News Flash

सुधारित अंदाजपत्रक महासभेत सादर

महापालिकेचे २०१९-२० या आर्थिक वर्षांचे अंदाजपत्रक आयुक्तांनी गेल्या आठवडय़ात सादर केले होते

अनेक योजनांची खरात; ४०६ कोटींची शिल्लक

वसई : वसई-विरार महापालिकेच्या स्थायी समितीने आगामी २०१९-२० या आर्थिक वर्षांचे अंदाजपत्र शुक्रवारी झालेल्या विशेष महासभेत सादर केले. आयुक्तांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकात सुधारणा करून १ हजार ८७५ कोटी रुपये आणि ४०६ कोटी रुपये शिलकीचे अंदाजपत्रक सभागृहापुढे मांडण्यात आले. नवीन पाणी योजना, रुग्णालयांची निर्मिती, अत्याधुनिक क्रीडा संकुल आदींचा समावेश आहे. याशिवाय अनेक योजनांची खैरात नागरिकांववर करण्यात आली आहे.

महापालिकेचे २०१९-२० या आर्थिक वर्षांचे अंदाजपत्रक आयुक्तांनी गेल्या आठवडय़ात सादर केले होते. त्यात सुधारणा करून स्थायी समिती सभापती सुदेश चौधरी यांनी महासभेत सादर करण्यात आले. आयुक्तांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकात २५९ कोटी रुपयांची शिल्ल्क दाखविण्यात आली होती आणि २ हजार २६३ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक बनवण्यात आले होते. स्थायी समितीने यात अनेक सुधारणा केल्या असून शिलक ४०६ कोटी रुपये दाखवण्यात आली असून एकूण अंदाजपत्रक १ हजार ८५७ कोटींचे सादर करण्यात आले.

या अंदाजपत्रकात अनेक नव्या तरदुतींचा समावेश केला आहे. वसई कौलसिटी येथे २०० खाटांचे मल्टिस्पेशालिटी रुग्णालय आणि आचोळे येथे ३०० खाटांचे अत्याधुनिक सुविधा असलेले रुग्णालय प्रस्तावित करण्यात आले आहे. देहरजा नदीवर आखण्यात आलेल्या पाणीपुरवठा प्रकल्पासाठी पालिकेने शासनाच्या जलसंपदा विभागाकडे १६७ कोटी आणि सुसरी प्रकल्पासाठी १६ कोटी रुपये जमा केले आहेत. या योजनेमुळे वसई-विरार शहरास प्रतिदिन ४९० दशलक्ष लिटर पाणी मिळणार आहे. अमृत अभियानाअंतर्गत १३० कोटी रुपयांच्या अतिरिक्त पाणीपुरवठा योजनेस मंजुरी देण्यात आली असून त्यासाठी २३३ कोटी ९९ लाख रुपयांची तरतूद केली आहे.

शहरात नवीन उड्डाणपूल प्रस्तावित असून त्यासाठी ४५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शहरातील सार्वजिनक वाचनालयांना अनुदान  जाहीर करण्यात आले आहे. त्यासाठी ५ कोटी २३ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे

आधारमाया योजनेअंतर्गत कुष्ठरोगाने बाधित आणि वयाची ६० वर्षे पूर्ण केलेल्या एकाकी व्यक्तीस दरमहा तीन हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. ज्ञानमयी योजना- ७५ टक्कय़ांहून अधिक अंधत्व किंवा अपंगत्व असणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा १ हजार रुपये अनुदान मिळणार आहे. विधवा महिलांच्या मुलीच्या विवाहांसाठी अनुदान दिले जाणार आहे. शहराच्या विविध भागात चौक, वाहतूक बेटे, उद्याने उभारली जाणार आहेत. अत्याधुनिक अग्निशमन विभाग उभारला जाणार आहे. त्यात ७० मीटर उंच शिडी, फायर वॉटर मॉनिटर उपकरण, हॅजमॅट व्हॅन या उपकरणांचा समावेश केला जाणार आहे. शहरातील विहिरीं, तलावांचे जतन करण्याचा निर्णय घेतला आहे.

पालिकेचे उत्पन्न (रुपये)

मालमत्ता कर                     २३० कोटी

नगररचना विभाग              ३२३ कोटी

पाणीपुरवठा                       २६८ कोटी

जाहिरात परवाना

शुल्क व जागा भाडे             ९० लाख

इमारत व गाळा भुईभाडे      २९ लाख

स्थानिक संस्था कर            १८ कोटी

अग्निशमन सेवा                ३४ कोटी

स्वच्छता कर                     २० कोटी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2019 2:29 am

Web Title: standing committee of vvmc presented budget in special general assembly
Next Stories
1 एसटी बसमध्ये पार्सल, कुरियरची वाहतूक करू नका
2 भाजी मंडईत कपडेविक्री
3 ‘जंगलातही आमचीच हवा’, बिबट्याच्या घुसखोरीनंतर ‘कोरम’ची नवी जाहिरात पाहिलीत का?
Just Now!
X