देशाची अर्थिक राजधानी म्हणून ओळख मिरवणाऱ्या मुंबईत एक वेगळी संस्कृती आणि जीवनशैली वाढलेली आहे. मुंबईच्या या आधुनिक जिवनशैलीची भुरळ देश-परदेशात सगळ्यांनाच असल्याने इथे येणाऱ्या लोंढय़ांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. येणारा प्रत्येक लोंढा सामावून घेत मुंबईने त्यांना आपलेसे केले आहे. मुंबईतील ‘मुंबईकर’ या सगळ्यांना आपलेसे करत असताना आपला वेग मात्र राखून आहेत. सकाळ-संध्याकाळ, रात्र-पहाट मुंबई नेहमीच जागी असते. दहशतवादी हल्ला असो किंवा महापूर मुंबईने सगळ्या गोष्टी आपल्या पोटात सामावून घेतल्या. मुंबईच्या या संस्कृतीला ‘मुंबईचे स्पिरिट’ म्हणून ओळख देण्यात आली. मुंबापुरीचे हे स्पिरिट उलगडण्याचा प्रयत्न ‘फोक मस्ती’ या बॅण्डने अत्यंत खुबीने केला आहे. याच ‘फोक मस्ती’च्या निर्मितीची ही कथा..

सुबह हुई, शाम आई, सूरज ढले पंछी घर चले,
पर ना थका वो जो मुंबईकर..
गाण्याच्या पहिल्याच ओळींतून मुंबईकरांच्या जीवनशैलीची ओळख करून देण्याचा प्रयत्न ‘फोक मस्ती’ हा बॅण्ड करतो आणि मुंबईवर प्रेम करणाऱ्यांची मने जिंकून घेतात. ‘आमची मुंबई’ हे या गाण्याचे नाव असून या गाण्यात मुंबई व मुंबईकरांचे वर्णन केले आहे. दिवसरात्र काम करून आपल्या शहरावर मनापासून प्रेम करणाऱ्या मुंबईकरांचे वर्णन या गाण्यातून केले आहे. पाऊस, पूर, सुनामी, दहशतवाद्यांचा हल्ला असे काहीही झाले तरी मुंबईकर आपली जबाबदारी चोख पार पाडतात. कोणासाठीच हे शहर थांबत नाही हे आपल्याला गाणे ऐकताना जाणवत जाते. कोणासाठी न थांबणारा मुंबईकर उत्सव मात्र आनंदाने साजरे करतो. या सणांच्या निमित्ताने एकमेकांशी संवाद साधत सगळ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जातो. संकटाच्या परिस्थितीत मुंबईकर एक होतात हे शेवटी ‘आमची मुंबई’ हे गाणे आपल्याला पटवून देते.
tv15लहानपणापासूनच ठाण्यात राहणाऱ्या विपुल पांचाळला गाण्याची आणि संगीताची आवड होती. त्यामुळे इंजिनीअरिंग करत असताना त्याने गिटार शिकायला घेतले व इंजिनीअरिंगच्या दुसऱ्या वर्षांला असताना विपुलने ‘आमची मुंबई’ हे गाणे लिहिले. रघु दीक्षित, सुस्मित सेन, ए. आर. रेहमान अशा महान संगीतकारांचा त्यावर प्रभाव असल्यामुळे विपुलला हे गाणे लोकसंगीताच्या स्वरूपाने लोकांपर्यंत पोहोचवायचे होते. पण एकटय़ाला हे काही शक्य नव्हते. म्हणून त्याने त्याच्या परिसरात राहणाऱ्या संगीतवेडय़ांचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्याची ओळख सचिन गुल्दगडे व रोशन आदे यांच्याशी झाली. त्यातील सचिनने २००७ पासून कीबोर्ड शिकण्यास सुरुवात केली होती. त्याचे सुरुवातीपासून बॉलीवूड संगीतावर प्रेम होते. तर उस्ताद झाकीर हुसेन यांना आदर्श मानणाऱ्या रोशनने नऊ वर्षांचा असल्यापासून तबला शिकण्यास सुरुवात केली व सध्या तो ढोलक, ढोलकी, ऑक्टोपॅड, डफ, काँगो ड्रम्स अशी निरनिराळी वाद्ये वाजवतो.
