कळवा आणि मुंब्र्याच्या दरम्यान पारसिक बोगद्यातून जलद लोकल जात असताना काही तरुणांकडून महिलांच्या डब्यांवर धारदार अवजड वस्तू आणि बाटली फेकून त्यांना जखमी करण्याची घटना घडली. या सगळ्या प्रकारामुळे महिला प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मागील दोन दिवसांत दोन महिलांवर धारदार वस्तू फेकून गंभीररीत्या जखमी करण्यात आले आहे.

डोंबिवलीत राहणाऱ्या विद्या कोळी वडाळा येथील ‘एमटीएनएल’ कार्यालयात नोकरी करतात. त्या मंगळवारी बदलापूर जलद लोकलने डोंबिवलीच्या दिशेने येत होत्या. कळवा आणि मुंब्र्याच्या दरम्यान पारसिक बोगद्यातून लोकल जात असताना बोगद्यापासून थोडय़ा अंतरावर उभ्या असलेल्या एका दहा वर्षांच्या मुलाने जवळील अवजड वस्तू वेगाने महिला डब्याच्या दिशेने फिरकावली. यामध्ये त्या जखमी झाल्या. त्यांना डोंबिवलीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

पायाच्या घोटय़ाच्या वरील भागात फ्रॅक्चर झाले असल्याने विद्या यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यांच्या पायात सळई (रॉड) टाकण्यात आली आहे. असाच प्रकार गुरुवारी संध्याकाळी पारसिक बोगद्याजवळ झाला.