‘एमएसआरडीसी’च्या अभियंत्यांची माहिती

कल्याण : मागील दीड वर्षांपासून रखडलेल्या पत्रीपुलाचे काम येत्या ऑगस्ट महिन्यापर्यंत पूर्ण होईल, असा दावा राज्य रस्ते विकास महामंडळाने केला आहे. या अर्धवट कामामुळे कल्याण-डोंबिवलीकरांना मोठय़ा प्रमाणावर वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत होता.

दीड वर्षांपूर्वी धोकादायक झाल्यामुळे पत्रीपूल रेल्वेकडून पाडण्यात आला. तात्काळ पुलाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून करण्यात आला. पुलाचे काम तीन महिन्यांत पूर्ण करून पूल वाहतुकीसाठी खुला केला जाईल, असे आश्वासन माजी राज्य रस्ते विकासमंत्री आणि विद्यमान नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. असे असताना पुलाचे नकाशे बनविणे, या नकाशांचे रेल्वेकडे सादरीकरण, पुन्हा त्यात दुरुस्त्या या सगळ्या प्रक्रियेत पुलाचे नकाशे अंतिम होण्यात वेळ गेला. त्यानंतर पुलाची निविदा प्रक्रिया, ठेकेदार नेमण्याची प्रक्रिया लांबली. या प्रक्रियेमुळे पुलाचे काम रखडले. पुलावरील लोखंडी खांब टाकण्याची कामे हैदराबाद येथील कंपनीला देण्यात आली. ते खांब आता तयार झाले आहेत, अशी माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. येत्या १० दिवसांत गर्डर कल्याणमध्ये दाखल होतील, असे त्यांनी सांगितले.

पाच महिन्यांपासून पत्रीपूल उभारणीचे काम राज्य रस्ते विकास महामंडळ तसेच रेल्वेच्या अभियंता विभागाने सुरू केले होते. मार्च महिन्यात करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी लागू झाली. दोन महिने हे काम थांबले. या कालावधीत पुलाच्या कामातील ठेकेदाराचे परप्रांतीय मजूर काम सोडून गेले. त्यामुळे काम पुन्हा सुरू करण्यात अडथळे आले. टाळेबंदी शिथिलता दिल्यानंतर एमएसआरडीसीने हे काम पुन्हा जोमाने सुरू केले आहे. ४० दिवसांत कामे पूर्ण करून ऑगस्टपर्यंत पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, असे महामंडळाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

नवीन पत्रीपुलाचे काम

रखडलेल्या पत्रीपुलाचे काम सुरू असतानाच पुढील महिन्यात जुलैमध्ये नवीन प्रस्तावित पुलाचे काम सुरू करण्यात येईल. या पुलाचे बांधकाम नकाशे, संकल्प आराखडे रेल्वे, महामंडळाने अंतिम केले आहेत. येत्या वर्षभरात हा पूल पूर्ण केला जाईल, असे एमएसआरडीसीचे जनसंपर्क अधिकारी तुषार अहिरे यांनी सांगितले. या नवीन पुलामुळे कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील कल्याणजवळील वाहतूक कोंडीला पूर्णविराम मिळणार आहे. नवीन पुलावर ७६ मीटर आणि २४ मीटर गर्डर टाकण्यात येणार आहेत. पुलासाठी दोन टप्पे असणार आहेत. १०१ मीटर लांबीचे गर्डरचे टप्पे आहेत. ११ मीटर रुंदीचा पूल असून त्यामध्ये रस्ता साडेसात मीटर असणार आहे.