नीरज राऊत

पालघर येथून मालाचा भरणा बंद; टोपलीमागे २० ते २५ रुपयांचा खर्च वाढला

पानाच्या उत्पादन आणि वाहतूक खर्चामध्ये वाढ होत गेल्याने पालघर परिसरातील अनेक गवांनी ‘पानवेल’चे उत्पादन घेणे बंद केले आहे. चवीने तिखट व थंड प्रदेशात मागणी असलेले माहीम-केळव्याच्या ‘काळीपत्ती’ पानाला उत्तरेकडील प्रदेशात मागणी आहे. मात्र वाहतूक रेल्वेवर अवलंबून असून आता येथून पानाच्या पाटय़ांचे लोडिंग बंद  केले आहे. मुंबई सेंट्रल येथे माल पाठवून तेथून तो रेल्वेने दिल्लीला पाठविला जात आहे. त्यामुळे टोपलीला २० ते २५ रुपयांचा खर्च वाढला आहे. अगोदरच स्पर्धेमुळे दराचा फटका त्यात वाहतुकीचा वाढलेला खर्च यामुळे माहीम-केळव्याचे पान धोक्यात आले आहे.

पालघर परिसरामधील चिंचणी, माहीम, केळवे, मथाणे, तारापूर, शिरगाव, वसई आदी गावांमध्ये सुमारे २०० वर्षांपूर्वीपासून ‘पानवेल’चे उत्पादन घेतले जात असत. मात्र पानाचे उत्पादन देशात अन्य ठिकाणी वाढल्याने तसेच पानाचा उत्पादन खर्च आणि पानाची वाहतूक खर्चामध्ये वाढ होत गेल्याने हा व्यवसाय फायदाचा राहिला नाही व अनेक ठिकाणच्या बागायतदाराने पानाची लागवड करणे बंद केले. सध्या हे ‘कालीपत्ती’चे उत्पादन केळवा व माहीम मध्येच घेतले जात आहे.

उत्तरेकडील राज्यात या पानाला विशेष मागणी असल्याने पश्चिम रेल्वेच्या लांब पल्लय़ांच्या गाडय़ांच्या ‘लगेज’ पार्सल वॅन डब्यातून हे पान पालघर येथे थांबणाऱ्या लांब पल्लय़ांच्या गाडय़ांमधून पोहचविले जायचे. मात्र, रेल्वेने व्यवसायिकरणाचा भाग म्हणून रेल्वेचे लगेजचे डबे वार्षिक लीजवर द्यायला सुरुवात केल्याने पानाच्या पाटय़ांचे लोंडीग पालघर रेल्वे स्थानकामध्ये बंद झाले. सध्या केळवा-माहीमचे बागायतदार टेम्पोमधून पानाच्या टोपल्या मुंबई सेंट्रल येथे पाठवून त्या मुंबई सेंट्रल येथे गाडीत भरून रेल्वेने दिल्लीला पाठवितात. दिल्लीहून पुन्हा टेम्पोद्वारे वेगवेगळ्या ठिकाणी पान पोहचविले जाते.

पूर्वी वेगवेगळ्या स्थानकांमध्ये पालघरचे पान थेट रेल्वने पोहोचायचे, मात्र ५ मिनिटांपेक्षा अधिक थांबा असलेल्या ठिकाणीच लगेज डब्यातील सामान उतरविण्याची सुविधा असल्याने राजस्थानमधील बायांना, जावईबंद, नघोर, उत्तर प्रदेशमधील मेरठ आदी ठिकाणी जाणारे पान बंद झाले.

डेहेराडून एक्स्प्रेसमधून पूर्वी प्रवास करणाऱ्या पानाच्या टोपल्या सध्या गोल्डन टेम्पल सुपरफास्टने जात असल्याने प्रवास वेळेत बचत होते. तरी देखील मुंबई सेंट्रल गाठण्यासाठी पालघरहून पाच ते सहा तासांचा वेळ आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न भेडसावत आहे. पालघरहून रेल्वेमध्ये पान चढविण्याऐवजी मुंबईत पाठविण्यात प्रत्येक टोपलीमागे २० ते २५ रुपयांचा खर्च वाढला आहे. उन्हाळ्याच्या दिवसात अतिउष्णतेमुळे पान कुजण्याचे प्रकार घडतात व पान  उत्पादकांचे नुकसान होते.

देशातून इतर भागातून येणाऱ्या पानाशी मुकाबला करण्यास पालघरचे पान दर्जाचे बलाढय़ असले तरी दराच्या स्पर्धेमध्ये व्यापाऱ्यांची पसंती स्वस्त पानाकडे जात असल्याने येथील बागायतदार संकटामध्ये सापडला आहे. यामुळे या भागात पूर्वी आठवडाभर चालणारा बाजार हा सध्या आठवडय़ातून फक्त चार दिवस (सोमवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार) भरू लागला आहे. केळवे-माहीम येथून दररोज सरासरी ४०० ते ५००पेटय़ा पान उत्तरेकडे पाठविले जात असे.

पानाची मागणी

जामनगर, राजकोट, वेरावळ, केशोध-कोडीनाथ, सौराष्ट्र, काठेवाडी, दिल्ली, मुझ्झफरनगर, सहारणपूर, देवबंद, रामपूर, रूरकी.

प्रमुख स्पर्धक

* आंध्रमधील ‘गोल्टा’ पान, मध्य प्रदेशमधील मगज,

* पुणा-सातारा-सांगलीमधील कपुरी व देशी पान,

* कलकत्ता येथील मिठा पान

* शिवाय बांगलादेश व श्रीलंकेतून येणारे पान

फॉन्ट्रीयर मेलला मिळावा थांबा

पालघरहून दिल्ली येथे १६ ते १८ तासात पोहचणाऱ्या फॉन्ट्रीयर मेल किंवा या वेगाच्या अन्य कोणत्याही गाडीला आठवडय़ातून ३ ते ४ दिवस पालघर येथे ५ मिनिटांचा थांबा दिल्यास पानवेल बागायतदारांना नवसंजीवनी मिळू शकेल.