‘विठाई’ गाडीतून ठाणे ते पंढरपूर वाहतूक

ठाणे : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे जाण्यासाठी ठाणे जिल्ह्य़ातून ८४ विशेष बसगाडय़ा सोडण्याचा निर्णय राज्य परिवहन महामंडळाने घेतला आहे. राज्य परिवहन सेवेच्या ताफ्यात असलेल्या ‘विठाई’ या बसगाडय़ा ठाणे ते पंढरपूर मार्गावर सोडल्या जाणार असून या अतिरिक्त बसगाडय़ांमुळे भाविकांचा प्रवास सुखकर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आषाढी एकादशीनिमित्त लाखो भाविक पंढरपूर येथे जातात. ठाणे जिल्ह्य़ातूनही पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. नेमकी ही बाब लक्षात घेऊन राज्य परिवहन सेवेच्या ठाणे विभागाने ८४ विशेष बसगाडय़ा ठाणे ते पंढरपूर या मार्गावर चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ८ ते २१ जुलै या कालावधी या बसगाडय़ा सोडल्या जाणार आहेत. लोकमान्यनगर, वंदना, खोपट, भाईंदर, एरोली, भिवंडी, वाशिंद, शहापूर, माळशेज, कल्याण, विठ्ठलवाडी, अंबरनाथ, बदलापूर आणि वाडा येथून पंढरपूरच्या दिशेने बसगाडय़ा चालवण्यात येणार आहे, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

या बसगाडय़ांमधील जागा आरक्षण प्रक्रिया सुरू झाली असून त्यास भाविकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे ठाणे विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. गेल्या वर्षी आषाढी एकादशीनिमित्त १९ ते २९ जुलै या कालावधीत ७० विशेष बस गाडय़ा सोडण्यात आल्या होत्या. या काळात ठाणे जिल्ह्य़ातील विविध एसटी बस स्थानक  ते पंढरपूर अशा ९८ फेऱ्या चालविण्यात आल्या होत्या. त्यावेळी एसटी परिवहन महामंडळाला १३ लाख ३७ हजार ३७८ रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले होते.

प्रवाशांसाठी ‘विठाई’ एसटी बसगाडी

एसटी महमंडळाच्या ताफ्यातील साध्या बसगाडीमध्ये बदल करून विठाई ही नवी बसगाडी तयार केली आहे. या बसगाडय़ा ठाणे ते पंढरपूर या मार्गावर चालविण्यात येणार आहे. पांडुरंग आणि वारकरी यांचे चित्र या बसगाडीवर साकारण्यात आले असून पाच महिन्यांपूर्वी ‘विठाई’ या बस गाडय़ांचे लोकर्पण करण्यात आले होते.

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे जाणाऱ्या भाविकांना चांगली सुविधा मिळावी या उद्देशातून ८४ विशेष बसगाडय़ा सोडण्यात आल्या आहेत. एसटी महामंडळ हे भाविकांच्या सेवेसाठी तत्पर आहे.

-गोविंद कबाडे, प्रभारी विभाग नियंत्रक, ठाणे