News Flash

चर्चेतील चर्च : शंभरीतले प्रार्थनास्थळ

एखाद्य नववधू साजशृंगार करून मोठय़ा दिमाखात उभी राहावी, तसे गिरीज चर्च मोठय़ा ऐटीत उभे राहिले आहे.

संत फ्रान्सिस झेविअर चर्च, गिरीज

एखाद्य नववधू साजशृंगार करून मोठय़ा दिमाखात उभी राहावी, तसे गिरीज चर्च मोठय़ा ऐटीत उभे राहिले आहे. शुभ्र कांती आणि उत्तम स्थापत्य कला यामुळे हे प्रार्थनास्थळ खूपच अप्रतिम वाटते. ‘संत फ्रान्सिस झेविअर चर्च’ या नावाने असलेले हे प्रार्थनास्थळ यंदा १०० वष्रे पूर्ण करत आहेत. शताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने या चर्चचे नूतनीकरण करण्यात आले असून हे डौलदार चर्च सर्वाचेच लक्ष वेधून घेत आहेत.

वसई-अर्नाळा रस्त्यावरून जाणारा प्रत्येक प्रवासी या चर्चकडे हटून पाहतो. नव्हे त्याचे लक्ष त्या चर्चच्या दर्शनी भागाकडे वेधले जाते. त्या चर्चच्या दर्शनी भागावर शब्द आहेत ते बायबलमधील. ‘माणसा तू सारे जग कमावलेस आणि आत्मा गमावलास तर त्याचा काय फायदा!’ या वाक्याने येणारी-जाणारी सर्वच अंतर्मुख होतात. बायबलमधील या एका वाक्याने संत फ्रान्सिस झेविअर यांना भारावून टाकले होते. प्राध्यापक असलेले फ्रान्सिस झेविअर हे नोकरीला लाथ मारून ख्रिस्ती धर्मगुरू होण्यासाठी पुढे सरसावले. धर्मगुरू होऊन ते भारतात आले. त्यांची कुड अद्यापही गोव्यात आहे, ती भाविकांना पाहण्यासाठी दर दहा वर्षांनी उघडी केली जाते. विविध देशांचे, विविध वेशांचे, विविध पेशांचे श्रद्धावंत लोक ती पाहण्यासाठी जातात. हे संत फ्रान्सिस झेविअर आहे याच गिरीज चर्चचे आश्रयदाते. म्हणून बायबलमधील ज्या वाक्यांनी त्यांना मंत्रमुग्ध केले, तेच वाक्य गिरीज चर्चच्या दर्शनी भागावर लिहिले गेले आहे. येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाला आत्मचिंतन करायला ते प्रवृत्त करते.

वसई आणि आगाशी हा जो दक्षिणोत्तर रास्ता आहे. त्या रस्त्याच्या दोन्ही अंगाला ख्रिस्ती भाविक गेली चार शतके वस्ती करून आहेत. पूर्वेकडील मंडळी सांडोर चर्चचा लाभ घेत होती, तर पश्चिमेकडील मंडळी दर रविवारी मर्सेस चर्चला जात होती. या दोन्ही पट्टय़ातील लोकांचे सर्व धार्मिक विधी या दोन चर्चमध्ये होत असते. परंतु त्यांना त्यांची चर्च फार दूरवर वाटे  म्हणून त्यांची अडचण दूर कारण्यासाठी वरिष्ठांनी गिरीज या गावात एक नवीन चर्च उभारण्याचा मनोदय व्यक्त केला. शंभर वर्षांपूर्वी गिरीज चर्चची उभारणी झाली. आज वसई पंचक्रोशी हा एक स्वतंत्र धर्मप्रांत झाला आहे. परंतु शंभर वर्षांपूर्वी वसई हा भाग दमणच्या बिशपांच्या आधिपत्याखाली होता. १०० वर्षांपूर्वी दमणचे बिशप डॉम सॅबेस्टियो जोस परेरा यांच्या नेतृत्वाखाली गिरीज धर्मग्रामात एक फादर नेमण्यात आले. त्यांचे नाव होते फादर अगस्टीन डिसूझा. त्यांनी या चर्चची उभारणी केली.

शिक्षण संस्थेची उभारणी

गेल्या १०० वर्षांच्या प्रवासात या चर्चमध्ये अनेक धर्मगुरू येऊन गेले आहेत. त्यांनी या चर्चमध्ये उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यात एका धर्मगुरूचा उल्लेख न करून चालणार नाही. त्यांचे नाव होते फा. पीटर परेरा. ते मूळचे वांद्रा येथील. १९४० मध्ये गिरीज चर्चचे ते प्रमुख झाले. या गावात पाऊल टाकताच त्यांच्या चाणाक्ष नजरेस असे दिसून आले की, गिरीज कडची तरुण मंडळी बुद्धिवादी आहेत. पण त्यांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध नाही. त्यांना शालेय शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी संत फ्रान्सिस झेवियर या नावाने १९४२ साली एक शिक्षण संस्था उभी केली. त्यात सातवीपर्यंतचे वर्ग भरले जात. फादरांची बदली कुर्ला येथे झाली. कुर्ला येथील ‘अ‍ॅटॉमिक वर्क्‍स’मध्ये गिरीजमधील अनेक तरुणांना नोकऱ्या मिळाल्या, याचे श्रेय परेरा यांना जाते. गावातील गरिबी दूर करण्यास नोकरीचा नवा मार्ग मिळाला. ज्या काळात गिरीज येथे प्रामुख्याने शेती बागायत होती. त्या वेळेला येथील मंडळी नोकरीनिमित्ताने मुंबईकडे जाऊ लागली.

दोन धर्मगुरू

आज या चर्चमध्ये दोन धर्मगुरू कार्यरत आहेत. प्रमुख धर्मगुरू फा. अब्राहम गोम्स आणि साहाय्यक धर्मगुरू फा. ओनील फरोज. त्यांच्या अथक परिश्रमातून त्यांनी आज नवे उत्पादन केले आहे आणि हे चर्च शताब्दी सोहळ्यासाठी नटूनथटून सज्ज झाले आहे. गावाचा विकास करण्यासाठी वेगवेगळी मंडळे या चर्चमध्ये आहेत. त्याच्यात ड्रमिटक क्लब व नूतन मंडळ याचा उल्लेख वारंवार केला जातो. या चर्चअंतर्गत आज ८८८ कॅथलिक कुटुंबे येत असून त्यांची लोकसंख्या ३४४२ आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2016 3:10 am

Web Title: st francis xavier church giriz
Next Stories
1 महाविद्यालयीन तरुणाईचा ‘बोल्ड’ अंदाज
2 संमेलनासाठी परीक्षांचे वेळापत्रक बदलणार?
3 ‘आयसिस’मध्ये गेलेला कल्याणचा तरुण ठार
Just Now!
X