टिटवाळा पूर्व, पश्चिम परिसरात भटक्या श्वानांची संख्या वाढली आहे. महापालिकेकडून या कुत्र्यांचा बंदोबस्त होत नसल्यामुळे पादचारी हैराण झाले आहेत. मोकाट फिरत असलेले श्वान पादचाऱ्यांचे चावे घेत असल्याच्या तक्रारी आहेत. गेल्या आठवडाभरात २० पादचाऱ्यांना या श्वानांनी चावा घेतला आहे. यामध्ये शाळकरी मुलांचा सहभाग अधिक आहे.

या श्वानांच्या दहशतीमुळे मुले शाळेत, खासगी शिकवणीला पाठविताना पालकांना हातात काठी घेऊन बाहेर पडावे लागत आहे. रात्रीच्या वेळेत कामावरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना या श्वानांचा उपद्रव होत आहे. टिटवाळ्यातील संत ज्ञानेश्वर चौक, पंचवटी चौक, वासुंद्री, बल्याणी रस्ता भागात भटक्या श्वानांचा उपद्रव अधिक आहे. मटण विक्रेत्यांच्या दुकानाच्या परिसरात मिळणाऱ्या खाण्यावर हे श्वान पोसले जात आहेत. रात्रीच्या वेळेत रस्त्यावरून फिरताना, दुचाकीस्वारांचा भटके श्वान पाठलाग करतात. पादचारी एकटा असेल तर त्याला हातात काठी किंवा दगड घेऊनच घर गाठावे लागते, असे या भागातील रहिवाशांनी सांगितले. पालिकेने तातडीने या भटक्या श्वानांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी रहिवासी करीत आहेत. या भागात भटके श्वान पकडण्यासाठी गाडी पाठवली जाईल. निर्बीजीकरण केंद्रात आणली जातील, असे  पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले.