‘‘खरं तर नाणी आणि पोस्टाची तिकिटं जमविण्याची आवड रक्तातून आली म्हणा ना. माझ्या वडिलांना या विषयात रुची होती. त्यांनी थोडीफार जमवाजमव केली होती. ती डोळ्यासमोर असल्यामुळे शाळेत असल्यापासूनच मला नाणी आणि पोस्टाच्या तिकिटांचं आकर्षण वाटू लागलं. त्यात भर म्हणजे शाळेतल्या आमच्या बाईंनी एकदा सर्व विद्यार्थ्यांना घरातल्या जुन्या-जुन्या गोष्टी घेऊन येण्याचा आग्रह केला. मीही माझ्याजवळ असलेली नाणी आणि तिकिटं घेऊन गेलो. सगळ्यांनी आणलेल्या वस्तूंचं वर्गात छोटेखानी प्रदर्शन भरवलं गेलं. बाईंच्या या कृतीमुळे, मनातल्या आवडीने चांगलंच मूळ धरलं. कुठलही पाकीट पाहिलं की ‘आत काय आहे’ हे बघण्यापेक्षा वरती चिकटवलेलं तिकीट काढून घेण्याकडेच कल झुकू लागला,’’ ठाण्याचे गौरव शेखर प्रधान आपल्या छंदाचा ‘श्रीगणेशा’ कसा झाला हे सांगत होते.
एमबीए होऊन उच्चपदावर कार्यरत असलेल्या गौरव प्रधान यांच्या शालेय जीवनात रुजलेल्या या छंदाने आता चांगलंच बाळसं धरलं आहे. जवळजवळ वीस-बावीस वर्षे ते ‘नाण्यांच्या’ नादात ‘पोस्टाच्या तिकिटांना’ चिकटून बसले आहेत. स्वातंत्र्यपूर्व म्हणजे ब्रिटिशांच्या काळातील भारतीय नाणी, स्वातंत्र्योत्तर काळातील भारतीय नाणी, परदेशी नाणी, नोटा, पोस्टाची कोरी तिकिटे, मिनिएचर शीट, फर्स्ट डे कव्हर असा ‘देखणा’ खजिना त्यांच्याकडे आहे. प्रत्येक नाणं किंवा नोट चांगल्या स्वरूपात, न हाताळलेली, टोनिंग टिकवून धरलेली आहे. १८३५ पासूनची ब्रिटिशकालीन भारतीय चांदीची नाणी त्यांच्याकडे आहेत. १/१२ आणा म्हणजे एक आण्याचा बारावा भाग हे कमीत कमी किमतीचं नाणं, तर १०० रुपये हे जास्तीत जास्त किमतीचं नाणं. पाचवा किंग जॉर्ज, सहावा किंग जॉर्ज, किंग एडवर्ड, क्वीन व्हिक्टोरिया, हत्ती, डुक्कर अशा विविध मुद्रा असलेली नाणी त्यांच्याकडे आहेत.
नाण्याचा आकृतिबंध ज्यांनी रेखाटला त्या कलाकाराचे नावही त्यावर बघायला मिळते. ही नाणी मित्रांमध्ये अदलाबदल करून, अधिकृत विक्रेत्यांकडून, परदेशांतून येणाऱ्या व्यक्तींकडून त्यांनी मिळवली आहेत. फेसबुक, ई-मेल या माध्यमक्रांतीमुळे हा व्यवहार अलीकडे सुलभ झाला आहे. दीड-दोन हजार छंदिष्टांची तिथे नोंद आहे. १९७३ चा नाण्यांचा पूर्ण सेट त्यांना कॅनडाहून मिळाला आहे. कॉपर, कॉपरनिकल, चांदी, सोने या धातूंपासून ही नाणी बनवलेली असून, जितकं नाणं दुर्मीळ, जुनं, न वापरलेलं तितकी किंमत जास्त. १९३८-३९ चं १ रुपयाचं चांदीचं नाणं साधारण आठ-दहा हजारांपर्यंत मिळते. त्यामुळे या छंदाला, ‘न्यूमेस्मॅटिक’ला ‘अर्था’चंही पाठबळ लागतं. दरवर्षी साधारण सहा-सात विषयांवर नाणी निघतात. १८५७ च्या संग्रामाला १५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल, तसेच लो. टिळकांच्या १५०व्या जयंतीच्या निमित्ताने काढलेले १०० रु.चे नाणे, खादी आणि ग्रामोद्योगतर्फे ५० रु.चे नाणे, अशी काही प्रासंगिक म्हणजे कॉममरेटिव्ह नाणीही प्रधान यांच्या संग्रहात आहेत. त्यांच्या या नाण्यांनी हजारचा आकडा केव्हाच ओलांडला आहे.
