22 October 2020

News Flash

भटक्या श्वानांची दहशत

विरार शहरात भटक्या श्वानांचा उपद्रव वाढला आहे.

चालू वर्षांत जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांत शहराच्या विविध भागांत १३ हजार ८८७ श्वानदंशाच्या घटना घडल्या आहेत.

वसई-विरारमध्ये महिनाभरात ११६० नागरिकांना श्वानदंश

प्रसेनजीत इंगळे,  लोकसत्ता

वसई : विरार शहरात भटक्या श्वानांचा उपद्रव वाढला आहे. चालू वर्षांत जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांत शहराच्या विविध भागांत १३ हजार ८८७ श्वानदंशाच्या घटना घडल्या आहेत. म्हणजे सरासरी महिन्याला ११६० असे प्रमाण आहे.   इतक्या मोठय़ा घटना घडत असताना पालिका केवळ एकच श्वान निर्बीजीकरण केंद्र चालवते. यामुळे पालिका नागरिकांच्या सुरक्षतेबाबत गंभीर नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

टाळेबंदीत नागरिक घराच्या बाहेर पडत नसल्याने रस्त्यांवरील भटक्या श्वानांना अन्न मिळत नसल्याने ते अधिक आक्रमक झाले आहेत.  शहरात हजारोंच्या संख्येने भटकी श्वाने असून ते नागरिकांवर हल्ला करत असल्याच्या घटनांत वाढ झाली आहे.

पालिके ने दिलेल्या माहितीनुसार मागील केवळ आठ महिन्यांत १३ हजार ८८७ श्वानदंशाच्या घटना घडल्या आहेत. भटक्या श्वानांमुळे वसई-विरार शहरातील नागरिक हैराण झाले आहेत.   दुचाकी वाहन चालकांच्या मागे हे कुत्रे लागत असल्याने अपघातही घडत असतात.  लहान मुलांपासून, महिला, वृद्ध, बाजारहाट करणारे नागरिक या भटक्या श्वानांच्या दहशतीखाली वावरत आहेत.   मागील वर्षी २०१९ मध्येदेखील श्वानदंशाच्या घटना जास्त होत्या. श्वानदशांच्या १८ हजार २६८ घटना घडल्या होत्या.

निर्बीजीकरणावर कोटय़वधींचा खर्च

श्वानांचा उपद्रव रोखण्यासाठी पालिकेमार्फत श्वानांचे निर्बीजीकरण केले जाते. पालिकेने दिलेल्या माहितीनुसार मागील तीन वर्षांत केवळ १० हजार २५५ श्वानांचे निर्बीजीकरण करण्यात आले आहे. एका श्वानाच्या निर्बीजीकरणासाठी ९९६ रुपये खर्च होतात. निर्बीजीकरणासाठी पालिकेने ३ वर्षांत १ कोटी रुपये खर्च केले आहेत. असे असले तरी शहरातील रस्त्यांवर हजारोंच्या संख्येने श्वान दिसत आहेत.

