१९ वर्षांपासून परिवहन उपक्रम तोटय़ात

गेली १९ वर्षे तोटय़ात चाललेला कल्याण डोंबिवली पालिकेचा परिवहन उपक्रम प्रशासनाने किती दिवस पोसायचा, असा प्रश्न उपस्थित करत स्थायी समितीने या सेवेचे खासगीकरण करावे, असा मतप्रवाह अर्थसंकल्प मंजूर करताना पुढे आला आहे. हा धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी प्रशासनाने लवकर परिवहन उपक्रमाच्या खासगीकरणाचा प्रस्ताव महासभेसमोर आणावा, असे स्थायी समिती सभापती राहुल दामले यांनी सुचविले आहे. यापूर्वी महापौर राजेंद्र देवळेकर यांनीही यासंबंधी सूतोवाच केले होते. त्यामुळे परिवहन उपक्रमाचे खासगीकरण अटळ असल्याची चर्चा आहे.

गेल्या वर्षी महापौर राजेंद्र देवळेकर यांनी परिवहन उपक्रमातील अधिकाऱ्यांना उपक्रमाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करा तसेच उपक्रमाचा महसूल वाढवा, प्रवासी भारमान वाढण्यासाठी प्रयत्न करा, असा आग्रह धरला होता. प्रत्येक वेळी प्रशासनाने उपक्रमाला किती अनुदान द्यायचे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता. इतकी वर्षे झाल्यानंतरही उपक्रम सक्षम होत नसेल तर उपक्रमाचे खासगीकरण करावे लागेल, असा इशारा महापौरांनी दिला होता. त्यानंतर आता स्थायी समिती सभापती राहुल दामले आणि सदस्यांनी परिवहन उपक्रमाच्या खासगीकरणाचे सूतोवाच केल्यामुळे शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांचे यासंबंधी एकमत असल्याचे दिसून आले आहे. यावेळी परिवहनमधील कर्मचाऱ्यांना पालिकेत सामावून घ्यायची सूचना समितीने केली आहे.

उपक्रमाला ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी उपक्रम कोणतेही प्रयत्न करीत नाही. वेळोवेळी पालिका प्रशासनाने परिवहनला आर्थिक साहाय्य द्यायचे. त्यावर उपक्रमाचा गाडा चालवायचा. हे किती दिवस करीत राहायचे? उपक्रम स्वत:च्या पायावर राहणार की नाही? असे प्रश्न नगरसेवकांकडून करण्यात आले आहेत. या वेळी उपक्रमाला स्थायी समितीने महसूल खर्चासाठी १३ कोटींचे साहाय्य केले आहे. उपक्रमातील ५८० कर्मचाऱ्यांचे वेतन, ठेकेदारांची देयक देणे उपक्रमाला जड जात आहे. बसदुरुस्तीचे काम करणाऱ्या ठेकेदाराने काम सोडून दिले आहे. त्यामुळे बसची निगा नियमित केली जात नाही. ठरावीक कामगारांची उपक्रमात दादागिरी आहे. राजकीय आशीर्वादामुळे अधिकारी त्यांच्यापुढे नमते घेत असल्याने, गर्तेत चाललेला उपक्रम वाचवायचा असेल तर खासगीकरण हा त्यावरील उपाय असल्याचे सर्वपक्षीय नगरसेवकांचे मत झाल्याने स्थायी समितीने उपक्रमाच्या खासगीकरणाचे संकेत दिले आहेत.

परिवहनची सद्यस्थिती

परिवहन उपक्रमात २१८ बसेसचा ताफा आहे. ७० बसेस सध्या ६० हजार प्रवाशांची वाहतूक करतात. २५ बसेस दररोज नादुरुस्त असतात. ५६ बसेस भंगारात गेल्या आहेत. दीड वर्षांपासून ६० बसेस चालकांअभावी उभ्या आहेत. दरमहा केडीएमटीला १ कोटी ८० लाखांचा महसूल तिकीट विक्रीतून मिळतो. १९ वर्षांत उपक्रमात ठरावीक कामगार संघटना, त्यांच्या सदस्यांची मक्तेदारी निर्माण झाली आहे. उपक्रमात मोठय़ा प्रमाणात भंगार, डिझेलचोरीचे प्रकार होत असल्याची चर्चा आहे.