tvlog03राजकारण ही विचारांची लढाई उरलेली नाही. सत्ता, पैसा, प्रतिष्ठा, अधिकार या गोष्टींना विचारांपेक्षा अधिक महत्त्व मिळू लागल्याने राजकारणातील मतभेद व्यक्तिगत शत्रुत्वावर येऊन ठेपतात. या वैमनस्यातून विरोधी गटावर हल्ले करणे, विरोधकांची हत्या घडवून आणणे, त्यांच्या समर्थकांची आर्थिक, सामाजिक कोंडी करणे, असे प्रकार आता सर्रास सुरू असतात. डोंबिवलीजवळील सागर्ली आणि गोळवली गावातही असेच राजकीय वैमनस्य गेल्या आठ वर्षांपासून सुरू आहेत. या वैमनस्यामध्ये दोन जणांचे जीव गेल्यानंतरही सूडाग्नी शांत झाला नाही आणि आणखी एकाचा बळी घेण्याची तयारी सुरू झाली. मात्र, ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना याची कुणकुण लागली आणि वेळीच कारवाई करून त्यांनी हा हत्येचा कट उधळवून लावला.
जूनच्या शेवटच्या आठवडय़ात किंवा जुलैच्या पहिल्या आठवडय़ात डोंबिवलीजवळ एका विकासकाची हत्या करण्यात येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. गोळवली गावातील विकासक व राजकीय पुढारी कुणाल पाटील याने हा हत्येचा कट आखला असून त्यासाठी परप्रांतातील भाडोत्री मारेकरी, नेमबाज, रिव्हॉल्वर जमवण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांना समजले. यासाठी कुणाल पाटील याने एक कोटी रुपये खर्च करण्याची तयारी चालवल्याची खबरही पोलिसांपर्यंत पोहोचली. हे समजल्यानंतर पोलीस आयुक्त परमविर सिंग, अप्पर पोलीस आयुक्त शिवाजी बोडखे, पोलीस उपायुक्त पराग मणेरे, सहाय्यक आयुक्त नागेश लोहार यांनी तातडीने हालचाली करण्याच्या सूचना कनिष्ठ सहकाऱ्यांना दिल्या. हत्येचा कट आखल्याचे पुरावे हाती नसल्याने थेट कारवाई करता येत नव्हती. तसेच कुणाल पाटील यांनी कुणाच्या हत्येचा कट आखला आहे, याची पोलिसांना माहिती नव्हती. त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कदम, कुलकर्णी, जोशी, प्रजापती, शेख यांचे पथक कल्याण शिळफाटा रस्त्यावर तैनात करण्यात आले. तर कुणाल पाटील याच्या हालचाली आणि संभाषणांवर गुप्त पाळत ठेवण्यात आली.
कुणाल पाटील याच्या संभाषणातून सागर्लीचे माजी सरपंच व बांधकाम व्यावसायिक महेश पाटील यांची हत्या करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी गोळवली आणि सागर्ली या एकमेकांपासून फर्लागभर अंतरावर असलेल्या गावांवर पाळत ठेवण्यास सुरुवात केली.
हत्येचा कट उधळवून लावणे, हा पोलिसांचा हेतू होताच. पण या कटामागचा हेतूही जाणून घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली, तेव्हा आठ वर्षांच्या राजकीय सूडाचा प्रवास त्यांच्यासमोर उलगडला. कुणाल हा कल्याण बाजार समितीचे माजी सभापती व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी वंडार पाटील यांचा पुतण्या आहे. कुणाल पाटील, त्याचा भाऊ आणि अन्य साथीदारांनी २००६ मध्ये गोळवलीचा रहिवासी व महेश पाटील यांचा मित्र रोहिदास भोईर याचा खून केल्याचा आरोप होता. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात वंडार पाटील, सुधीर पाटील यांच्यावर गुन्हा दाखल आहे. या हत्येनंतर दोन्ही गटांचे वैमनस्य वाढले असतानाच २००७मध्ये वंडार पाटील यांचा मुलगा विजय पाटील याची हत्या झाली. याप्रकरणी महेश पाटील आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तेव्हापासून कुणाल पाटील आणि महेश पाटील यांच्यातील शत्रुत्व चिघळले. बांधकाम व्यवसायातील स्पर्धा हे शत्रुत्वाचे कारण होते. तसेच वंडार पाटील गट राष्ट्रवादी काँग्रेसचा तर महेश पाटील भाजपचा असल्याने राजकीय वैरही होते.
या वैमनस्यात अलीकडे आणखी ठिणगी पडली. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या वेळी बाजार समितीचे माजी सभापती वंडार पाटील यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे पक्षातील दुसरा गट पाटील यांच्यावर नाराज होता. या गटाने पाटील यांच्यावर अविश्वास ठराव आणून त्यांना कल्याण बाजार समितीच्या सभापतीपदावरून हटवण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली. त्यांना महेश पाटीलने मदत केली. परिस्थिती आपल्या विरोधात असल्याचे पाहून अविश्वास ठरावावर मतदान होण्याआधीच वंडार पाटील यांनी सभापतीपदाचा राजीनामा दिला.
या घटनेने कुणाल पाटील व महेश पाटील यांच्यातील संघर्ष आणखी वाढला. यातूनच कुणाल पाटीलने महेश पाटील यांच्या हत्येचा कट आखला. त्यासाठी उत्तरप्रदेशातील सरंजा, जौनपूर आणि आझमगढ येथून खास नेमबाजांना पाचारण करण्यात आले होते. या कटाची सूत्रे कुणाल आणि त्याचा मुख्य हस्तक कोळसेवाडीतील रहिवासी सुरज खान यांच्याकडे होती. २८ जून रोजी महेश पाटील यांची हत्या करण्याचे मारेकऱ्यांनी ठरवले. मात्र, पोलिसांनाही ही गोष्ट समजल्याने त्यांनी मारेकऱ्यांना पकडण्यासाठी सापळा रचला. २८ जूनच्या रात्री साडेबारा वाजता पोलिसांनी चार शार्पशूटर आणि अन्य मारेकऱ्यांना कल्याण पश्चिमेतील एका लॉजमधून तसेच गोळवली गावठाणमधून अटक केली. याप्रकरणी कुणाल पाटीललाही ताब्यात घेण्यात आले. त्यामुळे एक हत्या रोखणे पोलिसांना शक्य झाले. अन्यथा राजकीय सूडाचा हा प्रवास असाच सुरू राहिला असता.