महापौर मिनाक्षी शिंदे यांचे आदेश; पूर्वीप्रमाणेच उद्यान करा

ठाणे : घोडबंदर येथील मानपाडा भागातील ‘जुने ठाणे आणि नवीन ठाणे’ थीम पार्क चौकशीच्या फेऱ्यात सापडलेले असतानाच लोकमान्यनगर भागातील बॉलीवूड पार्कच्या कामावर नगरसेवकांनी आक्षेप नोंदविला. त्यामुळे हे कामही वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. नगरसेवकांच्या मागणीनंतर महापौर मिनाक्षी शिंदे यांनी या पार्कचे काम थांबवून त्या ठिकाणी पूर्वीप्रमाणेच उद्यान तयार करून देण्याचे आदेश दिले. तसेच पार्कच्या कामासाठी ठेकेदाराला देण्यात आलेली रक्कम वसूल करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले.

घोडबंदर येथील मानपाडा भागात ‘जुने ठाणे आणि नवीन ठाणे थीम’ थीमपार्क उभारण्यात आले होते. या पार्कच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सर्वपक्षीय नगरसेवकांकडून करण्यात आला होता. या आरोपानंतर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी प्रशासकीय पातळीवर चौकशी समिती नेमली होती. याशिवाय, सर्वसाधारण सभेमध्ये याप्रकरणाच्या चौकशीसाठी सर्वपक्षीय नगरसेवकांची समिती नेमण्यात आली होती. त्यामुळे हे प्रकरण चौकशीच्या फेऱ्यात सापडले आहे. त्यापाठोपाठ आता बॉलीवूड पार्कच्या कामातही भ्रष्टाचार झाल्याचा संशय नगरसेवकांनी मंगळवारच्या सर्वसाधारण सभेत केला. भाजपच्या नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी बॉलीवूड पार्कचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर या पार्कमध्ये कोणतेही साहित्य आलेले नसतानाही ठेकेदाराला देयक अदा करण्यात आल्याचा आरोप शिवसेनेच्या नगरसेविका आशा डोंगरे यांनी केला. तर या उद्यानाच्या ठिकाणी अस्वच्छता पसरली असून त्याठिकाणी गर्दुल्यांचा वावर वाढला आहे, असा आरोप नगरसेवक दशरथ पालांडे यांनी केला. तर या अस्वच्छतेमुळे परिसरातील नागरिक हैराण झाले असून त्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे हे प्रकरण गंभीर असल्याचा मुद्दा शिवसेनेचे नगरसेवक बारटक्के यांनी मांडला. या कामाबाबत प्रशासनाकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्यामुळे नगरसेवक आक्रमक झाले. मुदत संपली तरी हे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी लावली तर त्याची अवस्था थीमपार्कच्या चौकशी सारखीच होईल. त्यामुळे बॉलीवूड पार्कचे काम त्वरित बंद करा आणि त्या ठिकाणी साधे उद्यान तयार करा, असा आग्रह नगरसेवकांनी यावेळी धरला. तर मुदतीत काम झाले नाही म्हणून ते काम बंद करावे आणि संबंधित ठेकेदाराला दिलेले कामाचे पैसे वसूल करावेत, अशी मागणीही भाजपचे नगरसेवक मिलिंद पाटणकर यांनी केली. अखेर नगरसेवकांच्या मागणीनंतर महापौर मिनाक्षी शिंदे यांनी पार्कचे काम थांबविण्याचे आदेश दिले. तसेच पूर्वीप्रमाणेच उद्यान तयार करून देण्याचे आदेश देतानाच त्यांनी पार्कच्या कामासाठी ठेकेदाराला देण्यात आलेली रक्कम वसूल करण्याची सूचना प्रशासनाला केली.

ठेकेदाराला देयक अदा

या कामासाठी ठेकेदाराला आतापर्यंत किती पैसे देण्यात आले याबाबत सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी प्रशासनाला जाब विचारला. त्यावेळेस या कामासाठी ६ कोटी ८८ लाखांचे देयक संबंधित ठेकेदाराला देण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त राजेंद्र अहिवर यांनी दिली.