ठाणे, कळवा तसेच मुंब्रा परिसरात भटक्या कुत्र्यांकडून नागरिकांना चावा घेण्याचे प्रकार वाढत असतानाच महापालिकेच्या श्वान निर्बीजीकरण विभागात तज्ज्ञ पशुवैद्यक आणि पारिचारिकांच्या जागा रिक्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. भटक्या कुत्र्यांवर वेळीच निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया करता यावी यासाठी श्वानांना पकडण्यासाठी आरोग्य विभागाच्या ताफ्यात दोनच श्वान वाहने (डॉग व्हॅन) असून त्यापैकी एक वाहन गेले अनेक महिने नादुरुस्त आहे. यामुळे महापालिकेच्या दहा प्रभाग समित्यांच्या हद्दीतील कुत्रे पकडण्याची मोहीम एकाच वाहनावर अवलंबून आहे.
ठाणे महापालिका हद्दीत भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढू लागल्याने नागरिक हैराण झाले आहेत. दहा महिन्यांपूर्वी मुंब्रा भागात भटक्या कुत्र्यांनी एका नऊ वर्षीय मुलाला चावा घेतल्याचा प्रकार घडला. त्यापाठोपाठ ठाणे शहरात एका युवतीला भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याने ती गंभीर जखमी झाली होती. या दोन्ही घटनांनंतर टीकेचा धनी ठरलेला आरोग्य विभाग कुत्र्यांचा उपद्रव रोखण्यासाठी ठोस पावले उचलेले, अशी ठाणेकरांना आशा होती. मात्र, ठाणेकरांचा ही आशा फोल ठरली आहे.
एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात मुंब्रा परिसरात एका अडीचवर्षीय मुलाला भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याची घटना घडली. तसेच वागळे इस्टेट येथील जय भवानीनगर परिसरात पाच मुलांना भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. या दोन्ही घटनांचे पडसाद सर्वसाधारण सभेत उमटले. महापालिकेच्या कुत्रा निर्बीजीकरण शस्त्रक्रिया विभाग ओस पडला असून तिथे शस्त्रक्रियेसाठी डॉक्टर आणि नर्स उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती शिवसेनेच्या नगरसेविका एकता भोईर यांनी सभागृहात दिली.
तसेच शस्त्रक्रिया विभाग असलेल्या परिसरात काही श्वानांनी पिल्लांना जन्म दिल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, यावर आरोग्य विभाग ठोस उत्तर देऊ शकले नाही.
गेल्या दहा वर्षांत ४४ हजार ४४७ भटक्या कुत्र्यांवर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करण्यात आली असून उर्वरित कुत्र्यांवर शस्त्रक्रिया सुरू आहे. या शस्त्रक्रियेसाठी कुत्र्यांना पकडण्यासाठी दोन कुत्रा गाडी (डॉग व्हॅन) असून त्यापैकी एक गाडी नादुरुस्त आहे. यामुळे एका गाडीमार्फत महापालिका हद्दीतील कुत्रे पकडण्यात येत आहेत, अशी माहिती महापालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी आर. टी. केंद्रे यांनी दिली.

चौकशीची मागणी
भटक्या कुत्र्यांच्या शस्त्रक्रियेसाठी कोटय़ावधी रुपये खर्च करण्यात आलेले असतानाही शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढ आहे. तसेच कुत्र्यांना पकडण्यासाठी आरोग्य विभागाच्या ताफ्यात असलेल्या दोनपैकी एक गाडी गेले अनेक महिने नादुरुस्त आहे. तसेच उर्वरित एक गाडी शहरात कुत्रे पकडताना दिसत नसल्याचा आरोप लोकप्रतिनिधींनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केल्याने आरोग्य विभाग अडचणीत येण्याची चिन्हे आहेत.