News Flash

एसटी थांब्यांची दुर्दशा

वसई पूर्व भागातील महामार्गावरून एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी बस थांबे उभारण्यात आले.

|| कल्पेश भोईर

शेड, छप्पर तुटलेले, घाणीचे साम्राज्य; एसटी महामंडळाचे दुर्लक्ष :- वसई-विरार शहरात एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी विविध ठिकाणी बस थांबे तयार केले असले तरी गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष केल्याने त्यांची दुरवस्था झाली आहे. या बसथांब्यांमधील छप्पर आणि शेड तुटले असून खांब गंजले आहेत. बसथांब्यांमध्ये गवत, खुरटी झुडपे उगवली असून गेल्या दोन वर्षांपासून एसटी महामंडळाचे दुर्लक्ष झाले आहे.

वसई पूर्व भागातील महामार्गावरून एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी बस थांबे उभारण्यात आले. मात्र तयार करण्यात आलेल्या बस थांब्याकडे एसटी महामंडळ विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे या थांब्याच्या ठिकाणी असलेले शेड कोसळून पडले आहेत, तर काही ठिकाणी या थांब्यामध्ये खुरटे गवत उगवले आहे. अनेक ठिकाणचे खांबही गंजून गेले असल्याने हे बस थांबे ओसाड पडू लागले आहेत.

एसटी महामंडळाचे वसई-विरार शहरात ४० हून अधिक बस थांबे आहेत. येथून दररोज मोठय़ा संख्येने प्रवासी प्रवास करत असतात. पूर्वी बस थांब्याच्या ठिकाणी प्रवाशांची मोठी गर्दी असायची. पंरतु बस थांब्याची दुर्दशा झाल्याने प्रवाशांना सध्या रस्त्यावरच उन्हातान्हात बसची वाट पाहात उभे राहावे लागत आहे. पावसाळ्यात याहूनही बिकट अवस्था असते, असे प्रवाशांनी सांगितले.

प्रामुख्याने वसई फाटा, नालासोपारा, विरार, चिंचोटी, बाफाणे फाटा या भागातील बसथांब्याची अवस्था बिकट झाली आहे. या बसथांब्यांसमोरच बेवारस वाहने उभी केली जातात. अनेक जण या बसथांब्यांसमोरच वाहनांची पार्किंग करतात. त्यामुळे प्रवाशांना बसथांब्यांवर उभे राहात येत नसल्याचा आरोप काही प्रवाशांनी केला आहे.

वाहतूक पोलिसांनी लक्ष देण्याची गरज

बसथांब्याच्या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात बेकायदा पार्किंग केली जाते. त्यामुळे एसटी व परिवहन विभागाच्या बस थांबवण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होत नसल्याने प्रवाशांना ये-जा करण्यासाठी अडथळे निर्माण होते. एसटीचालकांना एसटी बस थांब्याच्या थोडी पुढे उभी करावी लागते. त्यामुळे बेकायदा पार्किंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. वाहतूक पोलिसांनी याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे. एसटी महामंडळातर्फे पत्रव्यवहार करून हे प्रकार थांबवण्यात येतील, असे आश्वासन विभाग नियंत्रण अजित गायकवाड यांनी दिले.

वसई परिसरातील एसटी बसथांब्याची पाहणी करण्यात येईल. ज्या ठिकाणी बसथांब्यांची दुरवस्था झाली आहे, ते बसथांबे दुरुस्त करण्यात येतील. – अजित गायकवाड, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ, पालघर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2019 1:43 am

Web Title: st stop ignoring st corporations akp 94
Next Stories
1 नाताळनिमित्त चर्चचा आध्यात्मिक तयारीवर भर
2 सभागृहाचे परस्पर नामांतर
3 कचरा विल्हेवाटीची पुन्हा सक्ती
Just Now!
X