ऊस रसविक्रेत्यांची व्यथा; अहमदनगरहून पोटापाण्यासाठी भाईंदरमध्ये

डोक्यावर तळपणारे ऊन, त्यामुळे घशाला वारंवार पडणारी कोरड. अशा अंगाची लाहीलाही करणाऱ्या अवस्थेत थंडगार शुद्ध उसाचा रस मिळाला तर उन्हाने आलेला शीण कुठल्या कुठे पळून जातो. उन्हाच्या काहिलीने त्रस्त झालेल्यांना उसाचा गोड रस पाजून त्यांची तगमग कमी करणाऱ्या उसाच्या रसाच्या गाडय़ा सध्या सर्वत्र दिसू लागल्या आहेत. अहमदनगर जिल्ह्य़ातल्या पाथर्डी तालुक्यातले शेतकरी सध्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी हा उसाच्या रसाचा व्यवसाय करत आहे. उन्हाळ्याचे तीन महिने शहरात पोटापाण्याचा व्यवसाय करायचा आणि पावसाळी शेतीसाठी पुन्हा गावी परतायचे, असा या शेतकऱ्यांचा दरवर्षीचा ठरलेला उपक्रम.
गावात भीषण दुष्काळी परिस्थिती, केवळ पावसावर अवलंबून असलेल्या शेतीमुळे सध्या हाताला काम नाही, अशा हलाखीच्या परिस्थितीत पोटाची टीचभर खळगी भरण्यासाठी मुंबईचा रस्ता धरण्याशिवाय या शेतकऱ्यांपुढे पर्यायच नाही. मुंबईत किमान दोन वेळच्या जेवणाचा तरी प्रश्न सुटेल याच विचाराने नगर जिल्ह्य़ातले घोडके कुटुंब सध्या मीरा-भाईंदरच्या आश्रयाला आले आहे. पाण्यावाचून स्वत:चा जीव तहानलेला असला तरी उन्हाच्या झळांनी कासावीस झालेल्या शहरातल्या नागरिकांचा आत्मा तृप्त करण्याचे काम घोडके कुटुंब करत आहे.

माणिक घोडके मूळचे अहमदनगर जिल्ह्य़ातल्या पाथर्डी तालुक्यातील रांजणी गावचे. गावी वीतभर शेतीतून पावसाळ्याचे चार महिने कशीबशी गुजराण होते. मात्र उर्वरित आठ महिने कसे काढायचे हे मोठे आव्हान घोडके यांच्यासमोर असते. हिवाळ्याचे दिवस कसेबसे ढकलायचे. उन्हाळ्यात दुष्काळाने गावात तीव्र पाणीटंचाई असल्याने बेकारीमुळे उपासमारीची वेळ; परंतु केवळ हातावर हात धरून बसण्यापेक्षा अडीच-तीन महिन्यांसाठी लागणारे सामानसुमान बांधायचे, रस काढायचे लाकडी गुऱ्हाळ सोबत घ्यायचे आणि टेम्पो भरून मुंबई गाठायची हा त्यांचा दरवर्षीचा ठरलेला नेम.

घोडके यांचे बंधूदेखील आपल्या कुटुंबासह त्यांच्यासोबत आले आहेत. मुक्कामासाठी मीरा रोड परिसरात एक खोली त्यांनी भाडय़ाने घेतली आहे. कुटुंबातल्या महिला व मुलेही या कामात बरोबरीने सहभागी होत आहेत. लोखंडी गुऱ्हाळापेक्षा लाकडी गुऱ्हाळात अधिक शुद्ध रसाची हमी असल्याचे घोडके आवर्जून सांगतात. अनेक वेळा लाकडी गुऱ्हाळात हात अडकण्याची भीती असते. काही जणांची बोटे निकामी झालीही आहेत, मात्र एवढा धोका तर पत्करावाच लागतो, असे सांगताना घोडके यांच्या डोळ्यांत काळजीची छटा चमकून जाते. रस काढण्यासाठी लागणारा ऊस ते भाईंदरमधूनच खरेदी करतात. सकाळी दहा ते सायंकाळी सहा-सात वाजेपर्यंत काम करायचे, तेव्हा कुठे त्यांना पोटापाण्यापुरते पैसे मिळतात.

मुलीची शिक्षणाची इच्छा अपुरी
घोडके यांची मुलगीही सोबत आली आहे. कुटुंबाच्या अशा फिरस्त्या कामामुळे कमलाला आपले शिक्षण चौथ्या इयत्तेतच सोडावे लागले. मुलीला शिकवण्याची खूप इच्छा होती; परंतु परिस्थितीपुढे लाचार होण्यावाचून पर्यायच नाही, अशी व्यथा घोडके मांडतात. चेहऱ्यावर बळेबळे आणलेल्या हास्यामागचे दु:ख लपविण्याचा प्रयत्न ते करत असले तरी त्यामागची खंत मात्र ते लपवू शकत नाहीत. पाथर्डी तालुक्यातले केवळ घोडकेच नव्हे तर अशी अनेक कुटुंबे मुंबई, नवी मुंबई, वसई-विरार भागांत उसाची गुऱ्हाळे घेऊन फिरत आहेत. उन्हाळ्याचे अडीच-तीन महिने हा व्यवसाय करायचा आणि पावसाळ्याची चाहूल लागताच बाडबिस्तरा आवरून पुन्हा काळ्या आईची सेवा करण्यासाठी गावाकडची वाट चालू लागायची, असे माणिक घोडके सांगतात.