कारवाईच्या आश्वासनाचा पालिकेला विसर; रूग्णांच्या संख्येत वाढ

पावसाळ्यात दूषित पाणी आणि उघडय़ावरील अन्नपदार्थाच्या सेवनाने होणाऱ्या आजारांवर आळा घालण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने उघडय़ावरील खाद्यपदार्थाच्या गाडय़ांवर दोन दिवसात कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र दोन आठवडे उलटूनही कारवाई न झाल्याने पालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. विशेष बाब म्हणजे गेल्या महिनाभरात अशा आजारांच्या रूग्णांची संख्या अधिक वाढली असून पालिका रूग्णालयात रूग्णांची रांग पहावयास मिळते.

पावसाळ्यात नगर परिषद प्रशासनाकडून उघडय़ावर अन्नपदार्थ विक्रीवर या काळात प्रतिबंध घालण्यात येतो. त्यासाठी संबधितांना महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायती अधिनियमानुसार पावसाळ्यात उघडय़ावर खाद्यपदार्थ विक्री बंद करण्याबाबत नोटीस बजावण्यात येते.कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने आतापर्यंत सुमारे ४५० विक्रेत्यांना या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. त्यानंतर काही विक्रेत्यांनी उघडय़ावर अन्नपदार्थ विक्री बंद केली. तर अजूनही काही विक्रेते अशाप्रकारे अन्नपदार्ताची विक्री करत आहेत.

सध्या शहरात उलटी,जुलाब, कॉलरा, विषमज्वर, कावीळ आदी साथीच्या आजाराचे रुग्ण आढळत आहेत.असे असतानाही उघडयावर अन्नपदार्थ विRीला प्रतिबंध करण्यासाठी कारवाई न करता फक्त नोटिसा बजावण्यात आल्याचे कारण देण्यात येत आहे.

एकाच डॉक्टरवर पालिका रुग्णालयाचा भार

गेल्या बारा वर्षांंपासून पालिका रूग्णालयाची धुरा एकच डॉक्टर सांभाळत आहे. तीन वर्षांंपूर्वी २०१३ मध्ये शहरी आरोग्य अभियानाच्या माध्यमातून बदलापूर शहरासाठी अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी आणि इतर कर्मचारी मिळणार होते. मात्र जिल्हाधिकारी कार्यालय, कोकण विभागीय कार्यालय आणि पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पदे भरली गेली नाहीत.

उघडय़ावर अन्नपदार्थ विक्रीला प्रतिबंध करण्यासाठी संबंधितांना आठवडय़ाभरापूर्वी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यानंतर अनेक ठिकाणी अशा प्रकारे अन्नपदार्थ विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. काही ठिकाणी अशा प्रकारे विक्री सुरु असल्याचे आढळले असून संबंधितांवर लवकरच कारवाई करण्यात येईल.

 -विजय कदम, आरोग्य विभाग अधिकारी