News Flash

चर्चेतील चर्च : धर्मगुरूंच्या अथक परिश्रमाचे फळ

सदर चर्चला वेगवेगळ्या आर्टेक्टने मदत केली असली तरी महत्त्वाचा भाग हा तेथल्या धर्मगुरूंचा होता.

 

इन्फंट जीजस चर्च – एव्हरशाइन

वसईला दोन चर्चेस डोंगरीवर वसलेली आहेत. एक पश्चिमेला दुसरे पूर्वेला. एक निर्मळच्या डोंगरीवर दुसरे एव्हरशाइनच्या डोंगरीवर. एकाकडे जायला चढणीच्या पायऱ्या दुसरीकडे जायला चढणीचा रस्ता. एक प्राचीन, दुसरे अर्वाचीन दोघांचा दर्शनी भाग बिशपांच्या टोपीसारखा : एक त्रिकोणाकृती, दुसरा गोलाकृती.

काही वर्षांपूर्वी नव्या वसाहतीतील लोकांना नवे चर्च मिळावे यासाठी १०-१२ वर्षांपूर्वी फादर फ्रान्सिस कोरिया आणि फादर अनिल परेरा यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांनी मौजे आचोळे येथील एका टेकडीवर जागा संपादन केली व नवीन चर्चची पायाभरणी दिल्लीतील राजदूत आर्च बिशप पेद्रो लोपेस यांच्या शुभहस्ते झाली. फादर विल्सन रिबेलो यांनी चर्च बांधणीला सुरुवात केली. त्या विभागात जवळजवळ अकराशे ख्रिस्ती कुटुंबे आहेत. त्यांची मने ईर्षेला पोहोचली व त्यांनी हा हा म्हणता अडीच कोटी रुपयांचा निधी उभा केला. कामाला वेग आला व २०११ मध्ये सुरू झालेले बांधकाम डोंगरी गावातील नूनिस या बिल्डरने २०१२ च्या डिसेंबर महिन्यात पूर्ण झाले व आर्च बिशप फेलिक्स मच्याडो यांच्या हस्ते त्याचे उदघाटन झाले.

सदर चर्चला वेगवेगळ्या आर्टेक्टने मदत केली असली तरी महत्त्वाचा भाग हा तेथल्या धर्मगुरूंचा होता. समोर तीन मोठे दरवाजे, बाजूलादेखील दोन दरवाजे व भरपूर खिडक्या यामुळे बाहेरूनदेखील खिडक्या दरवाजातून मुख्य वेदीवरील पुरोहित स्पष्टपणे दिसतात. भरपूर खिडक्या असल्यामुळे हे मंदिर प्रकाशमान दिसते. चर्चमध्ये गिरीज येथील सिक्वेर बंधूंनी तयार केलेली क्रुसावरील येशूची भव्यदिव्य मूर्ती तसेच बाळ येशूची मूर्ती खास आकर्षण आहे.

वसईत ख्रिस्ती बांधव हे पूर्वापार त्यांच्या आळी आळीत राहत आले आहेत. आळींचे खास वैशिष्टय़ असते व त्यात राजकारणही असते. ते कधी कधी चर्चमध्येदेखील डोके वर काढते. इथे मात्र सगळी शहरी लोकवस्ती आहे. भारतभरच्या १७ भाषांतील लोक इथे राहतात. इंग्रजी कोणाचीच मातृभाषा नाही तरीसुद्धा त्यांनी चर्चमध्ये इंग्रजी या भाषेला प्राधान्य दिले आहे व त्यांनी त्या भाषेला गोड मानून घेतले आहे. वसईमधील जवळजवळ सर्वच चर्चमध्ये नित्य साहाय्य करणाऱ्या मातेची (सुकुर माऊलीचा) भक्ती केली जाते. तिथे जो माऊलीचा पुतळा असतो तो अर्धाच असतो. मात्र या चर्चमध्ये जो माऊलीचा पुतळा आहे तो पूर्णाकृती आहे ते या चर्चचे खास वैशिष्टय़ मानले जाते.

चर्च हे डोंगरीवर उभारले गेल्यामुळे ज्येष्ठ मंडळींना चढणे अवघड होत असले तरी बाळ येशूबद्दलची ओढ सगळ्यांनाच या टेकडीवर ओढून घेते. आजूबाजूला उभ्या राहिलेल्या उंचच उंच इमारतींना आपल्याकडे ओढून घेते. या धर्मग्रामात ४००० च्या वर  लोकसंख्या असून हजाराच्या वर कुटुंबे आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2017 1:40 am

Web Title: story on infant jesus church evershine
Next Stories
1 ठाण्यातील धान्य महोत्सवात कोकण आणि मराठवाड्याची भेट; शेतकऱ्यांना झाला नफा
2 खोटा गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ श्रमजीवी संघटनेचे बेमुदत ठिय्या आंदोलन
3 जलयुक्त शिवारसाठी श्रमदान करा, एकनाथ शिंदेंचे नागरिकांना आवाहन
Just Now!
X