19 October 2019

News Flash

मोबाइल चोरीसाठी ‘एक्स्प्रेस’वर दगडफेक

प्रवाशांचे मोबाइल पडल्यानंतर हे मोबाइल घेऊन आरोपी रस्त्याकडेला उभी केलेली दुचाकी पुढे घेऊन जात असल्याचे या चित्रीकरणात पाहायला मिळाले होते

(संग्रहित छायाचित्र)

किशोर कोकणे

आंबिवली, टिटवाळा मार्गावर लुटारूंचा वावर

लांबपल्ल्याच्या गाडय़ांच्या दारात मोबाइल घेऊन उभ्या असलेल्या प्रवाशांचे मोबाइल चोरण्यासाठी त्यांच्यावर दगडफेक केली जात असल्याचे धक्कादायक प्रकार आंबिवली आणि टिटवाळा रेल्वेस्थानकांदरम्यान घडू लागले आहेत. या घटनेचे चित्रीकरण समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी या गुन्ह्य़ात वापरल्या गेलेल्या दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. मात्र, दुचाकीस्वारांचा छडा लावण्यात पोलिसांना यश मिळालेले नाही.

आंबिवली आणि टिटवाळा रेल्वे स्थानकांदरम्यान धावत असलेल्या तपोवन एक्स्प्रेसच्या दरवाजात मोबाइल घेऊन उभ्या असलेल्या प्रवाशांचे मोबाइल चोरण्यासाठी एक्स्प्रेसच्या दिशेने दगड भिरकावले जात असल्याचा प्रकार समाजमाध्यमांवर प्रसारित झालेल्या एका चित्रीकरणात समोर आला होता. प्रवाशांचे मोबाइल पडल्यानंतर हे मोबाइल घेऊन आरोपी रस्त्याकडेला उभी केलेली दुचाकी पुढे घेऊन जात असल्याचे या चित्रीकरणात पाहायला मिळाले होते. या चित्रीकरणातील तथ्य तपासण्याचा प्रयत्न गेल्या काही दिवसांपासून सुरू होता. दरम्यान, या चित्रीकरणाच्या आधारे स्थानिक पोलिसांनी या गुन्ह्य़ात वापरलेल्या दोन दुचाकी जप्त केल्या. तसेच या दुचाकी स्थानिक पोलिसांनी कल्याण लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यातही दिल्या. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, घटना घडून आठवडा उलटून गेला असला तरी लोहमार्ग आणि रेल्वे सुरक्षा दलास या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात यश मिळालेले नाही. आंबिवली, टिटवाळा रेल्वे मार्गा दरम्यान गेल्या काही दिवसांपासून प्रवाशांवर दगडफेक करून त्यांना लुटू पाहणारी टोळी कार्यरत असल्याच्या तक्रारी यापूर्वीही पुढे आल्या आहेत. दरम्यान, याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस तपास करत असून लवकरच आरोपींना अटक केली जाईल, अशी माहिती लोहमार्ग पोलीस उपायुक्त एम. मकानदार यांनी दिली.

First Published on May 11, 2019 12:10 am

Web Title: stacked on express for mobile theft