात केली होती, मात्र ही कारवाई मध्येच थंडावली. त्यामुळे पुन्हा आगाराच्या परिसरात खासगी वाहने उभी केली जात आहेत. याबाबत प्रवाशांनी आगार व्यवस्थापनाकडे तक्रार केली आहे. या आगारात रोज शेकडो दुचाकी आणि चारचाकी वाहने बेकायदा पद्धतीने उभी केलेली असतात. त्यातच रिक्षाचालकही थेट आगारात घुसत आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या अडचणीत आणखीनच भर पडली आहे.

आगारात खासगी वाहने उभी केली जात आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी वाहतूक विभागाला पत्र देण्यात आले आहे. याशिवाय आगार व्यवस्थापनाकडूनही कारवाई केली जात आहे. -प्रज्ञा सानप, आगार व्यवस्थापक नालासोपारा

आगारात जी बेकायदेशीर  वाहने उभी केली जात आहेत त्यांच्यावर ई-चलानद्वारे कारवाई सुरू आहे, मात्र वाहतूक विभागाकडे टोईंग व्हॅन नसल्याने  कारवाई करण्यासाठी अडचणी येत आहेत. -विलास सुपे , वाहतूक पोलीस निरीक्षक वसई