शिवाजी चौकातील व्यापाऱ्यांना मारहाण
कल्याणमधील शिवाजी चौक ते महात्मा फुले या प्रशस्त जागेत फेरीवाल्यांनी ठाण मांडण्यास सुरुवात केली आहे. काही व्यापाऱ्यांनी या फेरीवाल्यांना हटविण्याचा प्रयत्न केला असता संतप्त फेरीवाल्यांनी जाब विचारणाऱ्या तीन व्यापाऱ्यांना मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली आहे.
आम्ही आमची दुकाने रस्ता रुंदीकरणासाठी पाडली जात असताना विरोध केला नाही. असे असताना रुंदीकरणासाठी दिलेली जागा फेरीवाले कसे काय बळकावू शकतात, असा प्रश्न व्यापाऱ्यांनी आयुक्त ई. रवींद्रन यांच्याकडे उपस्थित केला आहे. या रस्तारुंदीकरणाच्या जागेत एकही फेरीवाला बसता कामा नये, अशी मागणी या भागातील व्यावसायिकांनी केली आहे.
रस्ता रुंदीकरणामुळे प्रत्येक व्यापाऱ्याचे नुकसान झाले आहे. यासंबंधीचा सल मनात असताना प्रशस्त मोकळ्या जागेत फेरीवाले येऊन बसत असतील तर ते सहन केले जाणार नाही, असा इशारा व्यापाऱ्यांनी पालिकेला दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून कल्याण-डोंबिवली महापालिकेने या भागात रस्ता रुंदीकरणाच्या आड येणाऱ्या व्यापाऱ्यांच्या दुकानांवर जोरदार कारवाई सुरू केली आहे.
या कारवाईमुळे राजकीय वर्तुळातही अस्वस्थता आहे. ही कारवाई थांबवली जावी यासाठी काही स्थानिक राजकीय नेत्यांनी बरेच प्रयत्न केल्याची चर्चाही रंगली आहे. असे असताना कारवाईनंतर मोकळ्या झालेल्या जागेत फेरीवाल्यांनी बस्तान मांडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.