मुंबई उपनगरांबरोबरच ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूरमध्ये रविवारी संध्याकाळपासूनच सुरु असलेल्या पावसामुळे लोकल ट्रेनची वाहतूक सकाळपासूनच कोलमडलेली दिसली. शीव, ठाणे, दादर स्थानकांमध्ये रेल्वेच्या ट्रॅकवर पाणी साठल्याने रेल्वे गाड्यांची वाहतूक उशिराने होत होती. अनेक ठिकाणी प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येत होती. या गर्दीमध्ये महिलांची संख्याही अधिक होती. सकाळीच ऑफिसला जाणाऱ्या अनेक महिला स्थानकांवर अडकून पडल्या. दरम्यान ठाणे स्थानकामध्ये तर बराच काळ ट्रेन न आल्याने महिलांची गर्दी झाली असतानाच ट्रेन आल्यावर उतरणाऱ्या आणि चढणाऱ्या महिलांमध्ये धक्काबुक्की होऊन अक्षरक्ष: चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

ठाणे स्थानकावरील सर्वच प्लॅटफॉर्म गर्दीने खचाखच भरले होते. त्यातच अचानक ट्रेन आल्याने प्लॅटफॉर्मवरील महिलांची गाडीत चढण्यासाठी तर गाडीतील महिलांची उतरण्यासाठी एकच झुंबड उडाली. यामध्ये ट्रेनमधून उतरलेल्या काही महिला प्लॅटफॉर्मवरच पडल्या. काहीजणींनी त्यांना सावरण्याचा प्रयत्न केल्याचे व्हिडिओमध्ये दिसते. अचानक प्लॅटफॉर्मवर एकच गोंधळ उडाला. वेळीच महिला पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने भीषण दुर्घटना टळली असंच हा व्हिडिओ पाहिल्यावर दिसून येते. तुम्हीच पाहा हा व्हायरल व्हिडिओ…

दरम्यान आज अनेक लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या. शीव स्थानकामध्ये पाणी साचल्याने अनेक गाड्या विक्रोळी ते घाटकोपरच्या आसपास अडकून पडल्या. त्यामुळे घाटकोपर स्थानकावरून डाऊन दिशेने जाणाऱ्या विशेष लोकल गाड्या सोडण्यात आल्या. घाटकोपरवरुन कर्जत, कसारा, बदलापूर अशा विशेष लोकल सोडण्यात आल्या.