स्टार कासव अशी दुर्मिळ ओळख असलेल्या कासवांची तस्करी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विजय आणि सागेराम अशी या दोघांची नावे आहेत. मुलगा आणि बापाच्या या जोडीने कर्नाटकातल्या बंगळुरुतून कल्याणमध्ये कासवे घेऊन तस्करी करण्याचा मनसुबा आखला होता, मात्र पोलिसांनी तो उधळून लावला.
स्टार कासव घरात ठेवले तर नोकरी आणि धंद्यात भरभराट होते, अशी अंधश्रद्धा आहे, त्याचमुळे या कासवांना मोठी मागणी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या कासवांची किंमत मोठ्या प्रमाणावर आहे. कर्नाटकातल्या बंगळुरूतून हे विजय आणि सागेराम यांनी २०० कासवं तस्करीसाठी कल्याणमध्ये आणली होती.
पाठीवर चांदणीच्या आकाराची नक्षी असलेल्या या कासवांना स्टार कासव म्हटले जाते, अशी स्टार कासवं घेऊन दोघेजण कल्याणमध्ये येणार आहेत अशी माहिती पोलिसांना त्यांच्या खबऱ्यांकडून मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून या दोघांना अटक केली. नवी मुंबई पोलीस आणि कल्याण पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली. दुपारच्या सुमारास एर्नाकुलम लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस ही गाडी कल्याण स्थानकात आली.
कल्याणमध्ये हे दोघेजण विजय आणि सागेराम याच गाडीतून उतरले. त्यांच्याकडे असलेल्या बॅगेत पोलिसांना स्टार कासवांची २०० पिल्ले सापडली. त्याचमुळे या ठिकाणी ते तस्करीसाठी उतरले आहेत हे स्पष्ट झाले. या कासवांची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात लाखोंच्या घरात आहे. त्याचमुळे या दोन तस्कारांना पकडून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने या दोन्ही तस्करांना दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.