आरटीओच्या कारवाईस सुरुवात; कागदपत्रे सादर करण्याची नोटीस

विरार : वसई-विरार महापालिकेच्या परिवहन विभागाच्या ४२ बसगाडय़ा वाहतुकीसाठी अपात्र असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यास उपप्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) सुरुवात केली आहे. सध्या पाच बसवर कारवाई करण्यात आली असून वाहनांसंबंधी सर्व कागदपत्रे सादर करण्याची नोटीस महापालिका परिवहन विभागाला बजावण्यात आली आहे.

वसई-विरार महापालिकेचा परिवहन विभाग अपात्र बसेस चालवत असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत वसई उपप्रादेशिक परिवहन विभागाने अपात्र बसेसवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. ‘एम परिवहन’ या शासकीय अ‍ॅप्लिकेशनवरून वसई-विरार महापालिकेने परिवहन सेवेच्या ताफ्यात असलेल्या बसेससंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली होती. या माहितीत तब्बल ४२ बसेसना कोणत्याही प्रकारचे योग्यता प्रमाणपत्र, विमा प्रमाणपत्र, प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र, परवाना यांची वैधता संपुष्टात आल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे महापालिका वाहतुकीस अपात्र वाहनांतून प्रवाशांची धोकादायक वाहतूक करत असल्याचे समोर आले आहे.

महापालिकेची परिवहन सेवा भागीरथी ट्रान्सपोर्टतर्फे ठेकदार स्वरूपात चालवली जाते. या ताफ्यात १६० बसेस आहेत. त्यातील सध्या १४० बसेस रस्त्यांवर धावत आहेत; पण यातील काही बसेसची योग्यता प्रमाणपत्र, विमा प्रमाणपत्र, प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र, परवाना यांची वैधता संपुष्टात आली आहे. विशेष म्हणजे परिवहन कंपनीने बसेसचा शासकीय करही न भरता मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन केले आहे. तरीही या बसेस रस्त्यावर धावत असल्याने ही कारवाई करावी लागली, असे आरटीओच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

वसई उपप्रादेशिक परिवहन विभागाने या बसेसवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. महापालिका परिवहन ताफ्यात असलेल्या सर्वच बसेसची संपूर्ण कागदपत्रे सादर करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. पाच बसेसवर कारवाई करण्यात आली असून दोन बसेस बंद करण्यात आल्या आहेत, तर तीन बसेसना नोटीस पाठवली आहे. आठवडाभराची मुदत देऊन कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगितले आहे.– अनिल पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वसई

पावसाळ्यात ७२ बसेस नादुरुस्त झाल्या होत्या. त्यातील काही बस दुरुस्त करून रस्त्यावर चालत आहेत. वापरत असलेल्या बसेसचा विमा काढला जाईल. त्याचप्रमाणे इतर बसेसची कागदपत्रे पूर्ण करण्याचे काम सुरू आहे. – मनोहर सकपाळ, ठेकेदार, परिवहन सेवा