सहा महिन्यांत ३२९ जणांना चावा; बंदोबस्त करण्याची मागणी

तलासरी परिसरात भटक्या श्वानांची दहशत वाढली असून गेल्या सहा महिन्यांत ३२९ जणांना श्वानदंश करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मोकाट श्वानांवर नगरपालिका प्रशासनाचे नियंत्रण नसल्याचे दिसून आले आहे. या श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

तलासरी येथे गेल्या आठवडय़ात पिसाळलेल्या श्वानाने हल्ला केल्याने १० जण जखमी झाले. एका नगरसेवकाच्या नऊ वर्षांच्या मुलावरही भटक्या श्वानाने हल्ला करून त्याच्या पायाचे लचके तोडले. त्याला गुजरातमधील वलसाड येथे उपचारासाठी नेण्यात आले. केवळ माणसेच नाही तर अन्य प्राण्यांवरही भटक्या श्वानांनी हल्ले केले आहेत. शहरातील अनेक गाई, म्हशी, बकरी यांच्यावरही पिसाळलेल्या श्वानांनी हल्ले करून त्यांना जखमी केले.

रात्रीच्या वेळी पादचारी, सायकल, मोटारसायकलस्वार यांच्या मागे मोकाट श्वान लागत असल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. गृहसंकुलांच्या आवारात, रस्त्यांवर उभ्या करून ठेवण्यात आलेल्या मोटारसायकलींच्या आसनांचे आवरण, चप्पल आणि अन्य वस्तू भटके श्वान दाताने फाडून टाकत असल्याने वाहन मालकांना नाहक खर्चाला सामोरे जावे लागत आहे.

तलासरी ग्रामीण रुग्णालयात एप्रिल ते ऑक्टोबर या कार्यकाळात श्वानदंश झालेल्या ३२९ रुग्णांवर उपचार करण्यात आले. तलासरी, उधवा, आमगाव, सुत्रकार, वसा, संजाण, उंबरगाव, भिलाड, वापी परिसरातील अनेक खासगी रुग्णालयामध्येही श्वानदंश रुग्ण उचारासाठी दाखल होत आहेत. त्यामुळे श्वानदंश झालेल्यांची आकडेवारी अधिक असण्याची शक्यता आहे.

शाळेत जाणारे विद्यार्थी आणि घरगुती कामाच्या निमित्ताने बाहेर पडणाऱ्या गृहिणी यांना मोकाट श्वानांचा अधिक धोका असून आम्ही याबाबत वारंवार नगरपालिकेला कळवले आहे. परंतु प्रशासन मात्र याबाबत कोणतीही कार्यवाही करताना दिसून येत नाही. या मोकाट श्वानांच्या बाबतीत प्रशासनाने लवकरच योग्य तो निर्णय घ्यावा.    – सुधीर ओजरे, नागरिक

मोकाट श्वानांचे प्रमाण वाढले आहे. शहरात श्वानदंशांच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन लवकरच एका बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. मोकाट श्वानांना आळा बसण्यासाठी काय करता येईल याचे नियोजन या बैठकीत करण्यात येणार आहे.   – सागर साळुंखे, मुख्याधिकार, तलासरी