07 April 2020

News Flash

किफायतशीर लग्न समारंभांची ‘चाळिशी’

कोणतीही जाहिरात न करता केवळ शिफारशीने नाईकवाडीतील किफायतशीर विवाह समारंभांचा सिलसिला सुरू आहे.

लग्न समारंभ

‘घर बघावे बांधून आणि लग्न पाहावे करून’ अशी म्हण आपल्याकडे अगदी पूर्वापार काळापासून प्रचलित आहे. कारण अगदी स्वस्ताई असल्याच्या काळातही या गोष्टी सर्वसामान्यांना ‘महाग’च होत्या. त्यामुळे काळ कितीही बदलला तरी सर्वसामान्यांना घराप्रमाणे लग्नासाठीही कर्जच काढावे लागते. विवाहवेदीवर सर्वसामान्यांची होणारी ही ससेहोलपट लक्षात घेऊन चाळीस वर्षांपूर्वी ठाणे स्थानक परिसरात राहणाऱ्या नाईक दाम्पत्याने अवघ्या ७५ रुपयांमध्ये लग्न लावून देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. त्या ७५ रुपयांमध्ये शंभर ते सव्वाशे खुच्र्या, वधू-वरांसाठी खास आसने (राजा-राणी) दोन्ही पक्षांसाठी स्वतंत्र कक्ष आणि पौरोहित्याची सोय उपलब्ध करून दिली. ११ मार्च १९७४ रोजी नाईकांनी त्यांच्या गच्चीवर मांडव टाकून तिथे पहिले लग्न लावले. सुरुवातीची १२ वर्षे अशाच प्रकारे गच्चीवरील मांडवांमध्ये लग्ने लावली जात. पुढे मग सभागृह बांधण्यात आले. गेली चाळीस वर्षे नाईकवाडीत अशा प्रकारे हजारो लग्ने लावण्यात आली आहेत. मात्र आता काळानुरूप ७५ रुपयांऐवजी पाच हजार रुपये घेतले जातात. ठाणे स्थानक परिसरातील जागांचे सध्याचे भाव लक्षात घेता नाईक कुटुंबीयांना त्यातून यापेक्षा कितीतरी अधिक उत्पन्न मिळू शकते, मात्र तो मोह टाळून सर्वसामान्यांची सोय पाहण्याची परंपरा त्यांनी अजूनही कायम ठेवली आहे. त्यामुळे बेताची आर्थिक परिस्थिती असलेल्यांना रीतसर हॉलमध्ये लग्न लावून घेण्याची हौस भागविता येते.

ठाणे स्थानकालगत असलेल्या नाईकवाडीतील बाळकृष्ण आणि वंदना या नाईक दाम्पत्याने हा उपक्रम सुरू केला. १९१५ पासून नाईक कुटुंबीय येथे राहत आहेत. पिढीजात पौरोहित्य करण्याचा व्यवसाय आणि जागेची उपलब्धता या दोन बाबींची सांगड घालत बाळकृष्ण नाईक यांनी लग्न समारंभासाठी सभागृह तसेच इतर आवश्यक सुविधा देण्यास सुरुवात केली. त्यांच्या पत्नी वंदना नाईक यांनीही त्यांना साथ दिली. आता अनेक महिला पौरोहित्य करतात. मात्र चार दशकांपूर्वी या क्षेत्रात महिला फारशा नव्हत्या. त्यामुळे वंदना नाईक यांनी तेव्हा घेतलेला निर्णय काळाच्या पुढचा होता. पारंपरिक वैदिक पद्धतीने लग्न लावून त्याची रीतसर नोंदणीही ते करून देत असत. आता विवाहाची नोंदणी करून दिली जात नाही, इतकेच. बाकी हार-तुरे, अक्षता, भटजी आदी सारी व्यवस्था होत असल्याने वऱ्हाडी मंडळी निर्धास्त असतात. याव्यतिरिक्त यजमानांना वऱ्हाडी मंडळींसाठी स्नॅक्स अथवा भोजन द्यायचे असेल तरी ती सोय उपलब्ध करून दिली जाते. पुन्हा इतर लग्नांच्या सभागृहांप्रमाणे त्यातही ‘मोनोपॉली’ नाही. यजमान आपापली सोय करू शकतात. खरे तर गोरगरीब कुटुंबांच्या सोयीसाठी नाईकांनी ही सुविधा उपलब्ध करून दिली. मात्र फारसा बडेजाव पसंत नसलेल्या अनेक श्रीमंतांनीही नाईकवाडीतील सभागृहात साधेपणाने लग्न करणे पसंत केले. इतकेच नव्हे तर नंतर मुलांची आणि नातवंडांची लग्नेही त्याच सभागृहात लावली.

कोणतीही जाहिरात न करता केवळ एकमेकांच्या शिफारशीने नाईकवाडीतील किफायतशीर विवाह समारंभांचा सिलसिला सुरू आहे. सुरुवातीच्या काळात रस्त्यालगत असलेल्या इमारतीच्या टेरेसवरील सभागृहात विवाह होत. पुढे १९९३ मध्ये सत्य विनायक हे दुसरे सभागृह नाईक कुटुंबीयांनी बांधले. नाईक दाम्पत्याचे पुतणे विनय नाईक

आता विवाह सोहळ्यांचे संयोजन करतात. सकाळी आठ ते एक तसेच दुपारी चार ते नऊ अशा दोन सत्रांमध्ये सभागृह उपलब्ध करून दिले जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 22, 2015 2:37 am

Web Title: story on naik family and their low cost hall for marriage
टॅग Marriage
Next Stories
1 अध्यापनाची व्रतस्थ वाटचाल
2 पोखरण मार्गावर अतिक्रमण करणाऱ्यांना १५ दिवसांची मुदत
3 दुकानदाराची दोन इसमांकडून फसवणूक
Just Now!
X