श्वानशाळा प्रस्तावही बासनात

महापलिकेचा सध्या वसई नवघर परिसरात एकमेव निर्बीजीकरण केंद्रावर भार आहे.  केंद्रासाठी दोन ठिकाणी जागा निष्टिद्धr(१५५)त केल्या होत्या त्यामध्ये प्रभाग समिती ‘सी’ मध्ये विरार येथील चंदनसार या ठिकाणी तर दुसरे प्राभाग समिती ‘ई’ मध्ये नालासोपारा येथील निर्मळ, तर तिसरे वसई येथे या ठिकाणी जागा प्रस्तावित करण्यात आल्या होत्या. परंतु मागील चार वर्षांपासून तीनही केंद्रे नव्याने आलेले आयुक्त गंगाथरन यांनी रद्द करून आहे. केंद्राचा पुनर्विकास करण्याचे ठरविले आहे. त्याचप्रमाणे श्वानांची शाळा सुरू करण्याचा पालिकेचा प्रस्तावसुद्धा बासनात गुंडाळला आहे.  सध्या कार्यरत असलेले वसई, नवघर येथील केंद्राची मोठी दुरवस्था आहे. कंत्राटी पद्धतीने चालवण्यास दिलेल्या या केंद्रावर सध्या सर्वच आलबेल चालू आहे. या ठिकाणी श्वानांना पकडण्यासाठी केवळ एकच वाहन आहे. आणि या गाडीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या ही तुटपुंजी आहे. या सेंटरवर केवळ एकच डॉक्टर असून त्याचीही वेळ ठरली नाही आहे. या केंद्रात ठिकठिकाणी अस्वच्छताआहे. श्वानांना ठेवण्याचे पिंजरे जर्जर झाले आहेत. ते नयमित साफ केले जात नाहीत. इतकेच काय तर ज्या श्वानांचे निर्बीजीकरण केले जाते. त्यांच्या कानावर एक मार्क दिला जातो पण ते मार्क करणारे मशीन कित्येक वर्षे झाली खराब झाले आहे. आणि कात्रीने कुत्र्यांचे कान कापले जात असल्याची माहिती समोर आली आहे.

पालिकेने तीन श्वान निर्बीजीकरण केंद्रांचा प्रस्ताव केला होता. त्यासाठी जागांची पाहणीसुद्धा करण्यात आली होती, परंतु सध्या करोना महामारीच्या काळात पालिकेला मोठा आर्थिक तुटवडा जाणवत आहे, यामुळे पालिकेने आहे त्या केंद्राचा पुनर्विकास करण्याचे ठरविले आहे. तसेच हे केंद्र शहराच्या मध्यभागी असल्याने सोयीस्कर आहे
-राजेंद्र लाड,  मुख्य शहर अभियंता  वसई-विरार महानगर पालिका

मोकाट जनावरांचीही समस्या

वसई-विरार शहरातील विविध ठिकाणच्या रस्त्यांवर मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. यामुळे  रस्त्यावरून ये-जा करणारे नागरिक व वाहनचालक त्रस्त झाले आहेत. रस्त्यांवर मोकाट जनावरे कळपाने फिरत असून रस्त्याच्या मध्येच येऊन बसत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ  लागला आहे.  वसई पूर्वेतील एव्हरशाइन, गोखीवरे परिसर, वसंतनगरी, नायगाव, चिंचोटी यांसह इतर ठिकाणच्या भागांत ही जनावरे फिरत आहेत. वसईच्या भागात असलेल्या काही खासगी तबेल्यांच्या मालकामार्फत गायी, म्हशी या चरण्यासाठी सोडल्या जातात. ही जनावरे कधी कधी सैरावैरा पळून माणसांच्या अंगावरदेखील धावून जात असतात.  सार्वजनिक ठिकाणी ही जनावरे तासन्तास ठाण मांडून बसत असतात.  विशेष करून रात्रीच्या  सुमारास काही वेळा रस्त्याच्या मध्येच बसून राहिलेली जनावरे  अंधारामुळे दिसून येत नसल्याने अपघाताचा धोका अधिकच वाढू लागला  असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. दिवसेंदिवस  शहरातील रस्त्यावर मोकाट जनावरांचा वावर वाढू लागला आहे. परंतु याकडे पालिकेने दुर्लक्ष केले असल्याने नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. पालिकेने यावर नियंत्रण मिळवून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मुकेश चौधरी यांनी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 16, 2020 12:06 am

Web Title: stray dogs terror in virar vasai dd70
Next Stories
1 पालिकेच्या मोफत आरोग्य सेवेचे धिंडवडे
2 वसई-विरारमध्ये पाण्याची नासाडी
3 ठाण्यातील ग्रंथालये वाचकांसाठी सज्ज
Just Now!
X