ठाणे : करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये आलेल्या प्राणवायू तुटवडय़ाच्या अनुभवानंतर ठाणे महापालिका प्रशासनाने आता प्राणवायूच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी पावले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महापालिका रुग्णालय परिसरात उभारलेल्या प्रकल्पामधून दररोज साडे पंधरा टन प्राणवायूची स्वत: निर्मिती करणार असून मेअखेपर्यंत हे सर्व प्रकल्प सुरू होणार आहेत. महापालिका रुग्णालयांमध्ये दररोज लागणाऱ्या प्राणवायूपैकी ४० टक्के प्राणवायू या प्रकल्पामधून उपलब्ध होणार आहे. याशिवाय ग्लोबल, पार्किंग प्लाझा आणि व्होल्टास या रुग्णालयाच्या परिसरात आणखी तीन प्राणवायू टाक्यांची उभारणी करणार आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये मार्च आणि एप्रिल महिन्यात करोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली होती. पालिका आणि खासगी रुग्णालयांमध्ये अनेकदा प्राणवायूचा तुटवडा निर्माण झाला होता. यामुळे रुग्णालयातील रुग्णांना इतरत्र हलविण्यातही आले होते. गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत घट झाल्यामुळे प्राणवायूच्या तुटवडय़ाची समस्या काही प्रमाणात कमी झाली. परंतु केंद्रीय आरोग्य विभागाने आता तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली असून त्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाने रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून आतापासूनच खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ठाणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ठाणे महापालिकेने प्राणवायूच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी पावले उचलली आहेत.

ठाणे महापालिकेच्या ग्लोबल, पार्किंग प्लाझा आणि व्होल्टास रुग्णालयांमध्ये एकूण ६२ टन प्राणवायूची आवश्यकता लागणार आहे. पालिकेला विविध पुरवठादारांकडून दररोज ४७ टन प्राणवायूचा पुरवठा होता. मात्र व्होल्टास रुग्णालये सुरू झालेले नसल्यामुळे तो आतापर्यंत पुरत होता. परंतु तिसऱ्या लाटेत उर्वरित १५ टन प्राणवायूची गरज निर्माण होऊ शकते. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी पार्किंग प्लाझा येथे हवेतून ३.२ टन प्राणवायू निर्मितीचा प्रकल्प उभारण्यात आला. अशाच प्रकारे आता ग्लोबल येथे ५ टन, पार्किंग प्लाझा येथे आणखी २ टन आणि व्होल्टास येथे ५ टन प्राणवायू निर्मितीचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यापैकी ग्लोबल आणि पार्किंग प्लाझामधील प्रकल्पाचे काम मेअखेपर्यंत तर व्होल्टासमधील प्रकल्पाचे काम जूनअखेपर्यंत पूर्ण होईल. या प्रकल्पांमुळे महापालिका प्राणवायूबाबतीत स्वयंपूर्ण होणार आहे. अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिली. महापालिका रुग्णालयांमध्ये दररोज लागणाऱ्या प्राणवायूपैकी ४० टक्के प्राणवायू या प्रकल्पामधून उपलब्ध होणार आहे, असेही ते म्हणाले.

अतिरिक्त प्राणवायू टाकी

ठाणे महापालिकेच्या ग्लोबल, पार्किंग प्लाझा आणि व्होल्टास रुग्णालय परिसरात प्रत्येकी १२ टन क्षमतेची प्राणवायू टाकी उभारण्यात आली आहे. अशा प्रकारच्या आणखी तीन टाक्यांची उभारणी केली जाणार आहे. जेणेकरून त्यामध्ये प्राणवायूचा अतिरिक्त साठा ठेवणे शक्य होईल. एखाद वेळेस काही कारणामुळे प्राणवायू उपलब्ध होण्यास उशीर झाला तर त्यावेळेस अतिरिक्त टाकीमधील प्राणवायूचा साठा उपयोगी येईल, अशी माहिती महापालिका आयुक्तांनी दिली.