आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठी ई-वाचनासह, हसत खेळत शिक्षणाचा प्रयोग

हेमा आघारकर, ठाणे</strong>

शिक्षणाच्या उत्तम संधींसोबत विद्यार्थ्यांना भविष्यात उत्तम माणूस म्हणून घडवण्याचं महत्त्वाचं काम ठाण्यातील ‘जिजाई बालमंदिर शाळा’ सातत्याने करत आहे. या शाळेत आर्थिकदृष्टय़ा दुर्बल स्तरांतील, रोजच्या कमाईवर पोट भरणाऱ्या घटकातील मुलांना सोप्या पद्धतीने शिक्षण दिलं जातं. घरच्या बेताच्या परिस्थितीमुळे पोषक वातावरण आणि संस्काराचा अभाव असल्याने अशा स्तरांतील मुलांना शिक्षणाचं फारसं महत्त्व नसतं. छत्रपती शिक्षण मंडळाच्या ‘जिजाई बालमंदिर शाळे’त मात्र विद्यार्थ्यांना विविध सोपे खेळ आणि आभासी वाचनाच्या माध्यमातून शिक्षणाची गोडी लावली जात आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासाच्या दृष्टीने पालकांची भूमिकाही महत्त्वाची असते. यासाठी पालकशाळेसारखा अनोखा उपक्रम शाळेत वर्षभर राबवला जात आहे.

या कार्यशाळेत स्वच्छता, आरोग्य, मुलांशी संवाद कसा साधावा, शिस्त कशी लावावी, असे विषय हाताळले जातात. या शाळेत दाखल होणारा प्रत्येक विद्यार्थी एका वेगळ्या संघर्षांतून आलेला असल्याने सर्वप्रथम पूर्व प्राथमिक टप्प्यामध्ये अभ्यासाची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केली जाते. हसतखेळत शिक्षणपद्धतीच्या माध्यमातून मुलांचा विकास करणं हे या शाळेचे प्रथम उद्दिष्ट आहे.

आभासी वाचनासाठी फ्लॅशकार्ड्स, ओरिगामी आणि बरंच काही.

आभासी वाचनाच्या अंतर्गत छान फ्लॅशकार्ड्स तयार केली जातात. मुलांच्या परिचयाची चित्रं काढून त्या खाली नावं लिहिली जातात. याचा सराव झाल्यावर मुलांच्या नावाची कार्ड्स तयार केली जातात. सरावानंतर ती पाहून प्रत्येक मूल स्वत:च्या नावाचं कार्ड सहज ओळखू लागतं.

कालांतराने चित्र आणि त्याचं नाव असा संच उपयोगात आणून नाव ओळखून चित्र शोधायचा सराव केला जातो. याशिवाय ओरिगामी, इंग्रजी संभाषणकौशल्य यासारखे उपक्रम शाळेत राबवले जातात.

या शिक्षणपद्धतीमुळे जे बोलतो, वाचतो ते लिहिता येतं, ही भावना मुलांच्या मनात निर्माण करण्याचं महत्त्वाचं काम या शाळेत केलं जातं. अपर्णा भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्योती जपे, अरुणा मुळे, शीला मुळे, अमृता हडकर शाळेत उपक्रम राबवीत आहेत.