ठाण्यातील एनकेटी महाविद्यालयाच्या ‘टिकटिक भैया’ची गोष्ट

महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थी जसे भविष्यात चांगली कारकीर्द घडवण्याचे शिक्षण घेत असतात, तसेच जीवनातील अनुभवांचेही वेगवेगळे धडे घेत असतात. त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थिदशेत भेटणारी अनेक व्यक्तिमत्त्वे त्यांच्यासाठी विविध कारणांसाठी प्रेरणा देणारी ठरतात. अशाच प्रकारचे एक व्यक्तिमत्त्व ठाण्यातील नानजीभाई खिमजीभाई ठक्कर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना दररोज येता-जाता खुणावत असते. एखाद्या कोपऱ्यात दगडी लादीवर छिन्नी-हातोडा घेऊन नावे कोरत असलेल्या अयोध्या सिंगची एरवी कुणीही दखल घेतली नसती. मात्र, गेल्या १६ वर्षांपासून सतत एकाच प्रकारचे काम अविरतपणे करताना दिसणारा अयोध्या सिंग ऊर्फ ‘टिकटिक भैया’ विद्यार्थ्यांसाठी सातत्य आणि चिकाटीचे उदाहरण ठरला आहे.

दैनंदिन जीवनात आपल्याला भेटणारी प्रत्येक व्यक्ती-मोठी असो की छोटी- आपल्याला काही तरी शिकवून जात असते. हाच अनुभव एनकेटी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अयोध्या सिंगच्या रूपात येतो. महाविद्यालयात गेल्यावर छिन्नी आणि हातोडय़ानिशी दगडी लाद्यांवर नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांचे नाव कोरताना हमखास दिसतो. लाद्यांवर नाव कोरताना होणाऱ्या ‘टिक टिक’ या आवाजामुळे विद्यार्थी अयोध्या सिंगला प्रेमाने ‘टिक टिक भैया’ अशीच हाक मारतात. उत्तर प्रदेशात मूळ गाव असलेला अयोध्या सिंग महाविद्यालयात गेली १६ वर्षे हे काम करतो आहे. अयोध्या सिंगची घरची बेताची परिस्थिती पाहिल्यावर नानजीभाईंनी अयोध्याला दगडी लाद्यांवर नाव कोरण्याचे काम दिले. अयोध्या सिंगने तब्बल ४५२१ दगडी लाद्यांवर नाव कोरण्याचे काम केले आहे. मराठी आणि गुजराती या दोन्ही भाषांतील अक्षरांचे कोरीव काम करण्याचे कसब त्याने अचूक साधले आहे. त्यामुळे ठाणावाला यांच्यामार्फत उभारण्यात राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांच्या ठिकाणी अयोध्याने कोरलेल्या दगडी लाद्याच बसवल्या जातात. जळगाव, सांगली, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, मालेगाव अशा सर्वच ठिकाणी आपण कोरलेल्या लाद्या लागल्या आहेत, असे अयोध्या सिंग सांगतो. त्याचे काम करण्याचे सातत्य आणि मेहनत यामुळे  विद्यार्थ्यांमध्येही तो लोकप्रिय आहे.

सकाळी सात वाजता लेक्चरसाठी आम्ही विद्यार्थी महाविद्यालयात येतो. त्याआधीच अयोध्या सिंगचे काम सुरु होते. संध्याकाळी महाविद्यालयातून बाहेर पडतानासुद्धा त्याचे काम सुरू असते. कामाची वेळ नित्यनेमाने तो पाळतो. त्याचे हे सातत्य आणि चिकाटी आम्हा विद्यार्थ्यांना शिकवण देणारे आहे.

तन्वी देसाई, एन.के.टी महाविद्यालय.