13 August 2020

News Flash

नित्यनूतनाचे शिलेदार : स्वदेशी तंत्रज्ञानाने परदेशी मक्तेदारी मोडणारा उद्योजक

पराग पाटील (३९) यांचे बालपण आणि शिक्षण मुंबईच्या मध्यमवर्गीय घरात झाले.

पराग पाटील

सुहास बिऱ्हाडे

भारतात उद्योगांचे जाळे उभे राहिले असले तरी अनेक तंत्रज्ञान परदेशी कंपन्या पुरवत होते. मोठय़ा उद्योगांना वीज निर्मितीसाठी आणि इतर वापरासाठी लागणाऱ्या पाणी शुद्धीकरणासाठी असलेल्या प्रकल्पांची यंत्रसामुग्री परदेशी कंपन्यांकडून आयात करावी लागायची. आपला देश सर्वच क्षेत्रांत प्रगती करत असताना या क्षेत्रातील ही कमतरता वसईतील पराग पाटील या तरुण उद्योजकाने हेरली. ते आत्मसात केले आणि स्वत:ची कंपनी उभारली. आज शालीन कंपोझिट इंडिया प्रा. लिमिटेड ही त्याची कंपनी अग्रणी ठरली आहे.

पराग पाटील (३९) यांचे बालपण आणि शिक्षण मुंबईच्या मध्यमवर्गीय घरात झाले. त्यांचे वडील धन्यकुमार एका कंपनीत लेथ कामगार होते. पराग यांनी डिकेटी अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी (बीई) ची पदवी मिळवली. महाविद्याालयात असताना पराग यांच्या वाचनात मोठय़ा लोकांची चरित्रे आली आणि त्यातून उद्योजक बनण्याची प्रेरणा मिळाली. दरम्यान, पराग यांच्या वडिलांनी मालाड येथे मित्रासोबत स्वत:चा गाळा घेऊन डीएम इंजिनीअरिंग नावाचा छोटा कारखाना सुरू केला होता. अभियांत्रिकीची पदवी मिळाल्यांतर पराग यांनी वडिलांच्या व्यवसायात मदत केली. तेव्हा इंटरनेट आणि समाजमाध्यमे नव्हती. वडिलांच्या उत्पादनाची जाहिरात टाटा यलो पेजेसमध्ये द्यायला सुरुवात केली. त्याच्यातून कामे वाढली. पाच ते सहा वर्षे पराग यांनी वडिलांच्या कंपनीत काम केले आणि कंपनीची वार्षिक उलाढाल ७ लाखांवरून ४२ लाखांवर आणली.

एकदा डोंबवली येथील जेरॉम टावरो ही व्यक्ती पाटील यांना भेटली. जेरॉम मोठय़ा कंपन्यांच्या पाणी शुद्धीकरण प्रकल्पात काम करायचे. त्यांनी मोठय़ा उद्योगांना पाण्याची गरज असते आणि त्यासाठी पाणी शुद्ध करणारे प्रकल्प लागतात अशी माहिती दिली. मोठय़ा कंपन्यांना वापरासाठी आणि वीज निर्मितीसाठी पाणी लागते. ते पाणी समुद्रातून घेतले जाते. समुद्राचे पाणी खारट असल्याने ते शुद्ध करून घ्यावे लागते. त्यासाठी समुद्राचे पाणी शुद्ध करण्याचे प्रकल्प उभारावे लागतात. या प्रकल्पासाठी लागणारे फिल्टर वेसल अर्थात टाक्या चीन आणि अमेरिकेतून आयात केल्या जायच्या. भारतात बनवणारे कुणी नव्हते. त्या वेळी या व्यवसायात उतरण्याचा निर्णय परागने घेतला.

परदेशी कंपन्यांना टक्कर देण्याचा निर्णय

परदेशी कंपन्या जे देतात ते आपण देऊ असे पराग यांनी ठरवले. त्यासाठी व्यवस्थित अभ्यास सुरू केला. उद्योगासाठी जे टॅँक बनवतात त्याचे मानांकन असतात. अंधेरी येथील ब्युरो ऑफ इंडियन स्टॅण्डड्स (बीआयएस) मध्ये जाऊन अभ्यास केला. अमेरिकन कंपनी कशा प्रकारे हे उपकरण बनवते यावर अभ्यास सुरू केला. प्रोजेक्ट रिपोर्ट बनवला. आयआयटी मद्रास येथील एका प्राध्यापकाची मदत घेऊन प्रकल्प अहवाल तयार केला. २००६ मध्ये स्वत:चा उद्योग तयार करण्यासाठी २ कोटींचे अर्थसाहाय्य घ्यायचा निर्णय घेतला. मात्र घरच्यांनी एवढय़ा मोठय़ा रकमेला विरोध केला. त्यामुळे तो प्रस्ताव बाजूला ठेवला. परंतु स्वप्न कायम होते. त्यानंतर ते या विषयाची माहिती घेत राहिले. या प्लॅँटमध्ये मशिनरी बनवणारे कोण आहेत. त्यासाठी दिल्ली, नाशिक येथे भेटी दिल्या. अभ्यास सुरू ठवला, २००७ पासून अभ्यास केला. मग २००८ मध्ये ते मालाडवरून वसईला आले. २००५ साली गोरेगावला त्यांनी एक स्टॉल लावला. ३३० व्हिजिटर्स आले. व्यवसाय वाढला. त्यामुळे उत्साह वाढला आणि आपण या व्यवसायात पुढे जाऊ  शकतो असा विश्वास निर्माण झाला.

