ठाण्यात डावखरेंच्या विजयासाठी व्यूहरचना; भाजप-शिवसेनेकडे जादामतदार

विधान परिषदेच्या ठाणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीत हळूहळू रंग भरण्यास सुरुवात झाली असून १२५ मतांची रसद स्वत:कडे बाळगत सूत्रधाराच्या भूमिकेत शिरलेले वसईचे हितेंद्र ठाकूर यांना आपल्या गोटात वळविण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना यश आल्याचे वृत्त आहे. विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे लागोपाठ पाचव्यांदा ही निवडणूक लढविण्यास सज्ज झाले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्या उमेदवारीवर यापूर्वीच शिक्कामोर्तब केले आहे. बदललेल्या राजकीय समीकरणामुळे शिवसेना-भाजपचे एकत्रित संख्याबळ लक्षात घेता यंदा डावखरे यांना विजयासाठी ८२ मतांचे अंतर भरून काढावे लागणार आहे. त्यामुळे विजयाचे गणित जमविताना नेमके कोणते ‘डाव’ टाकावेत यासाठी पवारांनी रविवारी बोलविलेल्या दिग्गज नेत्यांच्या एका बैठकीत वसईच्या ठाकूर अप्पांनी सक्रिय सहभाग नोंदविल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

१९९२ पासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व डावखरे करीत आहेत. विधान परिषदेच्या ठाणे आणि पालघर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील निवडणुकीत नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांना मतदानाचा अधिकार असून सुमारे हजाराच्या आसपास एकूण मतदार आहेत. यापूर्वी दोनदा मतांचे गणित प्रतिकूल असतानाही डावखरे यांनी विजय प्राप्त केला होता. जून महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय मतदारांच्या भेटीगाठीही सुरू केल्या आहेत. शिवसेनेत या जागेसाठी अनेक जण इच्छुक आहेत. माजी आमदार अनंत तरे, रवींद्र फाटक, पुंडलिक म्हात्रे, गोपाळ लांडगे यांनी उमेदवारीसाठी जोर लावला आहे. शिवसेना-भाजपने एकदिलाने ही निवडणूक लढविल्यास डावखरे यांच्यापुढे आव्हान आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर वसई विकास आघाडीच्या तिघा आमदारांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला होता. ठाकूर आणि डावखरे यांचे राजकीय सख्य राजकीय वर्तुळात सर्वश्रुत आहे. या पाश्र्वभूमीवर निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी शरद पवार यांनी रविवारी सायंकाळी मुंबईत बोलविलेल्या गुप्त बैठकीत ठाकुरांची उपस्थिती त्यांची भूमिका स्पष्ट करणारी ठरल्याचे बोलले जात आहे. या बैठकीस डावखरे आणि ठाकूर यांच्यासह गणेश नाईक, जितेंद्र आव्हाड हे जिल्ह्य़ातील अन्य दोन बडे नेतेही उपस्थित होते.

यासंबंधी हितेंद्र ठाकूर यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

समीकरणांची जुळवाजुळव

  • शिवसेना-भाजप एकत्र लढल्यास युतीकडे ४००च्या आसपास मते आहेत. पण या संख्याबळावर कोणालाच विसंबून राहता येणार नाही. निवडणूक झाल्यास मोठा घोडेबाजार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
  • राष्ट्रवादी व काँग्रेसची एकत्रित ३००च्या आसपास मते असून, सुमारे १२५ मते हितेंद्र ठाकूर यांच्याकडे आहेत.