फटाक्यांच्या प्रमाणात घट, तरीही आवाज, धुरामुळे पशु-पक्ष्यांना होणारा त्रास कायम

ठाणे तसेच आसपासच्या परिसरातील पशुतज्ज्ञांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार गेल्या काही वर्षांत दिवाळीत फटाके वाजविण्याचे प्रमाण कमी झाल्याने आवाज आणि धूर यामुळे पशु-पक्ष्यांना होणारा त्रास काही प्रमाणात कमी झाला आहे. तरीही फटाक्यांमुळे प्राण्यांच्या आरोग्याला होणाऱ्या हानीचे प्रमाण चिंताजनक आहे.

फटाक्यांचा कर्णकर्कश आवाज आणि धूर यामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा त्रास माणसापेक्षा प्राण्यांना अधिक होतो. दिवाळीत फटाक्यांमुळे घुबडांचे अधिक अपघात होतात, असे निरीक्षण प्राणीमित्रांनी नोंदवले आहे. जंगलाच्या जवळ असणाऱ्या येऊरच्या रस्त्यावर फटाक्यांना बंदी आणण्यासाठी वनविभागाकडून कारवाई केली जावी, अशी मागणी पर्यावरण रक्षणासाठी काम करणाऱ्या संस्थांकडून केली जात आहे.

पर्यावरणाविषयी जनजागृती होत फटाके वाजवण्याचे प्रमाण वर्षांगणिक कमी होत आहे. रहिवासी संकुलाजवळ किंवा औद्योगिक क्षेत्रात आवाजाची किमान मर्यादा पाळण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले असले तरी नागरिकांकडून हे नियम पायदळी तुडवले जातात. परिणामी, रस्त्यावर फोडल्या जाणाऱ्या फटाक्यांमुळे कुत्र्यांना मोठय़ा प्रमाणात त्रास होतो. मोठय़ा आवाजामुळे घाबरून श्वानांचे अंग थरथरणे, खूप लाळ गळणे, शांत ठिकाणी लपून बसणे, मोठय़ाने ओरडणे, उपाशी राहणे, वांत्या यासारखे आजार श्वानांना होतात. घुबड हा पक्षी केवळ जंगलात राहात नाही, तर मोठय़ा इमारतींच्या एखाद्या कोपऱ्यातही त्याचे वास्तव्य असते. दिवाळ सणात फटाक्यांमुळे घाबरून घुबड घरात शिरतात.

फटाक्यांमुळे कुत्र्यांना होणारा त्रास लक्षात घेता ज्यांच्याकडे पाळीव कुत्रा आहे, त्यांनी त्याला सुरक्षित ठिकाणी ठेवावे. ज्या वेळात फटाके जास्त प्रमाणात फोडले जातात, त्या वेळी घराच्या खिडक्या, दारे बंद ठेवावीत, लखलखाटापासून कुत्र्यांना लांब ठेवावे, फटाके फोडण्याच्या वेळेपूर्वीच त्यांना फेरफटका मारण्यास न्यावे.

– डॉ. मनोहर अकोले, अध्यक्ष, व्हेटरनरी प्रॅक्टिश्नर वेल्फेअर असोसिएशन

प्राण्यांना इजा पोहचवणाऱ्यांना प्रिव्हेन्शन ऑफ अ‍ॅनिमल क्रुएल्टीअंतर्गत शिक्षा होऊ शकते. अटकही होऊ शकते. मुले कुत्र्यांना त्रास देत असल्यास पालकांनी त्यांना समज द्यायला हवी.

–  मित आशर, अ‍ॅनिमल वेल्फेअर ऑफिसर, उच्च न्यायालय, मुंबई</p>

 

श्वानांना झालेले विकार आणि अपघात

विकार                                           २०१३   २०१४   २०१५

श्वसनविकार                                  १५       ११          ७

खाणे-पिणे बंद करणे                     २५     २७        २१

वांत्या, जुलाब                                 २०     १०         १२

बेपत्ता होणे                                      २       १            –

सैरावैरा धावून अपघात                    १       २           ३

बहिरेपणा                                        २       १             –

 

शेपटीला बांधल्याने                           –      १            १

फटाके खाल्याने                                 ३       १        १

माळा खाऊन मृत्यू                             १       –        –

जखमी होणे                                      २        –        १

त्वचेचे विकार                                   ४      २       ३