बदलापूर रेल्वे स्थानकाच्या पूर्व भागात जर रात्री आठनंतर वाहन घेऊन जाणार असाल तर किमान तासभर इच्छितस्थळी न पोहचण्याच्या इराद्यानेच नागरिकांनी आपले वाहन काढावे. कारण रात्री आठनंतर इथल्या रस्त्यांचा ताबा हा रिक्षाचालक घेतात. पूर्वेला स्टेशनबाहेर कुळगाव व कात्रप परिसराकडे जाणाऱ्या नागरिकांच्यासाठी या रिक्षा जागोजागी उभ्या असलेल्या दिसतात.
बदलापूर पूर्वेला रेल्वे स्थानकावरून बाहेर पडले की, कुळगाव, कात्रप, खरवई आदी ठिकाणी जाण्यासाठी यापूर्वी शिस्तशीर उभ्या असलेल्या रिक्षांचे स्टँड होते. परंतु सध्या या रिक्षांची शिस्तही गायब झाली असून रेल्वे स्थानकाच्या फलाट क्र. तीनवरून करण्यात आलेल्या नव्या प्रवेशद्वारातच रिक्षा उभ्या असतात. विशेष म्हणजे तिकीट घरावरच रेल्वे स्थानक परिसरात अवैधरित्या वाहने उभी केल्यास वाहतूक पोलिसांकडून दंड आकारण्यात येईल, अशी स्पष्ट पाटी लावली असून, हा पोलिसांचा आदेशही रिक्षाचालक धुडकावून लावत आहेत. या रस्त्यावरून एकावेळी दोन वाहने जाऊ शकतात. परंतु येथेच रिक्षा उभ्या राहत असल्याने येथील मासळी बाजाराकडून कात्रपकडे जाणाऱ्या या रस्त्यावर प्रचंड वाहनकोंडी होते. त्यात या स्थानकाबाहेरील एक मुख्य रस्ता हा गांधी चौकाकडे जाणारा असून त्याची डावी बाजू काँक्रिटीकरणाच्या कामासाठी बंद आहे. त्यामुळे या मुख्य रस्त्याच्या उजव्या बाजूवर ताण पडत असल्याने वाहतूकीला अडथळा निर्माण झाला आहे. त्यात येथे यापूर्वीपासून असलेला मुख्य रिक्षा स्टॅंडमध्ये रिक्षाची एक रांग असणे अपेक्षित आहे. मात्र येथे रिक्षांच्या दोन रांगा उभ्या राहिल्याने मुख्य रस्ता अरूंद झाला आहे. त्यातच बदलापूरकरांसाठी दुष्काळात तेरावा महिना म्हणजे या स्थानकाबाहेरील मुख्य रस्त्यावर अनेक खड्डे असल्याने वाहनांना कितीही रस्ता मोकळा असला तरी हळूच जावे लागते. त्यामुळे खराब रस्ते, अवैध रिक्षा स्टँड व रस्ते काँक्रिटीकरणाची कामे यांमुळे वाहतूकीची प्रचंड कोंडी पूर्वेला रेल्वे स्थानक परिसरात होत आहे.
 याबाबत माहिती घेतली असता अंबरनाथ वाहतूक नियंत्रण उपशाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयंत नगराळे म्हणाले की, रात्री आठनंतर वाहतूक पोलिसांचे काम संपत असल्याने यावेळेस वाहतूक विभागाचे पोलीस कामावर नसतात. त्यामुळे रात्री वाहतूक पोलिसांना कारवाई करता येत नाही. परंतु, याबाबत स्थानिक पोलिस यंत्रणेशी व रिक्षा युनियनशी बोलून त्यांना याबाबत लक्ष घालण्यास सांगणार असून स्वतही संबंधितांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, याचा नाहक त्रास हा येथून वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांना होत असून अनेक जण लांबच्या पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत असल्याने नाराजी व्यक्त करत आहे.
संकेत सबनीस, बदलापूर