आई गमावलेल्या पाच दिवसांच्या पिलाचा जीवनसंघर्ष

गीता कुळकर्णी, लोकसत्ता

ठाणे : येऊरच्या जंगलातील एका झाडावरून पिलासह खाली कोसळलेल्या मादी माकडाच्या मृत्यूनंतर तिच्या पाच दिवसांच्या पिलाचा सांभाळ करण्यासाठी ठाण्यातील प्राणिप्रेमी सरसावले आहेत. आईचे छत्र हरपल्याने या पिलाची प्रकृती चिंताजनक झाली आहे. मात्र, ‘वाइल्डलाइफ वेल्फेअर असोसिएशन’च्या सचिव मानसी नथवाणी या पिलाला चोवीस तास आपल्या कुशीत घेऊन त्याचा सांभाळ करत आहेत. मानवप्रेमाची ही ऊब या पिलाला मिळत असली तरी, त्याचा जगण्याचा संघर्ष सुरूच आहे.

येऊरच्या जंगलातून लोकवस्तीत येणाऱ्या माकडांची संख्या बरीच मोठी आहे. शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास एक मादी माकड येऊर येथील रवी इस्टेट भागात झाडावरून पडले. यावेळी तिच्यासोबत तिचे एक दिवसाचे पिल्लू पोटाला बिलगून होते. या घटनेत मादी माकडाच्या डोक्याला मार लागून तिचा जागीच मृत्यू झाला. सुदैवाने तिच्या पोटाला बिलगून असलेले पिल्ल३ मात्र बचावले. या अपघाताची माहिती रवी इस्टेट येथील रहिवाशांनी वन विभाग तसेच प्राणिप्रेमींना दिली. वन विभागाचे कर्मचारी आणि प्राणी संघटनेचे पदाधिकारी घटनास्थळी पोहचताच त्यांनी बचावलेल्या मादी पिल्लावर उपचार सुरू केले. या पिलाची प्राण्यांच्या दवाखान्यात रवानगी करावी असा एक विचार पुढे आला. मात्र, वाइल्डलाइफ वेलफेअर असोसिएशन संस्थेच्या सचिव मानसी नथवाणी पुढे आल्या आणि त्यांनी पिलाचा सांभाळ करण्याचा निर्णय घेतला. रविवारपासून या पिलाचा त्या सांभाळ करत आहेत. पिलाची प्रकृती चिंताजनक असल्याचे त्यांनी सांगितले. हे पिल्लू अवघे ५ दिवसांचे असून मादी माकडाच्या पोटाला बिलगून त्याला ऊब मिळत होती. परंतु त्याच्या आईचा मृत्यू झाल्याने मानसी यांना त्या पिल्लाला सतत कुशीत घेऊन बसावे लागत आहे. रात्रीदेखील पिलाला जरा दूर सारताच ते थंडीने कुडकुडते, असे नाथवाणी म्हणाल्या. पिलाला अधिक ऊब मिळावी म्हणून त्या या पिलाला एका बाहुल्यासोबत लोकरीच्या कापडात गुंडाळून ठेवत आहेत. मात्र, तरीही या पिलाची प्रकृती चिंताजनक आहे.

पिल्लाच्या अंगाला खरचटले असून त्याच्या डोक्याला मार लागला आहे. त्या जखमांवर देखील उपचार करण्यात येत आहेत. माकडाच्या पिलाच्या शरीराला योग्य प्रमाणात ऊब मिळत नसल्याने डॉक्टरांनी ‘इंफ्रारेड लाईट’ या उपकरणाच्या वापराने ऊब देण्याचा सल्ला दिला आहे.  पिलाला शरीराची ऊब देण्यासोबतच त्या उपकरणाच्या माध्यमातून देखील ऊब देण्यास सुरुवात केली आहे.

– मानसी नथवाणी, प्राणिप्रेमी