बिहारच्या कामातून सुरुवात

पराग यांनी डीएम इंजिनीअरिंग कंपनी नावारूपाला आणली. स्वत: प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला. २००८ मध्ये बिहारच्या बरोनी येथील इंडियन ऑइलच्या रिफायनरीमध्ये १ लाख ६५ हजार लिटर्स क्षमतेचे अ‍ॅसिड स्टोरेज टॅँक बनवले. या प्रकल्पाने पैसा दिला नाही, पण आत्मविश्वास आला. मग २०१० मध्ये आसाम येथे दुसऱ्या प्रकल्पाचे काम हाती घेतले. पाटील यांची घोडदौड सुरू झाली. उद्योग वाढविण्यासाठी त्यांनी इंटरनेटवर जाहिराती सुरू केल्या. आयात-निर्यातीचा अभ्यासक्रम केला. त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव केली. त्या वेळी प्रेशर वेसल वॉटर ट्रीटमेंट शिकण्यासाठी पुण्याला आठवडय़ाला वॉटर ट्रीटमेंटचा अभ्यासक्रम केला. त्यानंतर कुवेतला जाऊन प्लांटची पाहणी केली.  सोलापूर येथील विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्यात स्वतंत्र पाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारला. प्लांट बसविल्यावर सेवा द्यावी लागते. त्यामुळे प्लांट न उभारता केवळ उपकरणे बनवायचे ठरवले. त्यानुसार काम सुरू केले. मग मोठमोठय़ा कंपन्यांना फायबर उपकरणे देण्यास सुरुवात केली. त्या जोरावर निर्यात सुरू केली. ऑस्मोफ्लो (ऑस्ट्रेलिया), मेटिटो (शारजा), टेडागुआ (स्पेन) या देशांतील कंपन्यांना उपकरणे पुरवली.

आता बऱ्यापैकी आत्मविश्वास आला होता. त्यामुळे २०११ ला कागदोपत्री शालीन कंपोझिट इंडिया प्रा. लिमिटेड कंपनी बनवली. मात्र निधी उभारणे आणि इतर गोष्टींसाठी २०१६ उजाडावे लागले. पालघरच्या वेऊर येथे कंपनीसाठी १७ गुंठे जागा घेतली. नंतर पैसे गोळा केले आणि २०१६ मध्ये कंपनी कारखाना उभारला.  सुरुवातीला ४४ लाखांचे कर्ज घेतले. ८० लाखांची यंत्रसामुग्री उभारली. क्रेन, उच्चक्षमतेचा वीजपुरवठा असलेला कारखाना सुरू झाला.

सुरुवातीला दीड कोटी रुपये लागले. उत्पादन सुरू केले. नव्याने मार्केटिंग सुरू केले. त्यासाठी वर्षांतून २-३ प्रदर्शनांत भाग घेतला. एफआरडी बास्केट स्टेनर, एफआरपी फायबर रेनफोर्स्ट पॉलिमर, फारआरपी कार्टेज (फायबर रेनफोर्स्ट पॉलिमर) फिल्टर हाऊसिंग, एफआरपी मिक्सर, एफआरपी प्रेशर वेसल, ब्लोअर्स, डिगॅसिफाइंग टॉवर, केमिकर स्टोरेज टॅँक्स अशी वेगवेगळी ७ उपकरणे शालीन कंपोझिटमार्फत बनवली जात आहेत. अवघ्या तीन वर्षांत कंपनीची उलाढाल ५ कोटींच्या घरात गेली आहे. २०११ मध्ये इंडियन र्मचट ऑफ कॉमर्सतर्फे त्यांना एमएल डहाणूकर पुरस्कराने गौरविण्यात आले.

नावीन्याचा ध्यास आणि इच्छाशक्ती त्याला शास्त्रोक्त अभ्यासाची जोड, या जोरावर पराग पाटील यांनी तीन वर्षांत स्वत:ची कंपनी नावारूपाला आणली. पाणी शुद्धीकरण प्रकल्पात भारतात ज्या चार-पाच कंपन्या आहेत, त्यापैकी पाटील यांची एक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2020 3:33 am

Web Title: story of parag patil a young entrepreneur of vasai zws 70
Next Stories
1 ‘करोना’चा वसईकरांच्या जनजीवनावर परिणाम
2 कल्याणमध्ये सापडला आणखी एक करोनाग्रस्त, राज्यातली संख्या ३३
3 थांबा बदलताच रिक्षाभाडय़ात वाढ
Just Now!
X