कार शोरूम्स, गॅरेजचालकांचे धाबे दणाणले
ठाणे शहरातील सेवा रस्त्यांच्या कडेला उभ्या राहणाऱ्या वाहनांवर बुधवारी महापालिका आणि ठाणे शहर वाहतूक पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई सुरू केली. या सेवा रस्त्यांलगत गेल्या काही वर्षांत मोठय़ा प्रमाणावर कारविक्रीची दुकाने आणि गॅरेजस् उभी राहिली आहेत. यामध्ये टेस्ट ड्राइव्हसाठी ठेवली जाणारी तसेच गॅरजेस्मध्ये दुरुस्तीसाठी आणली जाणारी वाहने सेवा रस्त्यांच्या कडेला उभी केली जातात. त्यामुळे या रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होऊ लागली आहे. या वाहनांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले होते. दरम्यान, सेवा रस्त्यांलगत असलेल्या वसाहतींमधील रहिवाशांनी या ठिकाणी वाहने उभी करू नयेत, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.
पूर्व द्रुतगती महामार्गाच्या दोन्ही बाजूंस असलेल्या सेवा रस्त्यांच्या कडेला वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. मुख्य मार्गावरील कोंडीतून सुटका व्हावी यासाठी सेवा मार्गाची वाट धरणाऱ्या प्रवाशांसाठी ही डोकेदुखी ठरू लागली असून त्यामुळे सेवा रस्त्यांच्या कडेला उभ्या करण्यात येणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश जयस्वाल यांनी मंगळवारी दिले होते. महामार्ग ते लुईस वाडी आणि पाचपाखाडी अशा दोन्ही मार्गावर मोठी हॉटेल्स, कारविक्रीची दुकाने उभी राहिली आहेत. याच मार्गावर बडय़ा कार कंपन्यांची गॅरेजेस्ही सुरू झाली आहेत. वाहने उभी करण्याची पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे शोरूम तसेच गॅरेजचालक सेवा रस्त्यांच्या कडेला वाहने उभी करतात. तसेच हॉटेलांमध्ये येणाऱ्या ग्राहकांची वाहनेही उभी केली जातात. यामुळे सेवा रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असून प्रवाशांच्या त्रासात भर पडत आहे. हे लक्षात घेऊन महापालिका आयुक्त जयस्वाल यांनी मंगळवारी झालेल्या फेरीवाला धोरण समितीच्या बैठकीत सेवा रस्त्यांच्या कडेला उभ्या राहणाऱ्या वाहनांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश अतिक्रमणविरोधी पथकास दिले. दरम्यान, बुधवारपासून महापालिकेचा अतिक्रमणविरोधी पथक आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्तपणे अशा वाहनांवर कारवाईला सुरुवात केली. तीन हात नाका ते कॅडबरी जंक्शन आणि वाहतूक पोलीस कार्यालय ते पाचपाखाडी या मार्गावरील सेवा रस्त्यांवर एका बाजूस उभ्या राहणाऱ्या सुमारे ४५ चारचाकी वाहनांना जॅमर लावून कारवाई करण्यात आली.

फेरीवाल्यांसाठी १४५ क्षेत्रे
अतिक्रमण निर्मूलन विभागाने शहरात विविध ठिकाणी केलेल्या सर्वेक्षणानुसार एकूण १४५ फेरीवाला क्षेत्रे घोषित करण्यात आली होती. तर २१५ ठिकाणे ‘ना फेरीवाला क्षेत्र’ म्हणून घोषित केली होती. या दोन्हीबाबत मंगळवारी झालेल्या बैठकीत चर्चा झाली. अखेर १४५ फेरीवाला क्षेत्रे निश्चित करण्याविषयी शहर फेरीवाला समितीने निर्णय घेतला. या १४५ फेरीवाला क्षेत्रात एकूण १२८८३ फेरीवाल्यांना समाविष्ट करून घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर शहरात विविध भागात रस्त्याच्या दोन्ही बाजूला जे आठवडी बाजार भरतात ते रस्त्याच्या एकाच बाजूला भरविण्याविषयी या बैठकीत चर्चा झाली. यावेळी फेरीवाला धोरणाचा एक भाग म्हणून सर्व फेरीवाल्यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून फेरीवाल्यांनी त्यास सहकार्य करावे, असे आवाहनही महापालिकेच्यावतीने करण्यात आले.