ठाणे : येथील कॅसल मिल भागात एका भटक्या श्वानाला जिवंत जाळून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सिटिजन फॉर अ‍ॅनिमल प्रोटेक्शन (कॅप) या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या घटनेची माहिती एका रहिवाशाने  कॅप संस्थेला दिली. या संस्थेतील सदस्य अथर्व प्रभावळे यांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. त्या वेळी त्यांना श्वान मृतावस्थेत आढळला. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून हा श्वान आजारी होता. त्याच्यावर उपचार करून सोडून देण्यात आले होते. प्राणिमित्र संघटनांकडून या घटनेविषयी संताप व्यक्त केला आहे.

आठवडय़ाला दोन तक्रारी

‘कॅप’ ही संस्था गेली अनेक वर्षे भटक्या प्राण्यांसाठी काम करत आहे. भटक्या प्राण्यांवर अत्याचार किंवा त्यांची हत्या होत असल्याच्या आठवडय़ाला एक ते दोन तक्रारी े येत असतात. यामध्ये श्वान आणि मांजरींवर अत्याचार होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले आहे.