ठाणेकर प्रवाशांचे उन्हा-पावसापासून संरक्षण व्हावे यासाठी रेल्वे स्थानकालगत सॅटिस पुलावर छत उभारण्याची जोरदार तयारी सुरू असली तरी पुढील दोन महिने तरी हे काम पूर्ण करणे कठीण असल्याचे चित्र आहे. त्यामुळे यंदाचा पावसाळाही प्रवाशांना छताविनाच काढावा लागेल, अशी चिन्हे आहेत. छत उभारणीचे काम जुलै महिन्याच्या मध्यंतरास संपावे, अशी मुदत निश्चित करण्यात आली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कामाचा वेग कमालीचा मंदावला असल्याने जुलै महिन्याची मुदत पाळता येईल का याविषयी अभियांत्रिकी विभागही साशंक आहे.
ठाणे स्थानक परिसरातील सॅटिसवरून शहराच्या विविध भागांमध्ये ठाणे परिवहन सेवेच्या बस प्रवासी वाहतूक करत असून लाखो प्रवासी या भागातून दैनंदिन प्रवास करत असतात. परिवहन उपक्रमाच्या एकूण साडेसहा हजार फेऱ्यांपैकी दीड हजार फेऱ्या सॅटिसवरून केल्या जातात. त्यामधून सुमारे १ लाख ७० हजारांहून अधिक प्रवासी दैनंदिन प्रवास करतात. बस थांब्यांवरली छोटय़ा छतांमुळे बस स्थानकावर उभ्या असणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. उन्हाळ्यातही तीच परिस्थिती प्रवाशांना अनुभवावी लागत होती. यातून मार्ग काढण्यासाठी सॅटिस छताच्या कामाला सुरुवात झाली. सप्टेंबरमध्ये सुरू झालेले हे काम २०१५ च्या पावसाळ्यापूर्वी संपेल असा प्रवाशांचा अंदाज होता. मात्र गेली नऊ महिन्यांनंतरही हे काम सुरू असून कामाची डेडलाइन जुलै महिन्याची असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे या काळात पावसाळा येत असून पावसाचे दोन महिने प्रवाशांना भिजतच काढावे लागणार आहेत. जुलैची मुदत देण्यात आली असली तरी प्रवासी वाहतुकीमुळे या कामात अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे जुलैमध्ये सॅटिसला छत बसण्याची शक्यता कमी असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.
वाहतूक खोळंब्याशिवाय काम सुरू..
सॅटिसवरील बस वाहतुकीमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही याची काळजी घेऊन छताचे काम सुरू आहे. त्यासाठी रात्रीच्या वेळी वेगाने कामे केली जात आहेत. जिथे आवश्यकता आहे तेथेच केवळ वाहतूक व्यवस्थेत बदल करून काम केले जात आहे. कामाची जुलै महिन्याची मुदत ठरली असून त्यापूर्वी काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असला तरी अनेक वेळा नियोजनाप्रमाणे काम होतेच असे नाही.
 – विनय वैद्य, ठाणे महापालिका अभियंता

सुविधेसाठी असुविधा कायम..
छताची सुविधा होणार असल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण असले तरी काम पूर्ण होण्यासाठी होत असलेल्या खोळंब्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. भविष्यात होणाऱ्या सुविधेसाठी प्रवासी हा त्रास सहन करत असले तरी महापालिका प्रशासनाने प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंतसुद्धा पाहू नये.
– विनोद देशमुख, प्रवासी