ठाणे : शहरातील नगरसेवक माणिक पाटील यांचा मुलगा राकेश पाटील (३४) याच्या हत्येप्रकरणी फरारी असलेला राकेशचा सावत्र भाऊ सचिन पाटील याला कासारवडवली पोलिसांनी नवी मुंबई येथून अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून तीन किलो सोने, एक पिस्तूल जप्त केली. संपत्तीच्या वादातून सचिन पाटीलने राकेशची गोळी झाडून हत्या केली.

वाघबीळ भागात माणिक पाटील हे नगरसेवक आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांची पत्नी आणि ते उपचारासाठी रुग्णालयात दाखल होते. २० सप्टेंबरला उपचार करून घरी आल्यानंतर त्यांना घरातील तिजोरीतील ३ किलो ७१० ग्रॅम सोने आणि त्यांचा मुलगा राकेश बेपत्ता असल्याचे दिसले. त्याची दुचाकीही आढळून आली नव्हती. त्यामुळे राकेश सोने चोरून पसार झाल्याचा संशय आला. कासारवडवली पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार केली.

दरम्यान, राकेशची दुचाकी माणिक पाटील यांचा वाहनचालक गौरव सिंह चालवत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी गौरव सिंहला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने राकेशची हत्या झाल्याची माहिती पोलिसांना दिली. २० सप्टेंबरला पहाटे राकेशला दारू पाजून त्याच्या डोक्यात सचिनने गोळी झाडल्याचेही त्याने सांगितले. यानंतर पोलिसांनी सचिन पाटीलचा शोध सुरू केला.२६ सप्टेंबरला सचिन पाटील नवी मुंबई येथील उलवे भागात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.