‘लोकसत्ता ठाणे’तील वृत्तानंतर आयुक्तांकडून पाहणी

डोंबिवली रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावर छप्पर नसल्याने प्रवासी गेली अनेक वर्षे ऊन-पावसाचा मारा झेलत येथून प्रवास करीत होते. पुलावर छप्पर टाकण्याच्या कामास मंजुरी मिळूनही कामास सुरुवात होत नसल्याचे वृत्त मंगळवारी ‘लोकसत्ता ठाणे’ने प्रसिद्ध केले. या वृत्ताची दखल घेत कल्याण डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर यांनी सायंकाळी डोंबिवली पुलाची पाहणी केली. त्यांनीही पुलाच्या संथ कामाविषयी नाराजी व्यक्त केली. तसेच हे काम वर्षभरात पूर्ण व्हायला हवे, असे स्पष्ट केले. दरम्यान, महापौरांच्या आदेशानंतर पश्चिमेपासून पुलावर छप्पर टाकण्याच्या कामास सुरुवात झाली आहे.
डोंबिवली पूर्व पश्चिमेला जोडणारा पादचारी पूल २००४ साली उभारण्यात आला होता. तेव्हापासून या पुलावर शेड उभारण्याची मागणी प्रवासी करत होते. ऊन-पावसाचा मारा झेलत या पुलावरून प्रवास करणे नागरिकांना जिकिरीचे जात होते. अखेर गेल्या वर्षी या पुलावरील शेडच्या कामास मंजुरी मिळाली आणि निधीही मंजूर झाला. लोकप्रतिनिधींनी केवळ कामाचे श्रेय लाटण्यासाठी येथे काम सुरू झाल्याचे फलक झळकावले खरे, प्रत्यक्षात मात्र काम सुरू होत नसल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी होती. या विषयीचे वृत्त ‘लोकसत्ता ठाणे’मध्ये प्रसिद्ध होताच महापौर राजेंद्र देवळेकर यांनी आयुक्त ई रवींद्रन यांच्यासह सायंकाळी पादचारी पुलाचा पाहणी दौरा केला. पुलाचे काम सुरू असल्याचे यावेळी महापालिका अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले, परंतु प्रत्यक्षात ते कुठेही दिसत नसल्याने देवळेकर यांनी नाराजी दर्शविली. ‘आजच्या आज कामास सुरुवात झाली पाहिजे’ असे आदेश देताच त्यांच्या दौऱ्यानंतर मात्र या कामास सुरुवात झाली.
येत्या वर्षभरात संपूर्ण पादचारी पुलावर शेड टाकण्याचे काम पूर्ण होईल, असे आश्वासन यावेळी देवळेकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिले. डोंबिवली पश्चिमेतील द्वारका हॉटेलजवळील पुलावर फारशी रहदारी नसते. या पुलावर शेड उभारणीच्या कामास सुरुवात झाली आहे. जास्त रहदारी नसलेले भाग पहिल्यांदा पूर्ण करण्यात येतील. त्यानंतर रहदारीचा भाग हाती घेण्यात येईल, अशी माहिती पालिकेचे उपअभियंता प्रशांत भुजबळ यांनी दिली.

फेरीवाले हटविले जातील..
फेरीवाल्यांविषयी प्रश्न विचारता महापौर देवळेकर म्हणाले, महापालिकेकडे कर्मचारी कमी असल्याने सध्या सर्व फेरीवाल्यांवर नियंत्रण ठेवणे जमत नाही. परंतु लवकरच फेरीवाल्यांचा प्रश्नही मार्गी लागेल.
आयुक्त ई रवींद्रन याविषयी म्हणाले, प्रथम कल्याणमधील व नंतर डोंबिवलीतील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात येईल. फेरीवाल्यांना उठविल्यानंतर ते पुन्हा येथे येऊन व्यवसाय करतात. परंतु त्यांची ही सवय जाण्यासाठी किमान काही महिन्यांचा कालावधी लागेल, असे आयुक्तांनी सांगितले.