News Flash

एसटी स्थानकात दुर्घटनेची ‘छाया’

गेल्या काही वर्षांत येथील इमारतीची दुरवस्था झाली आहे. या इमारतीला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत.

एसटी स्थानकाच्या इमारतीला जागोजागी तडे गेले आहेत.

तडे गेलेली इमारत, गळके छप्पर यांमुळे प्रवासी हैराण

ठाणे : गळके छप्पर, त्यातून निखळणारे प्लास्टर, इमारतीला गेलेले तडे अशा अवस्थेत असलेल्या राज्य परिवहन मंडळाच्या (एसटी) ठाणे येथील स्थानकातून ये-जा करणारे प्रवासी दररोज जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावरही असुरक्षिततेची चिंता स्पष्टपणे दिसते. मात्र तरीही या स्थानकाचा पुनर्विकास करण्याची घोषणा करणाऱ्यांना त्या कामासाठी मुहूर्त मिळालेला नाही.

ठाणे रेल्वे स्थानकाजवळ असणाऱ्या एसटी स्थानकातून भिवंडी वाडा, जव्हार, वसई-विरार, भाईंदर, बोरिवली, डहाणू या भागांत जाणाऱ्या बसगाडय़ा सुटतात. या बस स्थानकात दररोज हजारो प्रवासी आणि शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी प्रवास करतात. गेल्या काही वर्षांत येथील इमारतीची दुरवस्था झाली आहे. या इमारतीला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. तसेच इमारतीच्या छताचे प्लास्टर अनेक ठिकाणी निखळले आहे. त्यामुळे येथे बसगाडय़ांची प्रतीक्षा करत उभे राहणेही प्रवाशांना धोक्याचे वाटू लागले आहे.

स्थानक इमारतीच्या पहिल्या मजल्यावर एसटीचे कर्मचारी काम करत असतात. या इमारतीची पूर्णपणे दुर्दशा झाली आहे. त्यामुळे ती कधीही कोसळेल, अशी भीती कर्मचारी व्यक्त करत आहेत. या समस्येविषयी राज्य परिवहन मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंग देओल यांना विचारले असता आम्ही ठाणे बस स्थानकाचा विकास करण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.

पुनर्विकास रखडला

कल्याण एसटी स्थानक परिसर आणि कल्याण रेल्वे स्थानक परिसराचा विकासकल्याण-डोंबिवली महापालिका, एमएमआरडीए (मेट्रो प्रकल्प) आणि मध्य रेल्वे प्रशासन या तिन्ही संस्था मिळून स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत करणार आहेत. त्याच धर्तीवर ठाणे एसटी स्थानकाचाही पुनर्विकास करण्याचे नियोजन होते. मात्र नियोजनाचे हे गाडे अजूनही पुढे सरकलेले नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2019 3:34 am

Web Title: st bus depot near thane station in bad condition zws 70
Next Stories
1 बुरखा परिधान करून पळून जाणाऱ्या अल्पवयीन मुलासह तरुणी ताब्यात
2 कोटय़वधी खर्च करूनही पूल निष्क्रिय
3 संगीतसरींनी मीरा-भाईंदरकरांची श्रावण संध्याकाळ चिंब
Just Now!
X