अशा या त्रिकुटामुळे शास्त्रीय, लोकसंगीत आणि बॉलीवूड अशा तीनही संगीतप्रकारांचा संगम होऊन ‘फोक मस्ती’ हा बॅण्ड तयार झाला. गाणे रचताना तिघांनी आपापल्या सांगीतिक पद्धती एकत्र करून ‘फोक म्युझिक’ निर्माण करायचे ठरवले. त्यातून ‘आपली मुंबई’ला संगीत सुरावट लाभवली. विपुल आणि सौरभ शेटे यांनी ते गायले आहे. सचिनने कीबोर्ड तर रोशनने तबल्याची साथ दिली आहे. एकमेकांच्या सांगीतिक पद्धतीला स्वीकारणे व एकमेकांना उत्तम साथ देणे यामुळेच ‘आमची मुंबई’ शक्य होऊ शकले. गाणे ध्वनिमुद्रित झाल्यानंतर त्यासोबतच गाण्याचा उत्तम व्हिडीओसुद्धा दिसणे ही गाण्याची गरज होती. अशा वेळेला राहुल चव्हाण याने चलचित्रनिर्मात्याची जबाबदारी पार पडली. मुंबईभर गाण्याचे शूट झाले व डिसेंबर २०१४ ला ‘फोक मस्ती’ बॅण्डने ‘पेप्सी एमटीव्ही इंडीस’च्या माध्यमातून हे गाणे रिलीज केले. या गाण्याने भारतातील सेनायझरच्या टॉप ५० उदयन्मुख बॅण्ड या स्पर्धेत २८ वा क्रमांक पटकावला. यासोबतच नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिग आर्ट(एनसीपीए)ने आयोजित केलेल्या बॅण्ड बाजा स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला. यासोबत त्यांनी रोलिंग स्टोन्ससाठीसुद्धा परफॉर्मन्स केलेला आहे.
मागच्या काही महिन्यांपासून मयूर हा चौथा मित्र ‘फोक मस्ती’मध्ये सहभागी झाला आहे व तो बॅण्डसाठी गायकाचे काम करतो. ‘फोक मस्ती’ आता एक फोर पिस फोक / फ्युजन बॅण्ड म्हणून ओळखला जातो. त्यानंतर बॅण्डच्या प्रत्येक गाण्याने लोकप्रियता मिळवली आहे. फोक मस्ती सध्या आपल्या दुसऱ्या प्रोजेक्टच्या तयारीला लागली आहे. यूटय़ूबवर ‘फोक मस्ती’ या चॅनलवर आपणास फोक मस्ती बॅण्डची वेगवेगळी गाणी पाहता येऊ शकतात. तसेच त्यांच्या नव्या उपक्रमांची माहितीसुद्धा इथे मिळते.

मोकळ्या परिसरात ‘फोक मस्ती’चे सादरीकरण..
भारताच्या रस्त्यावरील सादरीकरण (स्ट्रीट परफॉर्मन्स) संस्कृतीला पाठिंबा, बळ व प्रोत्साहन देण्यासाठी एन.एस.पी.ए. अर्थात नॅचरल स्ट्रीट फॉर परफॉर्मिग आर्ट या सामाजिक संस्थेची ऑक्टोबर २०१२ ला मुंबई येथे स्थापना झाली. आज एन.एस.पी.ए. परफॉर्मर आणि प्रेक्षकांमधला एक दुवा म्हणून काम करत आहे. दिवसभर काम करून थकलेल्या सामान्य माणसाच्या चेहऱ्यावर आनंद देत संध्याकाळी घरी पाठवणे हा एन.एस.पी.ए. संस्थेचा मुख्य उद्देश आहे. अजित दयाल यांनी या संस्थेची स्थापना केली आहे. आर्थिक सोय नसल्यामुळे अनेक कलाकार त्यांची कला सोडून नोकरीच्या मागे लागतात, पण असे होऊ नये म्हणून ही संस्था कलाकारांना आर्थिक उत्पन्नाची माध्यमे उभी करून देते. संस्थेची सुरुवात झाल्यावर एन.एस.पी.ए. भरपूर जणांकडे आर्थिक मदतीची अपेक्षा घेऊन गेली. पण संस्थेचा पैसे कमावण्याचा कुठलाच हेतू नसल्याने कोणत्याही प्रकारचा नफा यातून मिळणार नाही हे ओळखून अनेकांनी त्यांना अर्थिक पाठबळ देण्यास नकार दिला. दोन महिन्यांनंतर क्वॉन्टम् अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी (Quantum Asset Management Company) यांनी एन.एस.पी.ए.ला पाठिंबा देण्याचे ठरवले. नॅचरल स्ट्रीट्स फॉर परफॉर्मिग आर्टसोबत काम करणारे कलाकार रेल्वे स्टेशन, मेट्रो स्टेशन, विमानतळ, पार्क, मैदान, मॉल्स नगरपालिकांच्या शाळा अशा अनेक जागांवर आपली कला सदर करत असतात. ‘फोक मस्ती’ हा बॅण्ड मागच्या सहापेक्षा जास्त महिन्यांपासून एस.एस.पी.ए . संस्थेसोबत काम करत आहे. या कालावधीत ‘फोक मस्ती’ बॅण्डने सत्तरपेक्षा अधिक ठिकाणी सादरीकरण केले आहे. सादरकर्ते आणि प्रेक्षकांमधले अंतर कमी झाल्यामुळे लोकांचा ‘फोक मस्ती’ला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि रसिकांची शाबासकीही मिळाली आहे.