जगातील १५ देशांच्या चलनात असलेली जवळजवळ पाचशे नाणी त्यांच्याकडे आहेत. अब्राहम लिंकन यांच्या काळातील १ सेंटची दीडशे नाणी त्यांच्याकडे आहेत.
स्वातंत्र्योत्तर काळातील भारतीय ५०० रुपयांपासून १ रु.पर्यंतच्या विविध रूपांतील सगळ्या नोटा त्यांच्या ‘नोटाफिली’त आहेत. जगातल्या सात खंडांतल्या शंभर देशांच्या सर्व किमतींच्या (डिनॉमिनेशनच्या) सुमारे पाचशे नोटा प्रधान यांच्याकडे आहेत. त्यात प्लॅस्टिकची नोटपण आहे. त्यात थायलंडच्या राजाराणीच्या लग्नाच्या वाढदिवसाबद्दल काढलेली १००, ६० रु.ची खास नोट, भूतानच्या राजाराणीची १०० रु.ची नोट, रशियाची १००० रुबलची नोट आणि १, ५, १० रु.ची ‘अन्कट’ नोटही आहे. ही झाली ‘चलन’शाही.
टपाल खात्यातर्फे सुटे तिकीट, विषयांवर आधारित तिकिटांचा समूह म्हणजे मिनिएचर शीट आणि तिकीट लावलेले फर्स्ट डे कव्हर असे काढण्यात येते. १९५१ पासून आजपर्यंत १३२ मिनिएचर शीट निघाले. त्यातले फक्त दोन सोडून बाकी सगळे प्रधान यांनी मिळवले आहेत. १९५१ चे बारा आणे व दोन आणे असे चौदा आण्यांचे तिकीट असलेले पहिले फर्स्ट डे कव्हर धरून आठशे फर्स्ट डे कव्हर्स प्रधानांनी आपल्याकडे कव्हर केली आहेत. महिन्यातून दोन-तीनदा त्यांची जीपीओवारी निश्चित असते. भविष्यात कोणते तिकीट केव्हा येणार आहे याचा अंदाजही तिथे लागतो. १९५७ पासूनची बाल दिन स्पेशल फर्स्ट डे कव्हर आहेत. स्वातंत्र्यानंतर टपाल खात्याने तीन-साडेतीन हजार तिकिटे काढली. त्यापैकी साधारण दीड हजारपेक्षा जास्त कोरी तिकिटे प्रधान यांच्या खजिन्यात साठली आहेत. १५ ऑगस्ट १९४७ ला काढलेली तीन तिकिटे खजिन्याचा शुभारंभ करतात. या फिलाटेलातील तिकिटांमध्ये कोणते रंग वापरले आहेत हे सांगणारे सिग्नल असलेले बुकलेटपण प्रधानांकडे आहे. विविध देशांतील तिकिटेही आहेत. किमती अल्बम, फाईल्स, तिकिटे, मिनिएचर शीट, शीट व फर्स्ट डे कव्हरसाठी उठावदार पाश्र्वभूमी निर्माण करणारे रंगीत कागद आणि कमालीचा नीटनेटकेपणा यामुळे प्रधानांचा हा संग्रह बघताना ‘रूपास भाळलो मी’ अशीच सर्वाची अवस्था होते.
ब्रिटिश राजवटीतील भारतीय नाण्यांचा पूर्ण संग्रह करावा हे त्यांचे स्वप्न आहे. त्यासाठी एफ. प्राइडमोर यांचे पुस्तक म्हणजे जणू नाण्यांचे बायबल आणि आधारस्तंभ आहे. शिवाय सोन्याच्या एखाद्या तरी नाण्याने हा संग्रह झळाळून उठावा, अशी त्यांची मनीषा आहे. खरं तर नाणी व तिकिटे यांचा छंद ही एक प्रकारची अभ्यासपूर्ण गुंतवणूकच आहे.