24 February 2021

News Flash

चर्चेतील चर्च : दोन पिढय़ांच्या परिश्रमाचे फळ

उमराळे हे गाव परूवपार सोपारा या ऐतिहासिक बंदराला खेटून बसले आहे.

संत जोसेफ चर्च, उमराळे

संत जोसेफ चर्च, उमराळे

उमराळे हे गाव परूवपार सोपारा या ऐतिहासिक बंदराला खेटून बसले आहे. या ऐतिहासिक बंदरात १३ व्या शतकात संत थॉमस या येशूच्या प्रेषिताला समर्पित केलेले एक चर्च होते, पण ते काळाच्या ओघात नामशेष झाले. उमराळे परिसरातील ख्रिस्ती भाविक १५७३ पासून नंदाखाल येथील ‘पवित्र आत्म्याचे चर्च’ येथे प्रार्थना करण्यासाठी जायचे. पावसा-पाण्यात शेताच्या उघडय़ा शिवारातून भिजत जायची कसरत त्यांना करावी लागे. गावात एखादा अंत्यविधी असला म्हणजे ते प्रेत नंदाखाल येथे पोहोचविण्यासाठी व ते पुरण्यासाठी उमराळवासीयांना ज्या परिस्थितीला सामोरे जावे लागे, त्याला काही सीमाच नव्हती. दोन-अडीच किलो मीटर अंतरावर असलेली नंदाखालची शाळा हीदेखील जशी बाळगोपाळांना दूरवरची व गैरसोयीची म्हणून गावातील लोकांनी गावातील चर्चला आणि शाळेला जर अग्रस्थान दिले असेल तर ते समजण्याजोगे होते. त्यातून जन्म झाला तो संत जोसेफ या संस्थेचा.

‘रोम वोज नॉट बिल्ट इन अ डे’ असे म्हटले जाते. तसेच कोणतेही चर्च हे काही एका दिवसांत अथवा एका पिढीत एका वर्षांत जन्माला येत नाही. उमराळे चर्चच्या वास्तूला उभे राहण्यात जवळजवळ ५२ वर्षांचा म्हणजेच २ पिढय़ांचा कालावधी जावा लागला तो या मुळेच.

१९४४ या वर्षी फादर रेमंड मेंडिस या नंदाखाल येथील धर्मगुरूने उमराळे या गावामध्ये एक छोटेखानी कारवीचे चर्च उभे केले. रविवारी चर्च आठवडाभर शाळा अशी ही छोटीशी वास्तू. मात्र तीस-पस्तीस वर्षे झाली तरी, चर्च तसे काही आकार घेत नव्हते. तब्बल ३६ वर्षांनी या गावाला फादर ऑस्कर कोलासो या नावाचा एक भाग्यविधाता मिळाला. त्याने गावामध्ये नवा हुरूप निर्माण केला. गावातील अल्प भुधारकांनादेखील आपल्या जमिनी फादर यांना द्यायला सुरुवात केली. केवळ चर्चसाठीच नव्हे तर शाळेसाठी व दफनभूमीसाठी लागणारी पुरेशी जमीन ग्रामस्थांनी उपलब्ध करून दिली. लोकांचे सहकार्य व उत्साह यामुळे हे कार्य मोठय़ा वेगाने पार पडले. फादर ऑस्कर यांच्या जोडीला ई. एस. अंद्रादिस हे मान्यवर कॉन्ट्रॅक्टर ही पुढे आले. निधी जेव्हा अपुरा पडे तेव्हा तेव्हा अंद्रादिस सढळ हस्ते मदत करीत. जवळजवळ १५ लाखांचा निधी खर्च करून १९८० च्या दशकात हे चर्च पूर्ण झाले. ९ मार्च १९८० रोजी आर्च बिशप सायमन पिमेंटा यांच्या शुभ हस्ते या वास्तूचा कोनशिला समारंभ झाला होता. त्यांच्याच हस्ते थोडय़ाशा अवधीतच त्यांना या चर्चचे शिरोशीला पाहण्याचेही भाग्य लाभले. ग्रामस्थांनी केलेल्या सहकार्याला तोडच नाही. जशी अंगमेहनत त्यांनी केली, तशीच त्यांनी पैशाचीदेखील उभारणी केली. मोत्या मास्तरसारखे सरपंच हे या गावाला लाभले होते. तसेच गाब्रियल घोन्साल्विस सारखी व्यक्ती एअर इंडियामध्ये कामाला होती. त्यांनीही रात्रंदिवस केलेल्या श्रमाला गोड फळे आली. ती गेली कित्येक वर्षे या धर्मग्रामातील जवळजवळ तीन हजार लोक चाखत आहेत. आज चर्चला लागूनच एक भले मोठे विद्यालय उभे राहिले आहे.

सोपारा हे बंदर जुन्या काळात परदेशात माल निर्यात करीत असे. येथूनच नारळासारख्या व सागाच्या लाकडासारख्या वस्तू परदेशी पाठवल्या जात. आज या गावातून उच्च विद्याविभूषित डॉक्टर, वकील व धर्मगुरू परदेशी जात आहेत. संत जोसेफ याला समर्पित केलेले हे चर्च, संत जोसेफ हा येशूचा पालकपिता याला बिगरीचा वर्गदेखील पाहण्याचे भाग्य मिळाले नव्हते. मात्र त्याच्या नावाने आज डिग्रीचे वर्ग चालवले जातात व त्या पदव्या घेऊन अनेक विद्यर्थी परदेशी जातात हे एक न उलगडणारे रहस्य होय.

सदर चर्च हे आधुनिक पेहरावाचे आहे. जुन्या पिढीला नंदाखाल येथील पोर्तुगीज स्थापत्यशास्त्राने विभूषित असे चर्च लाभले होते. आज वास्तुशास्त्र बदलले आहे. व त्याचा लाभ या गावाला मिळाल्यामुळे त्यांना मोकळे, हवेशीर व ऐसपैस असे चर्च मिळाले आहे. वेदीवर आश्रयदाता संत जोसेफ याची भव्य-दिव्य मूर्ती उठून दिसते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2017 2:38 am

Web Title: st joseph church in umrale
Next Stories
1 शहरबात : सूर्याचे पाणी आणि पालिकेसमोरील आव्हाने
2 मीरा-भाईंदरमधील ५१ बारना टाळे
3 विवियाना मॉलची सुरक्षा व्यवस्था तकलादू
Just Now!
X